गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद इथे मोदी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे केले उद्घाटन


मागील सरकारांनी नेहमीच ओबीसींना त्रास दिला आणि त्यांचा अपमान केला, पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजाला सन्मान देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आणि गेल्या 9 वर्षात ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली

यापूर्वी केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि NEET परीक्षेत ओबीसी आरक्षण नव्हते, पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ते सुनिश्चित केले आहे

पंतप्रधान मोदींनी सरकारच्या अनेक लोककल्याणकारी योजना डीबीटीशी जोडून आणि त्यांचे लाभ गरिबांच्या बँक खात्यात थेट जमा करून भ्रष्टाचार संपवला

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही अमेरिकेत खूप लोकप्रिय आहात आणि आम्हाला तुमची स्वाक्षरी हवी आहे”, असे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, तेव्हा प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटतो

Posted On: 21 MAY 2023 7:36PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद येथे मोदी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केले. आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि समाज आणि देश दोघांसाठी हे चांगले लक्षण आहे. आपले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सामर्थ्याच्या जोरावर या समाजाने आणखी प्रगती केली असून या समाजाला प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या समाजाला भगवान शंकराने स्वतः आशीर्वाद दिला आहे, असे शाह म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील प्रत्येक गावाला भेट देऊन तरुणांना प्रेरणा दिली आहे, आणि एक संघटना स्थापन करून गुजरातमध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक अतुलनीय संरचना निर्माण केली आहे. ते म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या लोककल्याणकारी कामांच्या जोरावर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, आणि आता पंतप्रधान म्हणून ते जगभरात भारताचा गौरव वाढवत आहेत.

अमित शाह म्हणाले की, मागील सरकारांनी ओबीसी समाजाची नेहमीच उपेक्षा आणि अपमान केला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजाला सन्मान देण्यासाठी स्वतः पुढाकार घेत गेल्या 9 वर्षात ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली.  भाजपाने अनेक ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्री केले आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा प्रदान केला आहे आणि पहिल्यांदाच ओबीसी समाजातील 27 मंत्र्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आला आहे, असेही अमित शाह म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पूर्वी केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि नीट परीक्षेत ओबीसींसाठी कोणतेही आरक्षण नव्हते, परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने याची तरतूद केली आहे.  ओबीसी प्रवर्गातील तरुण उद्योजकांसाठी भांडवली निधीची स्थापना करण्यात आली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने ओबीसी यादीत सुधारणा करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. आधीच्या सरकारच्या ५६ वर्षांच्या कारकिर्दीत ओबीसी समाजाचा सन्मान राखण्यासाठी एकही काम करण्यात आले नव्हते . मात्र, नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात ओबीसी समाजाचा  विकास करण्यासाठी आणि त्यांना त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत कारण स्वतः मोदी हे गरीब कुटुंबात जन्मले आणि लोकशाही प्रक्रियेतून या देशाचे पंतप्रधान झाले.  एवढी गरिबी पाहणारा माणूस पहिल्यांदाच या देशाचा पंतप्रधान झाला आहे. गरिबांचे दुःख समजून घेणारे  मोदी यांनी गरिबांना सर्व सुविधा दिल्या.  ते म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर समाजातील प्रत्येक घटकासाठी कसा करता येतो हे पंतप्रधान मोदींनी दाखवून दिले आहे.  ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तंत्रज्ञानाचा वापर करून गरीबातील गरीबांपर्यंत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत.  ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सरकारच्या अनेक लोककल्याणकारी योजना थेट लाभ हस्तांतरणाशी जोडून आणि विविध योजनांचा फायदा थेट गरिबांच्या बँक खात्यात पाठवून भ्रष्टाचार संपवला आहे.

जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही अमेरिकेत खूप लोकप्रिय आहात आणि मला तुमची स्वाक्षरी हवी आहे, तेव्हा प्रत्येक भारतीयाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो.  ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था जी पूर्वी जगात 11 व्या क्रमांकावर होती, ती आज 5 व्या क्रमांकावर पोहचली आहे. पंतप्रधान मोदींनी 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

***

R.Aghor/R.Agashe/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1926172) Visitor Counter : 118