वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यापार आणि गुंतवणूकविषयक सहावा भारत-कॅनडा आंतरमंत्रालयीन संवाद संपन्न, समन्वयीत गुंतवणुकीला प्रोत्साहन तसेच माहितीच्या आदानप्रदानासाठी सहकार्य वाढवण्यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि मेरी एनजी यांचे एकमत


महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळीतील लवचिकता वाढविण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये परस्पर समन्वय महत्त्वाचा : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

कॅनडा-भारत सीईओ मंचाच्या कार्याबाबत नव्याने विचार करून या मंचाचे काम पुन्हा सुरु करण्यासंदर्भात दोन्ही मंत्र्यांनी केली चर्चा

Posted On: 10 MAY 2023 10:10AM by PIB Mumbai

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, निर्यात प्रोत्साहन, लघु उद्योग आणि आर्थिक विकास मंत्री मेरी एनजी यांच्या सह-अध्यक्षतेखाली 8 मे 2023 रोजी ओटावा येथे व्यापार आणि गुंतवणूकविषयक सहावा भारत-कॅनडा आंतरमंत्रालयीन संवाद संपन्न झाला. यावेळी बोलताना दोन्ही मंत्र्यांनी भारत आणि कॅनडा या देशांदरम्यानच्या व्यापार आणि आर्थिक संबंधांच्या बळकट पायावर अधिक भर दिला. या देशांच्या दरम्यान असलेले द्विपक्षीय संबंध आणि आर्थिक भागीदारी आणखी सशक्त करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या संधींवर देखील त्यांनी चर्चा केली.
कॅनडाच्या मंत्री मेरी एनजी यांनी भारताच्या जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाला तसेच या काळात जी-20 व्यापार आणि गुंतवणूक विषयक कृतिगटातर्फे हाती घेण्यात आलेल्या प्राधान्याक्रमांना पाठींबा व्यक्त केला. येत्या ऑगस्ट 2023 मध्ये भारतात होणार असलेल्या जी-20 व्यापार आणि गुंतवणूक विषयक मंत्रीस्तरीय बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भारत-कॅनडा यांच्यातील वस्तूंचा  द्विपक्षीय व्यापार वर्ष 2022 मध्ये 8.2 डॉलर्सपर्यंत पोहोचला असून 2021 मधील व्यापाराशी तुलना करता त्यात 25% वाढ नोंदवण्यात आली आहे. यावेळच्या चर्चेत दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संबंध बळकट करण्यात सेवा क्षेत्राने दिलेले योगदान अधोरेखित केले आणि वर्ष 2022 मध्ये 6.6 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या आणि सतत वाढत असलेल्या द्विपक्षीय सेवा व्यापार क्षेत्रातील लक्षणीय क्षमतेकडे निर्देश केला.
पायाभूत सुविधा विकास, महत्त्वपूर्ण खनिजे, विजेवर चालणारी वाहने आणि बॅटऱ्या, नवीकरणीय उर्जा/हायड्रोजन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्यासाठी स्वच्छ तंत्रज्ञान वापरासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढविण्यावर दोन्ही मंत्र्यांनी यावेळच्या चर्चेदरम्यान अधिक भर दिला. दोन्ही मंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना द्विपक्षीयदृष्ट्या महत्त्वाच्या व्यापारविषयक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नियमितपणे चर्चा करण्याचे निर्देश दिले.
दोन्ही नेत्यांनी यावेळी भारत-कॅनडा मुक्त व्यापार करारातील वाटाघाटींच्या सात फेऱ्यांमध्ये आतापर्यंत झालेल्या वाटाघाटींच्या प्रगतीचा आढावा घेतला. इतर अनेक बाबींसह, ईपीटीए मध्ये वस्तू, सेवा, गुंतवणूक,उत्पत्तीचे नियम, स्वच्छता आणि फायटोसॅनिटरी उपाययोजना, व्यापारातील तांत्रिक अडथळे आणि तक्रार निवारण यांच्या संदर्भात वचनबद्धतांचा समावेश आहे आणि जेथे परस्पर संमती आहे अशा इतर अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश होऊ शकतो याला दोन्ही मंत्र्यांनी दुजोरा दिला.
 

महत्त्वाचे परिणाम
या संवादादरम्यान नजीकच्या भविष्यकाळात, शक्यतो वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत सामंजस्य कराराच्या माध्यमातून समन्वयीत गुंतवणूक प्रोत्साहन, माहितीचे आदानप्रदान तसेच परस्पर पाठींबा अशा उपाययोजनांच्या माध्यमातून वाढीव सहकार्याच्या शक्यतांचा शोध घेण्यावर दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली.
महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळीतील लवचिकता वाढविण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये परस्पर समन्वय महत्त्वाचा आहे यावर दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाले. तसेच परस्पर स्वारस्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी टोरांटो येथे होत असलेल्या प्रॉस्पेक्टर्स अँड डेव्हलपर्स असोसिएशन कॉन्फरन्स (पीडीएसी) च्या काळात अधिकृत पातळीवर वार्षिक संवाद सुरु करण्याप्रती देखील त्यांनी प्रतिबद्धता व्यक्त केली.
कॅनडा-भारत सीईओ मंचाच्या कार्याबाबत  नव्याने विचार करून या मंचाचे काम नवीन एकाग्रता आणि प्राधान्याक्रमांच्या नव्या संचासह पुन्हा सुरु करण्यासंदर्भात दोन्ही मंत्र्यांनी संमती दर्शविली. परस्पर संमतीने निश्चित केलेल्या लवकरच्या तारखेला सीईओ मंचाची घोषणा होऊ शकते. दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारी भागधारकांचा सहभाग वाढविण्यासाठी सीईओ मंचाचा उत्कृष्ट वापर होऊ शकेल.
ऑक्टोबर 2023 मध्ये भारतात येणाऱ्या कॅनडा  व्यापार मोहिम शिष्टमंडळाचे नेतृत्व  त्या स्वतः करणार असल्याची घोषणा मंत्री मेरी एनजी यांनी केली. त्या म्हणाल्या की या मोहिमेसाठी त्यांच्या देशातील व्यापार क्षेत्रातील मोठमोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींना त्या सोबत घेऊन येणार असल्यामुळे  दोन्ही देशां दरम्यान असलेले व्यापार तसेच गुंतवणूकविषयक बंध आणखी वाढविण्याची संधी निर्माण होईल.
भारत आणि  कॅनडा यांच्यातील लक्षणीय प्रमाणातील आवागमन आणि द्विपक्षीय आर्थिक भागीदारी वाढविण्यात मोठमोठे व्यावसायिक आणि कुशल कामगार, विद्यार्थी तसेच व्यापारासाठी प्रवास करणारे यांचे  मोठे योगदान  आहे  याचा उल्लेख दोन्ही मंत्र्यांनी यावेळी केला.  या दोन देशांतील व्यक्तींचे स्थलांतर आणि प्रवास यासंदर्भात  अधिक चर्चा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
द्विपक्षीय नवोन्मेष परिसंस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रतिभा आणि नवोन्मेष भागीदारीबाबत चर्चा करण्यासाठी योग्य यंत्रणा उभारण्यासंदर्भात दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली.  
एमडीटीआय अंतर्गत स्थापन केलेल्या यंत्रणेतून झालेली प्रगती तसेच दोन्ही बाजूंकडून  त्याचा पाठपुरावा यांचा आढावा घेण्यासाठी एक वार्षिक कृतियोजना आखण्यात येणार असून नियमित तत्वावर या योजनेचा आढावा घेऊन अहवाल देण्यात येणार आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील व्यापार तसेच गुंतवणूक विषयक संबंधांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून घेण्यासाठी संबंधित क्षेत्रांदरम्यान बंध निर्माण करून सहकार्य बळकट करण्याला सातत्यपूर्ण वेग देण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न करण्यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती व्यक्त केली.
या बैठकीनंतर संयुक्त निवेदन देखील  जारी करण्यात आले.

***

JaideviPS/SanajnaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923069) Visitor Counter : 165