शिक्षण मंत्रालय
‘मन की बात’ द्वारे शिक्षण क्षेत्रात परिवर्तन
Posted On:
30 APR 2023 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2023
‘मन की बात’ने समाजातील सर्व घटकांवर प्रभाव टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रासमोर ठेवलेली महान उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योगदान देण्याची प्रेरणा, यामुळे या घटकांना मिळाली आहे.
मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विविध शैक्षणिक पैलूंसह, या क्षेत्रासमोरील समस्या , वस्तुस्थिती आणि आकडेवारी या बाबी देशासमोर आणल्या आणि प्रत्येक वेळी त्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. समाजाच्या सर्व घटकांवर याचा परिणाम झाला आहे. त्यांनी राष्ट्रासमोर ठेवलेली महान उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योगदान देण्याची प्रेरणा, यामुळे या घटकांना मिळाली आहे. 30 एप्रिल, 2023 रोजी मन की बातचा 100 वा भाग प्रसारीत झाला. यानिमित्ताने, भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि या मंत्रालयाच्या विविध स्वायत्त संस्थांच्या अनेक उपक्रमांची झलक भारतीय शिक्षण व्यवस्थेवरचा या कार्यक्रमाचा प्रभाव ठळकपणे समोर आणते.
'मन की बात'च्या 66 व्या भागात, पंतप्रधानांनी आपले पारंपरिक खेळ आणि खेळणी यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आणि खेळणी उद्योगाच्या दर्जाविषयी, तसेच असंघटित स्त्रोतांमधून बाजारपेठेत भरणा होत असलेल्या, प्लास्टिक पासून बनवलेल्या हलक्या दर्जाच्या स्वस्त खेळण्यांमुळे मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली. 2020 या वर्षातील जून आणि जुलै मध्ये प्रसारित झालेल्या भागांत, त्यांनी या आधीच स्थानिक उत्पादनांकरता आग्रही राहण्याबाबत आणि राष्ट्रीय टाळेबंदीच्या काळात पारंपरिक खेळांच्या माध्यमातून घरातल्या घरात स्वतःला गुंतवून ठेवण्याचे वेगवेगळे उपाय शोधण्याबद्दल चर्चा केली होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये देखील खेळीमेळीने शिक्षण घेण्यावर भर देण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाने याची फार गांभीर्याने दखल घेतली आणि दोन वर्षांत खेळण्यांचा वापर करुन अध्यापन करण्याची पद्धत अवलंबत, भारतीय खेळण्यांना प्रोत्साहन देण्याचा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचला.
मन की बातच्या त्यांच्या अनेक भागांमध्ये पंतप्रधानांनी, मानसिक, शारिरीक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाभ्यास करण्याची प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा विषद केली आणि 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित झाला. त्यामुळे देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी योग हा अभ्यासाचा भाग बनवण्याकरता, शैक्षणिक संस्थांनी विविध मार्गांचा विचार केला. शाळांमधून विविध वयोगटांसाठी राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड भरवण्याचा प्रस्ताव, शिक्षण मंत्रालयाने दिला आणि एन सी ई आर टी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, 2016 पासून या 3 दिवसीय राष्ट्रीय उपक्रमाचे आयोजन करत आहे.
जनतेचे मानसिक आणि एकंदर आरोग्य, विशेषत: मुलांचे आरोग्य हे नेहमीच पंतप्रधानांसाठी काळजीचे महत्त्वाचे विषय राहिले आहेत आणि त्यांनी मन की बातच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित ताण, परीक्षेचा दबाव, समवयस्क मित्र मैत्रिणी आणि पालकांकडून जाणवणारा दबाव याविषयी अनेक मुद्दे मांडले. यामुळे परीक्षा पे चर्चा आणि मनोदर्पण या अतिशय प्रभावी कार्यक्रमांसह मंत्रालयाने अनेक शिफारसी केल्या आणि उपक्रम राबवले.
म्हैसूरच्या आर आय ई या प्रादेशिक शिक्षण संस्थेने एक अभ्यास केला. यामध्ये भविष्यातील शिक्षक आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणारे शिक्षक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश करण्यात आला होता. डिजिटल उपकरणांचा वापर करण्याबाबत या मंडळींची मते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, हे लक्षात घेऊन त्यांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासातून असे समोर आले की या उपक्रमात सहभागी 77 टक्के विद्यार्थी-शिक्षकांना पंतप्रधानांचा मन की बात हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि त्यांना हा कार्यक्रम अध्यापन, प्रशिक्षण आणि अभ्यासात कोणते विषय कशाप्रकारे समाविष्ट करावेत, या दृष्टीनेही उपयुक्त वाटतो.
* * *
N.Chitale/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920982)
Visitor Counter : 181