वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
शांघाय सहकार्य संघटना(एससीओ) स्टार्टअप फोरम 2023
एससीओ स्टार्टअप फोरमची तिसरी आवृत्ती एससीओ सदस्य देशांमधील स्टार्ट अप्सचा जागतिक सहभाग वाढवण्यावर आणि नवोन्मेषावर देणार भर
Posted On:
11 MAY 2023 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2023
आभासी माध्यमातून दोन वेळा झालेल्या यशस्वी आयोजनानंतर, वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या स्टार्टअप इंडियाने पहिल्यांदाच प्रत्यक्ष उपस्थितीच्या माध्यमातून शांघाय सहकार्य संघटना(एससीओ) स्टार्टअप फोरमच्या तिसऱ्या आवृत्तीचे नुकतेच नवी दिल्लीत आयोजन केले. एससीओ सदस्य देशांमध्ये स्टार्टअपविषयक संवादाची व्याप्ती वाढावी, नवोन्मेषी वृत्तीची जोपासना व्हावी, अधिक रोजगार निर्माण व्हावेत आणि नवोन्मेषी तोडगे काढण्यासाठी युवा वर्गाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या फोरमचे आयोजन करण्यात आले.
या फोरममध्ये सरकारी अधिकारी, खाजगी उद्योग क्षेत्रातील अग्रणी, इनक्युबेटर्स आणि स्टार्टअप यांच्या एका शिष्टमंडळासह एससीओ सदस्य देश प्रत्यक्ष उपस्थितीद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी यामध्ये मुख्य भाषण केले. यामध्ये त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये स्टार्टअपची भूमिका अधोरेखित केली. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या संयुक्त सचिव मनमीत कौर नंदा यांनी या शिष्टमंडळाला भारताच्या स्टार्टअप प्रवासाबाबत आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार राबवत असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली.
याशिवाय या शिष्टमंडळाचे सदस्य स्टार्टअप इंडियाने ‘स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्यामध्ये द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागीदारीची भूमिका’ या विषयावर आयोजित केलेल्या एका कार्यशाळेतही सहभागी झाले. सदस्य देशांमध्ये घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यासाठी विविध उपक्रमांना विचारात घेण्याविषयीच्या आणि एससीओ देशांमध्ये स्टार्टअप परिसंस्थेला चालना देण्याविषयीच्या संवादात्मक सत्रांचा या कार्यशाळेत समावेश होता. अशा प्रकारच्या संवादांमध्ये नेतृत्व करून भारताने नवोन्मेषाचा विस्तार, संपूर्ण परिसंस्थेची एकत्र गुंफण आणि एससीओच्या इतर सदस्य देशांनी अशाच प्रकारचे कार्यक्रम हाती घ्यावेत म्हणून प्रोत्साहन देण्याची एक संधी म्हणून या फोरमचा वापर केला.
S.Bedekar/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923456)
Visitor Counter : 193