गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
शहरांमधले कचऱ्याचे ढीग दूर करून शहरांचे सौंदर्यीकरण
Posted On:
04 MAY 2023 2:51PM by PIB Mumbai
शहरांचे रूप पालटण्यासाठी आणि ती सुंदर करण्यासाठी कचराकुंड्या आणि उघड्यावरील कचऱ्याच्या जागा यांचे वेगाने रूपांतर घडवले जात आहे. स्वच्छ भारत अभियान शहरी 2.0 अंतर्गत, पर्यावरणाचे संरक्षण आणि आरोग्याला उद्भवणारे धोके कमी करण्यासाठी शहरी भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे सुशोभित जागेत रूपांतर करणे ही काळाची गरज असल्याचे लक्षात आले. शहरी भागातील या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे रूपांतर आणि सुशोभीकरण करण्यासाठी अनेक राज्ये सर्जनशील पावले उचलत आहेत. यामुळे शाश्वत विकास आणि आरोग्यदायी, पर्यावरणपूरक भविष्याकडे वाटचाल होते.
भोपाळची क्षेपणभूमी हे शहर परिवर्तनाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेली भोपाळ ते दिल्ली दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस भोपाळमधील पूर्वी क्षेपणभूमी असलेल्या आणि आता हरित क्षेत्रात रूपांतर झालेल्या 37 एकर सुशोभित परिसरावरून मार्गक्रमण करते.
नवी मुंबईने शहरातले वापरले न जाणारे क्षेत्र उपयोगात आणून घडवले परिवर्तन
नवी मुंबई महानगरपालिकेने पुल/उड्डाणपुलाखालील परिसर सामुदायिक करमणुकीच्या सुविधांमध्ये रूपांतरित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी अभिनव दृष्टिकोन अवलंबला. याचे उदाहरण नवी मुंबईतील सानपाडा उड्डाणपुलाखाली बांधण्यात आलेल्या सार्वजनिक क्रीडा संकुलात पाहायला मिळते. पुलाच्या उंचीनुसार एक क्रीडासंकुल तयार करण्यात आले. तिथे बास्केटबॉल कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, बॉक्स क्रिकेट क्षेत्र आणि स्केटिंगसाठीचा विशेष पृष्ठभाग हे सर्व आकर्षक रंगात रंगवले गेले. यामुळे हा परिसर अतिशय आकर्षक आणि सुंदर झाला. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी संकुलात सुरक्षा जाळ्याही लावण्यात आल्या.
सानपाडा उड्डाणपूल प्रकल्पाच्या यशामुळे नवी मुंबईला भविष्यात असे आणखी प्रकल्प राबविण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. घणसोली-तळवली पुलाला गेल्या वर्षी रंगरंगोटी आणि नवीन प्रकाशयोजना याद्वारे नवे रूप देण्यात आले . यावर्षी या परिसराचे रूपांतर उद्यान आणि औद्योगिक कामगारांसाठी आसन व्यवस्थेकरिता होणार आहे. सानपाडा पुलाच्या दुसऱ्या पट्ट्यात योग केंद्र असेल आणि सीवूड्स पूल येथे क्रीडा संकुलासह सुशोभीकरण मोहीम राबवली जाईल.
कचराकुंडी हटवण्यासाठी सुरतचा सर्जनशील उपक्रम
सुरतमध्ये कचरा कुंड्यांच्या जागेचे लोकांसाठी बसण्याच्या जागेमध्ये केलेले रूपांतर हे एक उल्लेखनीय परिवर्तन आहे.कचरा कुंड्या हटवत सुरत महानगरपालिकेने यापैकी अनेक ठिकाणी कचरा टाकण्याच्या जागांचे रूपांतर बसण्याच्या जागेत केले. या उपक्रमांतर्गत सुरतने कचऱ्याचे ढीग साठणाऱ्या जागा निश्चित केल्या आणि त्या ठिकाणी बसण्यासाठी बाक , दिवे आणि कचरापेटी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच हरित क्षेत्र निर्माण करण्यासाठी आणि जैवविविधतेला चालना देण्यासाठी झाडे-झुडपे लावली आहेत.‘संजय नगर सर्कल’ हे अशा कायापालटाच्या काही उदाहरणांपैकी एक आहे. इथे सुरत महानगरपालिकेने कचरा टाकण्याच्या जागेचे बसण्यासाठीच्या सुंदर जागेत रूपांतर केले आहे.
पटणाचा स्वच्छता प्रवास: कचराकुंड्या ते हरित क्षेत्र
पटणा शहरामध्ये अनेक दिवसांपासून कचरा कुंड्यांची संख्या वाढली होती. या कचऱ्याच्या ढिगांचे हरित क्षेत्रामध्ये रुपांतर करण्यासाठी आणि शाश्वत पर्यावरणाला चालना देण्यासाठी, पटणा महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कचराकुंडी परिवर्तन मोहीम सुरू केली , या मोहिमेमध्ये संपूर्ण शहरातील एकूण 630 कचराकुंड्याची ठिकाणे स्वच्छ आणि सुशोभित करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर कचराकुंड्या हटवण्याची मोहीम शहरातील मोठी घडामोडी ठरली.
त्यानंतर पटणा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक 19 विभागांमधील 19 प्रभागांसह 4 टप्प्यांमध्ये परिवर्तन मोहीम राबविण्यात आली.
पटणा महानगरपालिकेने अशा ठिकाणांचे हरित क्षेत्रात रूपांतर करून कचराकुंड्यांचे परिवर्तन मोहीम सुरू केली.स्वच्छ केलेल्या जागेवर रोपटी लावून रंगरंगोटी करून तसेच रबरी नळ्या, चाके , डबे आणि इतर प्लास्टिक सामग्रीसारख्या टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली बसण्याची बाके लावून या जागा सुशोभित करण्यात आल्या.
अनेक कचरा कुंड्यांचे सेल्फी पॉइंट मध्ये रूपांतरही झाले. त्यानंतर पटणा महानगरपालिकेने कचऱ्याकुंड्यांचे परिवर्तन करून सुशोभित केलेल्या जागांवर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लिट्टी चोखा कार्यक्रम, मकर संक्रांतीच्या दिवशी दही चुरा आणि पतंग महोत्सवासह विविध सण आणि कार्यक्रम साजरे केले.
कचरा कुंड्यांचे सुंदर शहरी जागांमध्ये रूपांतर करणे हे शहरांमधील पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने, नाविन्यपूर्ण कल्पना आणि सामुदायिक सहभाग कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतॊ याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.. ही प्रक्रिया केवळ स्थानिकांचे जीवनमानच सुधारत नाही तर सर्वांसाठी शाश्वत आणि हरित पर्यावरण निर्माण करते.
***
S.Kane/S.Kakade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922015)
Visitor Counter : 226