पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ऑस्ट्रेलियातील सिडनी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 23 MAY 2023 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मे 2023

 

नमस्ते ऑस्ट्रेलिया !

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि माझे प्रिय मित्र अँथनी अल्बनीज, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान मान्यवर स्कॉट मॉरिसन, न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स, परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, दूरसंवाद मंत्री मिशेल रोलेन्ड, ऊर्जा मंत्री क्रिस बोवेन, विरोधी पक्षनेते पीटर डटन, परराष्ट्र उपमंत्री टीम वॉट्स, न्यू साउथ वेल्सच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित आदरणीय सदस्य, पॅरामाटाचे संसद सदस्य डॉ अँड्रू चार्लटन,  येथे उपस्थित असलेले ऑस्ट्रेलियाचे सर्व संसद सदस्य, महापौर, उप महापौर, कौन्सिलर्स आणि ऑस्ट्रेलियात  राहत असलेले आणि मोठ्या संख्येने उपस्थित अनिवासी भारतीय, आपणा सर्वांना माझा नमस्कार. 

सर्वात प्रथम आपण आज ज्या भूमीवर भेटत आहोत त्या भूमीचे पारंपारिक रक्षणकर्ते यांची दखल घेत ज्येष्ठ, वर्तमान, आणि उदयोन्मुख या सर्वांप्रति मी आदर व्यक्त करतो.

मित्रहो,  

2014 मध्ये मी इथे आलो होतो तेव्हा आपल्याला एक वचन दिलं होतं. वचन हे होतं की आपणांस  भारताच्या पंतप्रधानांची प्रतीक्षा करत 28 वर्ष घालवावी लागणार नाहीत. हे बघा, येथे मी पुन्हा हजर आहे तोही मी एकटा आलो नाही.  पंतप्रधान अल्बनीजसुद्धा माझ्याबरोबर आलेले आहेत. पंतप्रधानांनी  आपल्या अगदी व्यस्त कार्यक्रमातून आपणा सर्वांसाठी  वेळ काढला ही गोष्ट आपल्या भारतीयांप्रति त्यांची स्नेह भावना दाखवते. त्यांनी आता जे सांगितलं त्यावरून ऑस्ट्रेलियाच्या हृदयात भारताबद्दल केवढे प्रेम आहे ते दिसून येते. यावर्षी मला पंतप्रधानांचे भारताच्या धरतीवर, अहमदाबादमध्ये स्वागत करण्याची संधी मिळाली. आज ते येथे लिटिल इंडियाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यास माझ्यासह आले आहेत. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. माझे मित्र,अँथनी, धन्यवाद!

हे लिटिल इंडिया म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या विकासात भारतीय समुदायाच्या योगदानाला दिलेली पावती आहे. मी न्यू साउथ वेल्स प्रीमियर पॅरामाटा शहराच्या मेयर, उपमेयर आणि कौन्सिलर्सना या विशेष सन्मानासाठी धन्यवाद देऊ इच्छितो.

मित्रहो,

मला आनंद वाटतो की न्यू साउथ वेल्स मध्ये अनिवासी भारतीय समुदायातील अनेक लोक सार्वजनिक जीवनात सक्रिय भाग घेत आहेत आपली ओळख निर्माण करत आहेत. आत्ताच्या न्यू साउथ वेल्स च्या सरकारमध्ये डेप्युटी प्रीमियर प्रू कार, खजिनदार डॅनियल मुखी योगदान देत आहेत आणि अगदी हल्ली हल्ली कालच समीर पांडे पॅरामाटाचे  लॉर्ड मेयर म्हणून निवडले गेले आहेत. मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रहो,

आज पॅरामाटामध्ये हे सगळं घडत आहे तेव्हाच अजून एक माहिती कळली की पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात भारतीय सैनिक नैनसिंह सैलानी यांच्या नावे एक सैलानी अवेन्यू तयार केला गेला आहे. पहिल्या जागतिक महायुद्धात ऑस्ट्रेलियाच्या फौजेसाठी लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. या सन्मानाबद्दल पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाचं मी आदरपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रहो,

कधीकाळी असं म्हटलं जात असे की भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन C दर्शवतात. हे तीन C कोणते तर कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी  त्यानंतर म्हटले जाऊ लागले की ऑस्ट्रेलियाचे आणि भारताचे संबंध तीन D वर आधारित आहेत ते म्हणजे डेमोक्रसी, डायस्पोरा आणि दोस्ती. काही जण असेही म्हणत की भारत आणि ऑस्ट्रेलियाचे  संबंध तीन E वर आधारित आहेत. एनर्जी, इकॉनोमी आणि एज्युकेशन. म्हणजेच काय, तर कधी C , कधी D तर कधी E. वेगवेगळ्या काळात त्या त्या गोष्टी एक प्रकारे योग्यही असतील, पण भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक संबंधांचा  विस्तार याहून कितीतरी मोठा आहे आणि या संबंधांना सर्वात मोठा आधार काय आहे हे सर्वच जण जाणतात. जाणता ना?  नाही, सर्वात मोठा आधार आहे तो परस्परविश्वास आणि परस्पर आदर.  हा परस्परांवरचा विश्वास आणि परस्परांबद्दलचा आदर केवळ राजनैतिक संबंधामधून विकसित झालेला नाही. त्याचे खरे कारण आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलियात राहणारा प्रत्येक भारतीय. तुम्ही या गोष्टीची खरी ताकद आहात, खरे कारण आहात. याचे खरे कारण आहे ते ऑस्ट्रेलियातील अडीच कोटींहून जास्त नागरिक.

मित्रहो,

आपल्यामध्ये भौगोलिक अंतर नक्की आहे परंतु हिंदी महासागर आपल्याला एकमेकांशी सांधतो. आपली जीवनशैली वेगवेगळी असेल पण आता योगसुद्धा आपल्याला जोडतो. क्रिकेटबरोबर तर आम्ही केव्हापासून सांधले गेलो होतो. पण आता टेनिस आणि चित्रपट सुद्धा आम्हाला एकत्र आणतात. आपल्याकडे स्वयंपाक करण्याचा पद्धती वेगवेगळ्या असतील पण आता मास्टर शेफ हा आपल्या मधला सांधा आहे. आमच्याकडे सण समारंभ वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. मात्र आम्ही सगळे दिवाळीची रोषणाई आणि बैसाखीचा उत्साह यांनी एकत्र जोडले गेलेलो आहोत . आमच्याकडे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात पण आम्ही मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, हिंदी भाषा शिकवणाऱ्या साऱ्या शाळांबरोबर आम्ही जोडले गेले आहोत‌.

मित्रहो,

ऑस्ट्रेलियाचे लोक, इथले रहिवासी एवढ्या विशाल हृदयाचे आहेत, मनाचे एवढे चांगले आणि सच्चे  आहेत की भारताच्या या विविधतेला मोकळ्या मनाने स्वीकारतात. म्हणूनच पॅरामाटा स्क्वेअर एखाद्यासाठी परमात्मा चौक होऊन जातो आणि Wigram स्ट्रीट सुद्धा विक्रम स्ट्रीट म्हणून प्रसिद्ध पावतो. हॅरीस पार्क कित्येक लोकांसाठी हरीश पार्क म्हणून ओळखला जातो.  तसंही माझ्या कानावर आले आहे की हॅरीस पार्कमध्ये चाटकाझची चाट, जयपुर स्वीटसची जिलेबी या सगळ्याना काही तोड नाही. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण माझे मित्र पंतप्रधान अल्बनीजना सुद्धा तिथे जरूर घेऊन जा.  मित्र हो, जेव्हा खाण्याची गोष्ट निघते आणि चाटबद्दल बोलतो आहोत तर लखनऊचं नाव बोलण्यात येणे  सहाजिक आहे. मी ऐकले आहे की सिडनीच्या जवळ लखनऊ नावाची ही एक जागा आहे पण मला तिथे चाट मिळते की नाही याची माहिती नाही. आता इथे सुद्धा बहुतेक दिल्लीच्या जवळ असणाऱ्या लखनऊचेच लोक असतील .आहेत का अरे वा खरोखर दिल्ली स्ट्रीट, बॉम्बे स्ट्रीट , कश्मीर अवेन्यू, मालाबार अवेन्यू यासारखी कितीतरी रस्ते ऑस्ट्रेलियाला आपल्या भारताशी जोडून ठेवतात.

ग्रेटर सिडनी मध्ये इंडिया परेडही  सुरु होणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. इथे तुम्ही सर्वांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला हे जाणून मला खूप आनंद झाला. त्या निमित्ताने येथील अनेक सिटी कौन्सिलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सिडनी ऑपेरा हाउस जेंव्हा तिरंगा रोषणाईने उजळून निघाले होते, तेंव्हा भारतीयांना खूप आनंद झाला होता. हिंदूस्थानात देखील जयजयकार होत होता आणि यासाठी मी न्‍यू साउथ वेल्‍सच्या सरकारचे विशेष आभार मानतो. 

मित्रांनो, 

आपल्या क्रिकेटच्या नात्याला देखील 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. क्रीडांगणावर क्रिकेटचा सामना जितका मनोरंजक होतो, मैदानाबाहेर आपली तितकीच दाट मैत्री आहे. यावेळी ऑस्ट्रेलियामधील अनेक महिला क्रिकेट खेळाडू पहिल्यांदाच आयपीएल सामने खेळण्यासाठी भारतात आल्या होत्या, आणि मित्रांनो आपण केवळ सुखाच्या काळामध्ये एकमेकांचे साथीदार आहोत असे अजिबात नाही. खरा मित्र सुखाच्या काळात साथीदार असतोच, दुःखाच्या काळात देखील तो साथीदार असतो. मागच्या वर्षी जेव्हा महान शेन वॉर्न यांचे निधन झाले तेव्हा ऑस्ट्रेलिया बरोबरच करोडो  भारतीयांनाही दुःख झाले.आप्तस्वकीय गमावल्याप्रमाणे भारतीयांची भावना होती.

मित्रांनो,

तुम्ही सर्वजण इथे ऑस्ट्रेलियामध्ये आहात. तुम्ही येथील विकास पाहत आहात. तुम्हा सर्वांचे एक स्वप्न आहे की आपला भारत देखील विकसित राष्ट्र बनला पाहिजे. हे आपले स्वप्न आहे ना? हे आपले स्वप्न आहे ना? 140 कोटी भारतीयांचे हे स्वप्न आहे. 

मित्रांनो,

भारताकडे सामर्थ्याची कमतरता नाही. भारताकडे संसाधनांची देखील कमतरता नाही. आज जगातील सर्वात मोठी आणि सर्वात तरुण टॅलेंट फॅक्टरी ज्या देशात आहे तो देश आहे भारत. आपले उत्तर बरोबर आहे, तो देश आहे भारत. मी ही गोष्ट पुन्हा सांगत आहे. आज जगातील सर्वात मोठी आणि सर्वात तरुण टॅलेंट फॅक्टरी ज्या देशात आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आणि आता मी तुमच्यासमोर वास्तव मांडू इच्छितो आणि तुमच्याकडून याचे योग्य उत्तर जाणून घेऊ इच्छितो. तुम्ही तयार आहात ना, कोरोनाच्या या जागतिक महामारी मध्ये ज्या देशाने जगात सर्वात जलद लसीकरण उपक्रम राबवला तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश जगात सर्वात जलद गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनला आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश जगात प्रथम क्रमांकाचा स्मार्टफोन डेटा उपभोक्ता आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश फिनटेक ॲडॉप्शन रेट मध्ये प्रथम क्रमांकावर आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश दूध उत्पादनाच्या बाबतीत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश जगातील सर्वात मोठा  दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन निर्माता आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश तांदूळ, गहू आणि साखर उत्पादकांच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश फळे आणि भाज्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश जगात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टार्ट अप परिसंस्था बनला आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑटोमोबाईल व्यापार ज्या देशात होतो तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठा नागरी हवाई वाहतूक बाजार ज्या देशात आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आणि आता जो देश येत्या 25 वर्षांमध्ये विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट ठेवून पुढे वाटचाल करत आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. 

मित्रांनो,

आज जागतिक नाणे निधी  भारताला जागतिक अर्थव्यवस्थेचा उज्वल बिंदू मानतो आहे, जागतिक बँकेला हा विश्वास आहे की जागतिक प्रतिकूलतेला जर कोणी आव्हान देऊ शकत असेल तर तो देश आहे भारत. आज एकीकडे जगातील अनेक देशांमध्ये बँकिंग प्रणालीवर संकट कोसळले आहे मात्र दुसरीकडे भारतातील बँकांच्या मजबुतीची जगभरात प्रशंसा होत आहे. जगावर कोसळलेल्या गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या संकट काळात भारताने गेल्या वर्षभरात विक्रमी निर्यात केली आहे. आज आपली परकीय गंगाजळी  नवे शिखर गाठत आहे.

मित्रांनो, 

भारत जागतिक कल्याणासाठी कशा प्रकारचे काम करत आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे, आपला डिजिटल स्टेक. आपण सर्वजण भारताच्या फिनटेक क्रांतीशी चांगल्या रीतीने परिचित आहात. 2014 मध्ये जेंव्हा मी इथे आलो होतो तेव्हा मी आपल्या बरोबर एक स्वप्न सामायिक केले होते, ते तुम्हाला आठवत असेलच. माझे ते स्वप्न म्हणजे भारतातील अति गरीब व्यक्तीचे देखील बँक खाते असावे. तुम्हाला अभिमान वाटेल मित्रांनो, की मागच्या नऊ वर्षात आम्ही जवळपास 50 कोटी भारतीयांची म्हणजे जवळपास 500 दशलक्ष बँक खाती उघडली आहेत. आणि केवळ बँक खाती उघडण्यातच आम्हांला सफलता मिळाली असे नाही, आणि आम्ही तेथेच अडकून पडलो असेही नाही. या गोष्टीने भारताच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संपूर्ण परिसंस्थेला रूपांतरित केले आहे. आम्ही जन धन बँक अकाउंट, मोबाईल फोन आणि आधार ओळखपत्र यांची एक जेएएम त्रिसूत्री  बनवली आहे. तुम्ही विचार करा यामुळे एका क्लिकवर, केवळ एका क्लिकवर कोटी कोटी देशवासी आणि पर्यंत डीबीटीम्हणजे थेट लाभ हस्तांतरण शक्य झाले आहे, आणि तुम्हाला आनंद वाटेल, कारण, मागच्या नऊ वर्षांमध्ये, हा आकडा देखील तुम्हाला आनंद देईल, मागच्या नऊ वर्षांमध्ये 28 लाख कोटी रुपये म्हणजे 500 अब्ज  ऑस्ट्रेलियन डॉलर पेक्षा अधिक रक्कम थेट गरजवंतांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. कोरोना संकट काळात अनेक देशांना आपल्या नागरिकांना पैसे पाठवण्यामध्ये अडचणी येत होत्या मात्र हेच काम एका क्लिकवर काही क्षणात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होता. युनिव्हर्सल पब्लिक इंटरफेस म्हणजेच यु पी आय ने भारतात वित्तीय समावेशकतेला नव्या उंचीवर पोहोचवले आहे. जगातील 40% रियल टाईम डिजिटल पेमेंटस् एकट्या भारतात होत आहेत. जर आपण अलीकडच्या काळात भारताला भेट दिली असेल तर आपण पाहिले असेल की आज फळे, भाज्या विक्रेते किंवा पाणीपुरीच्या गाड्या असो किंवा चहाची टपरी या सर्व जागी डिजिटल व्यवहार होत आहेत.

मित्रांनो,

भारताची ही डिजिटल क्रांती केवळ फिनटेक पुरती मर्यादित नाही. भारत आधुनिक व्यवस्था निर्माण करत आहे. लोकांची जीवन सुलभता वाढवत आहे. याचे एक उदाहरण म्हणजे भारताचे डिजिलॉकर. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स पासून पदवी प्रमाणपत्र आणि मालमत्तेची कागदपत्रे हे सर्व जे काही सरकारकडून दिले जातात ते या डिजिटल लॉकर मध्ये जनरेट होतात. जवळपास शेकडो प्रकारचे कागदपत्र डिजिटल लॉकर मध्ये रिफ्लेक्ट होतात.

तुम्हाला भौतिक प्रत साठवण्याची गरज नाही. फक्त एक पासवर्ड पुरेसा आहे. आता 15 कोटींहून अधिक म्हणजे 150 दशलक्षाहून अधिक भारतीय त्यात जोडले गेले आहेत. असे अनेक डिजिटल मंच आज भारतीयांना शक्तिशाली बनवत आहेत.

मित्रांनो,

आज भारताच्या प्रत्येक पावलाबद्दल आणि प्रत्येक कामगिरीबद्दल जगाला जाणून घ्यायचे आहे. आजचे जग ज्या जागतिक व्यवस्थेकडे जात आहे. ते  ज्या शक्यता शोधू पाहत आहे त्यानुसार  हे स्वाभाविक आहे. भारत ही हजारो वर्षांची जिवंत संस्कृती आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे. आपण स्वतःला काळानुरुप घडवत गेलो आहोत, परंतु नेहमीच आपल्या मूलभूत सिद्धांतावर, तत्वांवर अटळ राहिलो आहोत. आपण राष्ट्रालाही एक कुटुंब म्हणून पाहतो आणि जगालाही एक कुटुंब मानतो, वसुधैव कुटुंबकम्, आणि म्हणून जेव्हा भारत आपल्या जी-20 अध्यक्षपदाची संकल्पना ठरवतो तेव्हा म्हणतो, त्याचे आदर्श, जगण्यासाठीचे त्याचे स्वरूप पहा, जी-20 अध्यक्षपदात भारत म्हणतो, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. जेव्हा भारत पर्यावरणाच्या रक्षणासाठी सौर ऊर्जेसाठी मोठी उद्दिष्टे ठेवतो, तेव्हा तो म्हणतो एक सूर्य, एक जग, एक ग्रीड.  जेव्हा भारत जागतिक समुदायाने निरोगी राहावे अशा कामना करतो, तेव्हा तो एक पृथ्वी, एक आरोग्य म्हणतो. भारत हा असा देश आहे ज्याने कोरोना संकटात जगातील 150 हून अधिक देशांमध्ये औषधे पाठवली. भारत हा असा देश आहे ज्याने 100 हून अधिक देशांना मोफत लस पाठवून करोडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. कोरोनाच्या काळात तुम्ही ज्या सेवाभावनेने इथे काम केले ते आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आज हुतात्म्यांचे मानबिंदू पाचवे शीख गुरू श्री गुरू अर्जुन देव जी, यांचे  शहीद पर्व आहे, सर्वांची सेवा करण्याची शिकवण आपल्याला गुरुजींच्या जीवनातून मिळते.  गुरु अर्जुन देवजींनीच दशवंध प्रथा सुरू केली. याच्याच प्रेरणेने कोरोनाच्या काळातही अनेक गुरुद्वारांच्या लंगरने येथील लोकांना मदत केली. या काळात येथील पीडितांसाठी अनेक मंदिरांची स्वयंपाकघरे उघडण्यात आली. ऑस्ट्रेलियात राहणारे आणि शिकणारे विद्यार्थीही मोठ्या संख्येने लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले. या काळात विविध सामाजिक संस्थांनीही अनेकांना मदत केली. भारतीय कोठेही राहोत, त्यांच्यात  मानवतेची  भावना कायम असते.

मित्रांनो,

मानव हिताच्या अशा कामांमुळेच आज भारताला विश्व हिताची शक्ती म्हटले जात आहे. जिथे कोठेही आपत्ती येते तिथे भारत मदतीला तत्पर असतो. जेव्हा जेव्हा संकट येते; तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी  भारत तयार असतो. आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून सौरऊर्जेचा वापर वाढवणे असो, परस्पर सहकार्यातून आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा निर्माण करणे असो, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे नेतृत्व करणे असो, भारताने नेहमीच वेगवेगळ्या देशांना एकत्र आणण्यासाठी एक सांधणारी शक्ती म्हणून काम केले  आहे. नुकताच तुर्कीएमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला तेव्हा भारताने ऑपरेशन दोस्तच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला. भारत आपले हित सर्वांच्या हिताशी जोडून पाहतो. सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न, हाच आपल्या देशांतर्गत प्रशासनाचा आधार आहे आणि जागतिक प्रशासनासाठीही हीच ध्येयदृष्टी आहे.

मित्रांनो,

आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी सतत दृढ होत आहे.  अलीकडेच आम्ही आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार ECTA वर स्वाक्षरी केली आहे. येत्या पाच वर्षांत दोघांमधील व्यापार दुपटीने वाढेल असा अंदाज आहे.  आता आम्ही सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावर काम करत आहोत.  आम्ही लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी तयार करत आहोत. यामुळे दोन्ही देशांच्या व्यवसायाला चालना तर मिळेलच, शिवाय जगालाही नवा विश्वास मिळेल.  आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अनेक थेट विमान उड्डाणे आहेत.  गेल्या काही वर्षांत उड्डाणांची संख्या वाढली आहे.  येत्या काही दिवसांत त्यांची संख्या आणखी वाढणार आहे. दोन्ही देश एकमेकांच्या पदव्यांना मान्यता देण्याबाबतही पुढे सरसावले आहेत आणि याचा आपल्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.  स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारावरही एक करार झाला आहे. यामुळे आपल्या कुशल व्यावसायिकांना ऑस्ट्रेलियात येऊन येथे काम करणे सोपे होईल आणि मित्रांनो, मी येथे आलोच आहे तेव्हा मी एक घोषणाही करणार आहे.  ब्रिस्बेनमधील भारतीय समुदायाची मागणी आता पूर्ण होणार आहे.  लवकरच ब्रिस्बेनमध्ये भारताचा नवीन वाणिज्य दूतावास उघडण्यात येणार आहे.

मित्रांनो,

भारत आणि ऑस्ट्रेलियाची घट्ट होत असलेली भागीदारी भारतमातेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला सक्षम करेल.  तुमच्याकडे प्रतिभा आहे, तुमच्या कौशल्याची ताकद आहे आणि तुमची सांस्कृतिक मूल्येही आहेत. ही मूल्ये तुम्हाला ऑस्ट्रेलियातील लोकांमध्ये मिसळून जाण्यात मदत करण्यात मोठी भूमिका बजावतात. मी कालच पापुआ न्यू गिनीहून आलो.  तिरुक्कुरल या तमिळ साहित्याचा स्थानिक भाषेतील अनुवादाचे मी तिथे लोकार्पण केले. हा अनुवाद तेथील भारतीय वंशाच्या स्थानिक गव्हर्नरने केला आहे.  परदेशात राहूनही आपल्याला आपल्या मुळांचा अभिमान असायला हवा, आपल्या मुळाशी जोडलेले राहावे, याचे हे जिवंत उदाहरण. तुम्ही इथे ऑस्ट्रेलियातही भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरवत आहात.  तुम्ही भारताचे सांस्कृतिक राजदूत आहात, ऑस्ट्रेलियातील भारताचे सदिच्छा दूत  आहात.

मित्रांनो,

मी माझे बोलणे संपवण्यापूर्वी मला तुम्हाला काही मागायचे आहे, तुम्ही द्याल?  आवाज जरा कमी झाला, द्याल?  पक्के?  वचन? मी तुम्हाला हे मागतोय  आणि मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही जेव्हाही भारतात याल, जेव्हाही तुम्ही भारतात याल तेव्हा आपल्यासोबत किमान एका   ऑस्ट्रेलियन मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला सोबत घेऊन या.  यामुळे त्यांना भारताला समजून घेण्याची आणि जाणून घेण्याची चांगली संधी मिळेल. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात, खूप दिवसांनी तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली, तुम्ही सर्वजण खूप आरोग्यदायी राहा, आनंदी रहा, आनंदी रहा, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!

माझ्यासोबत बोला 

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

खूप खूप धन्यवाद!

* * *

N.Chitale/JPS/Shraddha/Vijaya/Vinayak/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1926877) Visitor Counter : 188