नागरी उड्डाण मंत्रालय
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातर्फे विंग्ज इंडिया 2024 या कार्यक्रमाचा कर्टन रेझर सोहोळ्याचे आयोजन
Posted On:
19 MAY 2023 3:14PM by PIB Mumbai
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या सहकार्याने काल 18 मे 2023 रोजी नवी दिल्ली येथे विंग्ज इंडिया 2024 या कार्यक्रमाचा कर्टन रेझर अर्थात पूर्वरंग सोहळा आयोजित केला.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी या सोहोळ्याचे तसेच जाहिरातपर व्हिडिओचे उद्घाटन केले तसेच विंग्ज इंडिया 2024 ची माहिती देणारी माहितीपुस्तिका जारी केली.

याप्रसंगी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया म्हणाले की, सरकारने पूर्वीच्या नियामकाच्या भूमिकेऐवजी सुविधादात्याची भूमिका स्वीकारून देशाच्या जलदगतीने विकसित होणाऱ्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या बाजारासाठी क्षमता निर्मितीवर विशेष भर दिला आहे.

नवी दिल्ली येथे गुरुवारी झालेल्या विंग्ज इंडिया 2024 या कार्यक्रमाच्या कर्टन रेझर सोहोळ्यात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री म्हणाले की, सरकारने या क्षेत्राच्या प्रगतीसाठी क्षमता निर्मिती, अडथळ्यांचे निराकरण आणि प्रक्रियांमध्ये सुलभता आणणे अशा तीन सूत्री धोरणाचा अवलंब केला असून त्यामुळे गेल्या 9 वर्षांत विमानतळांची संख्या 74 वरुन 148 वर पोहचण्यास मदत झाली आहे. या उद्योगांसाठी लक्ष्य निश्चित करत केंद्रीय मंत्री म्हणाले की, येत्या 3 ते 4 वर्षांत देशातील विमानतळे, हेलीपोर्ट्स आणि वॉटरड्रोम्स यांची संख्या 200 हून अधिक होईल अशी अपेक्षा आहे.

हैदराबाद येथे 18 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत होणारा हा विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रम वाणिज्य, सामान्य आणि व्यापारी हवाई वाहतुकीसंदर्भातील आशियातील नागरी हवाई वाहतूक क्षेत्रावरील सर्वात भव्य कार्यक्रम असेल अशी अपेक्षा आहे. सहकार्याला प्रोत्साहन, नवोन्मेषांचे प्रदर्शन आणि व्यापार संधींचा शोध या उद्देशांसह, जगभरातील हवाई वाहतूक उद्योगांचे प्रतिनिधी तसेच विविध भागधारक विंग्ज इंडिया 2024 मध्ये एकत्र येतील.
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1925537)