संरक्षण मंत्रालय

मालदीवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी यांच्या निमंत्रणावरून मालदीवच्या दौऱ्यावर गेलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन

Posted On: 03 MAY 2023 4:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मे 2023

  1. मालदीवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एक मे 2023 रोजी,मालदीवची राजधानी माले इथे पोहोचले.
  2. या भेटीदरम्यान राजनाथ सिंह आणि मारिया दीदी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत, संरक्षण सहकार्य वाढवणे आणि दोन्ही देशांमधील, दीर्घकालीन भागीदारी अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. त्याशिवाय परस्पर हिताच्या अनेक प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेविषयीच्या मुद्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
  3. ह्या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा व्यवस्था अबाधित ठेवण्याचे महत्व दोघांनीही मान्य केले तसेच, सामाईक सुरक्षेला असलेल्या आव्हानांचा प्रभावी सामना करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्याच संदर्भात, आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय नियमांप्रति आदर व्यक्त करत त्यांचे पालन करण्याची कटिबद्धता व्यक्त करण्यात आली.
  4. दोन्ही देशांच्या सैन्यांचा संयुक्त सराव आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या भेटींच्या देवाणघेवाणीसह शेजारी देशांमधील संरक्षण सहकार्यामध्ये झालेल्या प्रगतीचे दोन्ही मंत्र्यांनी स्वागत केले. दहशतवादविरोधी कारवाया, आपत्ती व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि सागरी सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम पद्धती आणि कौशल्य सामायिक करण्याचे महत्त्व  देखील अधोरेखित करण्यात आले.
  5. परस्पर सहकार्यासाठीचे अतिरिक्त मार्ग शोधण्याविषयीही सहमती झाली. यात संरक्षणविषयक व्यापार, क्षमता बांधणी आणि संयुक्त सराव अशा क्षेत्रांचा विचार करण्यात आला. तसेच, लोकांमधील संपर्क आणि लष्करी दलातील देवाण-घेवाण वाढवण्यावर देखील चर्चा झाली.
  6. या दौऱ्यादरम्यान, राजनाथ सिंह यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलिह यांची औपचारिक भेट घेतली आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांची भेट घेतली.
  7. त्याशिवायराजनाथ सिंह आणि मंत्री दीदी, मालदीवचे राष्ट्रपती एच.ई. सोलिह यांच्या उपस्थितीत हुरावीसाठी नव्या बदली जहाजाच्या लोकार्पण समारंभाला उपस्थित होते. राष्ट्राध्यक्ष सोलिह यांच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीदरम्यान भारताचे पंतप्रधान मोदी यांनी जुन्या झालेल्या हुरावी जहाजाच्या जागी नवे जहाज देण्याची घोषणा केली होती.
  8. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एमएनडीएफ ला अतिरिक्त लँडिंग क्राफ्ट देखील भेट दिले. भारताच्या सागर म्हणजेच, सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाच्या दृष्टीकोनाला अनुसरून मालदीवला ही भेट देण्यात आली. सुरक्षित, समृद्ध आणि स्थिर अशा हिंद महासागर क्षेत्रासाठी सर्व मित्र आणि भागीदारांच्या क्षमता एकत्रितपणे विकसित करण्याचा आणि एकत्रितपणे विकसित करणे असा भारताच्या सागर अभियानाचा उद्देश आहे.
  9. एमएनडीएफ च्या तटरक्षक दलाच्या, ‘एकता बंदर’ या बंदराची पायाभरणी देखील राजनाथ सिंह आणि मारिया दीदी यांच्या हस्ते झाली. तटरक्षक दलाचे हे बंदर आणि सिफआयवारू इथे असलेली जहाज दुरुस्ती सुविधा, भारताच्या आर्थिक अनुदानातून मालदीव इथे सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे.
  10. दौऱ्याच्या समाप्तीपूर्वी, राजनाथ सिंह यांनी त्यांचे आणि त्यांच्यासह गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे मालदीवमध्ये करण्यात आलेल्या स्नेहमय स्वागत आणि आदरातिथ्य याबद्दल आभार व्यक्त केले.
  11. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशांमधील भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच, भविष्यात संवाद आणि सहकार्य सुरू ठेवण्यास उत्सुक असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या.
  12. या भेटीमुळे आपापल्या देशांची आणि एकूणच हिंद महासागर प्रदेशाची सुरक्षा तसेच समृद्धी वाढवण्यासाठी दोन मित्र देशांमध्ये बांधिलकीची भावना नव्याने निर्माण झाली.

 

 

 

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1921681) Visitor Counter : 169