माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन 16 ते 27 मे या कालावधीत होणाऱ्या कान चित्रपट महोत्सवात शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार


ऑस्कर विजेत्या निर्माती गुनीत मोंगा (एलिफंट व्हिस्परर्स) व अभिनेत्री मानुषी छिल्लर रेड कार्पेटवर

सरस्वती यंत्राची प्रेरणा घेऊन अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कडून इंडिया पवेलियन(मंडप)ची निर्मिती

कान्स चित्रपट महोत्सवासाठी अधिकृत निवडीमध्ये चार भारतीय चित्रपटांचा समावेश, मणिपुरी चित्रपट ‘इशानहौ’ क्लासिक चित्रपट विभागात प्रदर्शित होणार

नोव्हेंबर 2023 मध्ये साजऱ्या होणाऱ्या 54 व्या इफ्फी (IFFI) चित्रपट महोत्सवाचे पोस्टर आणि ट्रेलर या महोत्सवात प्रदर्शित होणार

Posted On: 14 MAY 2023 1:31PM by PIB Mumbai

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यावर्षीच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. कान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी रेड कार्पेटवर पारंपारिक तमिळ पोशाख 'वेष्टी' मध्ये चालणाऱ्या, आपली समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या डॉ. मुरुगन यांच्यासोबत द एलिफंट व्हिस्परर्स या प्रसिद्ध चित्रपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा, भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि 2017च्या मिस वर्ल्ड पुरस्कार विजेत्या मानुषी छिल्लर, भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता आणि प्रसिद्ध मणिपुरी अभिनेता कंगाबम तोंबा - ज्यांचा नव्याने संचयित झालेला चित्रपट 'इशानौ' यावर्षी कान चित्रपट महोत्सवात क्लासिक विभागात प्रदर्शित होत आहे, हे सर्व रेड कार्पेटवर असतील.

अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, यांच्या माध्यमातून जागतिक समुदायासमोर शोकेसिंग इंडियाज क्रिएटिव्ह इकॉनॉमीसंकल्पना घेऊन इंडिया पॅव्हेलियनची रचना केली जात आहे. या पॅवेलियनची (मंडपाची) रचना ही सरस्वती यंत्राची प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. ज्यामध्ये देवी सरस्वतीचे अमूर्त रूप, ज्ञान, संगीत, कला, वाणी, बुद्धी आणि विद्येची रक्षक अशी विविध रूपे दाखवण्यात आली आहेत. या मंडपाची छटा भारताच्या राष्ट्रध्वजाच्या भगवा, पांढरा, हिरवा आणि निळा या रंगांपासून निर्माण करण्यात आलेली आहे. देशाच्या सामर्थ्य आणि धैर्यासाठी केशरी, आंतरिक शांती आणि सत्यासाठी पांढरा, भूमीची सुपीकता, वाढ आणि शुभता दर्शवण्यासाठी हिरवा तसेच धर्म आणि सत्याची प्रेरणा देणारा निळा, अशी रंगछटा वापरून हे तयार करण्यात आले आहे. भारतात प्रतिभेचा मोठा साठा आहे आणि भारतीय पॅव्हेलियन भारतीय चित्रपट समुदायाला वितरण करार, ग्रीनलाइट स्क्रिप्ट्स, क्रॅक प्रोडक्शन सहयोग आणि मनोरंजन तसेच माध्यम क्षेत्रातल्या जगातील प्रमुख संघटना यांच्यासोबत सहयोग आणि सहकार्य मिळवण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे या कान चित्रपट महोत्सवाच्या 76व्या पर्वात भारताला कंटेंट निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी व्हिडिओ संदेशाद्वारे उद्घाटन सत्राला संबोधित करतील.

कान चित्रपट महोत्सवामध्ये चार भारतीय चित्रपटांची अधिकृत निवड झाली आहे. कनू बहल यांचा आग्रा; हा त्यांचा दुसरा चित्रपट असेल, ज्याचा कान येथे डायरेक्टर्स फोर्टनाइट विभागात वर्ल्ड प्रीमियर होईल. 2014 सालचा पहिला चित्रपट तितली, 'अन सर्टेन रिगार्ड' विभागात प्रदर्शित करण्यात आला होता. अनुराग कश्यपचा केनेडी, हा चित्रपट मिडनाईट स्क्रिनिंग्ज आणि नेहेमिच फेस्टिव्हल डी कानच्या ला सिनेफ विभागात दाखवला जात आहे. याशिवाय, मार्चे डू फिल्म्समध्ये अनेक भारतीय चित्रपट प्रदर्शित केले जातील.

नव्याने संचयित केलेला मणिपुरी चित्रपट इशानहौ’, ‘क्लासिकविभागात प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट यापूर्वी महोत्सवाच्या 'अन सर्टेन रिगार्ड' विभागात 1991 मध्ये दाखवण्यात आला होता आणि त्याची फिल्म रिल्स नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाने जतन केली होती. मणिपूर स्टेट फिल्म डेव्हलपमेंट सोसायटीने फिल्म हेरिटेज फाऊंडेशन आणि प्रसाद फिल्म लॅब्सद्वारे चित्रपट पुनर्संचयित केला आहे.

फेस्टिव्हल डी कान आणि मार्चे डू फिल्म्स या दोन्ही विभागांमध्ये दाखवल्या जाणार्‍या भारतीय चित्रपटांचा सुंदर मिलाप भारतीय चित्रपटाचा इतिहास खऱ्या अर्थाने किती प्राचीन आहे हे अधोरेखित करतो.

या संपूर्ण महोत्सवात इंडिया पॅव्हेलियन येथे संवादात्मक सत्रांची शृंखला आयोजित केली जाईल. यामधील नियोजित प्रमुख सत्रे आहेत-

  • संपूर्ण फिल्मिंग डेस्टिनेशन म्हणून भारताला प्रस्तुत करणे आणि ग्लोबल फिल्म कमिशनसह सह-निर्मिती गुंतवणूक भारतात चित्रीकरणाला चालना देईल. हे केवळ आपल्या चित्रपट क्षेत्राच्या वाढीला चालना देणार नाही तर, यामध्ये देशातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याची क्षमता देखील आहे. गेल्या वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन निधीमुळे अनेक चित्रपट निर्माते भारतात येण्यासाठी प्रवृत्त होतील.
  • राष्ट्रांमधील वितरण सहयोग सुलभ झाल्याने जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुकर होईल, त्याचबरोबर जगातील इतर प्रमुख चित्रपट बाजार आणि महोत्सवांमध्ये सहभागी होणे, आणि IFFI साठी समन्वय तयार करणे सोपे होईल.
  • शी शाईन्स: मधून चित्रपटसृष्टीतील महिलांचे योगदान  अधोरेखित होईल. चित्रपट निर्मितीमध्ये महिलांची उपस्थिती ही केवळ रोजगारापेक्षा अधिक लक्षणीय आहे, ती एका मोठ्या सांस्कृतिक सभ्यतेला हातभार लावते ही भावना अधिक जागृत होईल.
  • इफ्फी 2020 मध्ये तरुण चित्रपट कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारोया आधारावर नव्या सत्राची सुरुवात झाली आहे, ज्यामुळे इफ्फीची यशोगाथा प्रदर्शित होईल आणि त्या माध्यमातून इफ्फी साठी अधिक सहकार्य मिळण्यास मदत मिळेल.

कान्स हे भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांसाठी नेहमीच खास राहिले आहे आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी ते एक प्रतिष्ठित स्थान असेल. गेल्या वर्षी, मार्चे डु कान्समध्ये भारताला कंट्री ऑफ ऑनरहा सन्मान देण्यात आला होता. आता या वर्षीच्या ऑस्कर मधील भारतीय चित्रपटांच्या यशामुळे, ज्यामध्ये आरआरआर RRR या चित्रपटाने आधीच जगाला,"नाटू नाटू" वर नृत्य करायला भाग पाडले आहे तर द एलिफंट व्हिस्परर्स या सर्वोत्कृष्ट माहितीपटाने शॉर्ट फिल्म विभागात ऑस्कर जिंकून आपल्या भारतीय कथांची वाढती पोहोच दाखवून दिली आहे .

***

S.Pophale/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924037) Visitor Counter : 235