माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते शिमला इथे नियुक्तीपत्रांचे वितरण
देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी संपूर्ण समर्पण आणि दृढनिष्ठेने काम करा : अनुराग ठाकूर
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2023 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात रोजगारनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, या अभियानाअंतर्गत देशभरात आज 45 ठिकाणी रोजगार मेळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात, पंतप्रधानांनी नवनियुक्त उमेदवारांना दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे दिली.
हिमाचल प्रदेशात, माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, यांच्या हस्ते, 28 युवकांना विविध पदांवरील नोकऱ्यांसाठीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. शिमला इथे गेईटी हेरिटेज कल्चरल कॉम्प्लेक्स मध्ये हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय स्तरावर आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, ह्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण शिमल्यातही करण्यात आले होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी नवनियुक्त उमेदवारांना मार्गदर्शनही केले.
रोजगार मेळाव्यात, नवनियुक्त उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले, तसेच, सरकारी विभागातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, संपूर्ण समर्पित वृत्ती आणि एकनिष्ठेने काम करावे, असा सल्ला त्यांनी या नवनियुक्तांना दिला. देशातील युवकांना अधिकाधिक रोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक पावले उचलली असून त्याद्वारे देशात 10 लाख नोकऱ्या दिल्या जात आहेत, असे अनुराग ठाकूर म्हणाले. या नवनियुक्त नोकरदारांना ‘कर्मवीर’ असं म्हटलं जात असून,हे भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून लोकसेवक म्हणून काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकारी क्षेत्रात सहभागी झाल्यावर समाज आणि नागरिकांप्रती जबाबदारी वाढते, जी पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
केंद्र सरकारने सरकारी सेवांमध्ये 10 लाख नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावर रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. या रोजगार मेळ्यांमध्ये देशभरात आतापर्यंत एकूण 2 लाख 88,000 नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. रिक्त पदे भरण्याचे काम करण्यासाठी राज्य सरकारांनाही प्रोत्साहन दिले जात आहे.

S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1924603)
आगंतुक पटल : 195