माहिती आणि प्रसारण मंत्रालय

नारी शक्तीचा उदय होत आहे : डॉ. एल. मुरुगन

Posted On: 19 MAY 2023 5:30PM by PIB Mumbai

 

सध्या सुरु असलेल्या कान चित्रपट महोत्सवात आजच्या चौथ्या  दिवशी इंडिया पॅव्हिलिअनमध्ये  माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील महिलांची भूमिका यावर  प्रभावी सत्र पार पडले.  शी शाइन्सअशा यथायोग्य शीर्षकाच्या या सत्राचे सूत्रसंचालन अभिनेता निर्मात्या खुशबू सुंदर यांनी केले तर  अभिनेत्री ईशा गुप्ता, ग्रीक-अमेरिकन दिग्दर्शक डॅफ्ने श्मॉन यांच्यासह महिला केंद्रित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते मधुर भांडारकर आणि सुधीर मिश्रा हे वक्ते होते.

भारतीय चित्रपट एका सुंदर टप्प्यातून मार्गक्रमण करत असून यामध्ये महिला केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर निर्मात्या, दिग्दर्शिका आणि तंत्रज्ञ म्हणून महत्वाच्या भूमिका पार पाडत आहेत, असे सांगत अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी या संवादाचे प्रास्ताविक केले. 

नारी शक्तीसह  सर्जनशील अर्थव्यवस्थेविषयी बोलताना भांडारकर म्हणाले की जेव्हा तुमच्याकडे चित्रपटाची नायक एक महिला  असते, तेव्हा निधी उभारणे हे एक आव्हान असते, मात्र मी ज्या चित्रपटांची निर्मिती केली , त्या सर्वानी बॉक्स ऑफिस वर चांगली कामगिरी केली आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाले, त्यामुळे एका अर्थी मी भाग्यवान आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या चित्रपटात तुम्हाला अपेक्षित बजेट मिळत नाही पण जगभर अशीच परिस्थिती आहे.

"आम्ही अनुपम खेर आणि कुमुद मिश्रा यांच्याबरोबर माझी स्वतःची महिला पोलीस अधिकारी म्हणून मध्यवर्ती भूमिका असलेला चित्रपट करत होतो. मात्र या चित्रपटासाठी निधी मिळवणे अतिशय कठीण झाले होते, जेव्हा हा चित्रपट, चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने अजिबात चांगली कमाई केली नाही मात्र जेव्हा तो नेटफ्लिक्स वर आला तेव्हा तो मोठ्या प्रमाणावर बघितला गेला. म्हणजे प्रेक्षकांना महिलांच्या कथा बघायला आवडते, हे यावरून दिसून येते."असे ईशा गुप्ता यांनी आपला अनुभव कथन करताना सांगितले.

श्रुती हासनसोबत द आयचित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या डॅफ्ने श्मॉन म्हणाल्या," चित्रपट बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांपैकी 51 टक्के महिला असतात, हे मान्य करणे खरोखरच महत्वाचे आहे. आम्ही आमच्या कथा पडद्यावर पाहणे गरजेचे  आहे. आपण महिला दिग्दर्शक आणि अभिनेत्री असलेल्या चित्रपटांवर असण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आम्ही दरवर्षी 10 महिलांची निवड करतॊ आणि त्यांच्या चित्रपटासाठी त्यांना वित्त  पुरवठा करण्यासाठी सहाय्य करतो. एक कलाकार म्हणून पुरुष आणि महिलांना समान पातळीवर पाहणे महत्त्वाचे आहे."

विविध क्षेत्रांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कशाप्रकारे योगदान देत आहे याविषयी भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी माहिती दिली, "महिला खरोखर झळकत आहेत आणि चित्रपटांमध्ये त्या कायमच चमकदार कामगिरी करत राहतील. मी चित्रपटांकडे  पुरुषप्रधान किंवा स्त्रीप्रधान म्हणून पाहत नाही, मगलीर मट्टुम (केवळ महिला) नावाचा एक तमिळ चित्रपट होता ज्यामध्ये महिलांची मध्यवर्ती पात्रे होती आणि तो चित्रपट  खरोखरच चांगला चालला. महिला निर्मात्यांना समर्पित असा शी शॉर्ट फिल्म लघुपट महोत्सव आहे, ऐश्वर्या सुंदरने तयार केलेल्या अॅनिमेशन फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, आणि गुनीतला ऑस्कर पुरस्कार मिळाला. मला वाटते, चित्रपट क्षेत्रात एक सुंदर जागा तयार करण्यात आपल्या महिला आधीच यशस्वी झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नारी शक्तीचा उदय होत आहे."

भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, एन एफ डी सी ने 100 पेक्षा  अधिक महिला निर्मात्यांना दिलेले प्रशिक्षण आणि 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो म्हणजेच उद्याची 75 सृजनशील व्यक्तिमत्वेया कार्यक्रमात 70 टक्क्यांहून अधिक सहभाग महिलांचा होता, याविषयी डॉ मुरुगन यांनी माहिती दिली.

"महिला शक्तीला समर्पित केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत." असे सांगून त्यांनी आपल्या संभाषणाचा समारोप केला.

***

S.Kane/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1925588) Visitor Counter : 175