पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

काशी येथे गंगा-पुष्करालु उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 29 APR 2023 8:26PM by PIB Mumbai

नमस्कार! तुम्हा सर्वांना गंगा-पुष्करालु उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्व काशीमध्ये आला आहात, म्हणून वैयक्तिक स्वरुपात तुम्ही माझे देखील अतिथी आहात आणि ज्या प्रकारे आपल्याकडे सांगितले जाते की अतिथी हा देवासमान असतो. मी जबाबदाऱ्यांमुळे भलेही तुमच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित राहू शकलो नसलो तरीमनाने मी तुमच्यामध्येच असल्याची जाणीव मला होत आहे. मी या आयोजनाबद्दल काशी-तेलगु समिती आणि संसदेतील माझे सहकारी जी व्ही ए एल नरसिंह राव यांना शुभेच्छा देत आहे. काशीच्या या घाटावर हा गंगा-पुष्करालु उत्सव म्हणजे गंगा आणि गोदावरीचा जणू संगमच आहे. भारताच्या प्राचीन सभ्यता, संस्कृती आणि परंपरांच्या संगमाचा हा उत्सव आहे. तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वीच येथे काशीच्या भूमीवर काशी-तामिळ संगमम् या कार्यक्रमाचे देखील आयोजन झाले होते. तसेच अगदी काही दिवसांपूर्वी मला सौराष्ट्र-तामिळ संगमम कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी मी म्हणालो होतो की स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ देशाच्या विविधतांचा, विविध प्रवाहांचा संगमकाळ आहे, जो भारताला अनंत भविष्यापर्यंत ऊर्जावान ठेवेल.  

मित्रांनो,

काशीसोबत संबंधित प्रत्येक व्यक्तीला हे माहीत आहे की काशी आणि काशीवासियांचे तेलगू लोकांशी किती जवळचे नाते आहे. जसे काशीमध्ये कोणीही तेलगु व्यक्ती आली तर काशीवासियांना वाटते की त्यांच्या कुटुंबातीलच एखादा सदस्य आला आहे. काशीचे लोक अनेक पिढ्यांपासून तुमचे स्वागत करत राहिले आहेत. काशी जितकी प्राचीन आहे तितकेच प्राचीन हे नाते आहे. काशी जितकी पवित्र आहे, तितकीच तेलगु लोकांची काशीविषयी पवित्र श्रद्धा आहे. आजही जितके तीर्थयात्री काशीमध्ये येतात, त्यांच्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या लोकांची संख्या खूप जास्त असते. तेलगु राज्यांनी काशीला कित्येक महान संत, आचार्य आणि ऋषी दिले आहेत. काशीमधील लोक आणि तीर्थयात्री ज्यावेळी बाबा विश्वनाथाचे दर्शन करण्यासाठी जातात, तेव्हा तेलंग स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आश्रमात देखील जातात. स्वामी रामकृष्ण परमहंस तर तेलंग स्वामींना साक्षात काशीमधील शिवाचा अवतार मानायचे. तुम्हाला माहीत आहेच की तेलंग स्वामी यांचा जन्म विजयनगरमध्ये झाला होता. जिद्दू कृष्णमूर्तींसारख्या महात्म्यांची आजही काशीमध्ये आठवण काढली जाते.

बंधू आणि भगिनींनो,

जसे काशीने तेलगु लोकांना स्वीकारले, जाणून घेतले तसेच तेलगु लोकांनी देखील काशीला आपल्या आत्म्यामध्ये सामावून घेतले आहे. अगदी पवित्र तीर्थक्षेत्र वेमुला-वाडाला देखील दक्षिण काशी असे म्हटले जाते. आंध्र आणि तेलंगणच्या मंदिरात मनगटामध्ये जो काळा धागा बांधला जातो त्याला आजही काशी दारम् म्हटले जाते. त्याच प्रकारे श्रीनाथ महाकवी यांचा काशी खण्डमु' ग्रंथ असो, एनुगुल वीरस्वामय्या यांचे  काशी प्रवासवर्णन असो किंवा मग लोकप्रिय काशी मजिली कथलु असो, काशी आणि  काशीचा महिमा तेलुगू भाषा आणि तेलुगू साहित्यात देखील तितक्याच खोलवर रुजलेला आहे. जर एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने हे सर्व पाहिले तर त्याचा यावर विश्वासच बसणार नाही की एखादे शहर इतके दूर असूनही हृदयाच्या इतके जवळ कसे असू शकते. पण हाच भारताचा तो वारसा आहे ज्याने 'एक भारत, श्रेष्ठ भारत' हा विश्वास अनेक शतके जिवंत ठेवला आहे.

मित्रांनो,

काशी मुक्ति आणि मोक्षाची देखील नगरी आहे. एक काळ होता ज्यावेळी तेलुगू लोक हजारों किलोमीटर चालून काशीला येत होते. आपल्या प्रवासात अनेक अडचणींना तोंड देत होते. आधुनिक काळात आता या परिस्थितीत झपाट्याने बदल होऊ लागला आहे.

आज एकीकडे विश्वनाथ धामचे दिव्य वैभव आहे तर दुसरीकडे गंगेच्या घाटांची भव्यता आहे. जी एकीकडे काशी शहरामधल्या गल्ल्या आहेत तर दुसरीकडे नवे रस्ते आणि महामार्गांचे जाळे आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पूर्वी काशीला येऊन गेलेल्या लोकांना काशीमध्ये होत असलेले हे परिवर्तन जाणवत असेल. एक काळ होता जेंव्हा विमानतळावरून दशाश्वमेध घाटावर पोहोचण्यासाठी अनेक तास लागत होते. आज नवा महामार्ग तयार झाल्यामुळे आता लोकांच्या वेळेची बचत होत आहे. एक काळ असा होता जेंव्हा काशीमधील रस्ते विद्युत वाहक तारांच्या जाळ्यांनी भरलेले होते. पण आता काशीमध्ये बहुतांश ठिकाणी विद्युत वाहक तारा भूमिगत झाल्या आहेत. आज काशीमधील अनेक कुंड असो, मंदिरात येण्या जाण्याचे मार्ग असो, काशीमधील सांस्कृतिक स्थळ असो या सर्वांचा कायापालट होत आहे. आता तर गंगेमध्ये सीएनजी वर चालणाऱ्या होड्या चालवल्या जात आहेत. आणि तो दिवस देखील दूर नाही जेंव्हा वाराणसीला येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रोप वे ची सुविधा उपलब्ध असेल. स्वच्छता अभियान असो किंवा काशीच्या घाटांची सफाई असो, वाराणसीच्या लोकांनी, येथील युवकांनी याला जन आंदोलनाचे रुप दिले आहे. हे सर्व काशीवासीयांनी आपल्या श्रमातून साध्य केले आहे, खूप मेहनतीने केले आहे. यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व काशीवासीयांचे जितके गुणवर्णन करेन, गौरव करेन ते अपुरेच आहे.

आणि मित्रांनो,

माझ्या काशीमधील लोक तुमच्या सेवेत, तुमचे स्वागत करण्यात कसलीही कसर ठेवणार नाहीत, हे मी पूर्ण विश्वासाने सांगतो आहे. कारण माझा माझ्या काशीवासीयांवर पूर्ण विश्वास आहे. बाबांचा आशिर्वाद, काळभैरव आणि अन्नपूर्णा मातेचे दर्शन खरोखरच अद्भुत आहे. गंगमधील एक डुबकी तुमच्या आत्म्याला प्रसन्नता देईल. या सर्वांसोबत तुमच्यासाठी या उन्हाळ्यात काशीची लस्सी आणि थंडाई देखील आहे. वाराणसीचे चाट, लिट्टी - चोखा आणि बनारसी पान यांचा स्वाद तुमची यात्रा आणखी स्मरणीय बनवेल. आणि मी तुम्हाला आणखी एक अनुरोध करतो. ज्याप्रमाणे एटिकोपप्पाका ची लाकडी खेळणी प्रसिद्ध आहे त्याच प्रकारे बनारसची लाकडी खेळणी प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून आलेले आपले मित्र आपल्या बरोबर लाकडी बनारसी खेळणी, बनारसी साडी, बनारसी मिठाई अशा अनेक वस्तू घेऊन जाऊ शकतात. पहा, या वस्तू तुमचा आनंद नक्कीच कैक पटीने वाढवतील.

मित्रांनो,

आपल्या पूर्वजांनी भारताच्या चैतन्याला वेगवेगळ्या केंद्रात स्थापित केले होते. या सर्वांच्या एकत्रीकरणाने भारत मातेचे स्वरूप पूर्ण होते. काशीमध्ये बाबा विश्वनाथ यांचा निवास आहे तर आंध्र प्रदेशात मल्लिकार्जुन आणि तेलंगणामधे भगवान राज राजेश्वर यांचा. काशीमध्ये जर विशालाक्षी शक्तिपीठ आहे तर आंध्र प्रदेशात भ्रमरांबा माता आणि तेलंगणामधे राज राजेश्वरी आहेत. अशी सर्व पवित्र ठिकाणे भारत आणि भारताची सांस्कृतिक वैशिष्ट्यांची महत्वपूर्ण केंद्र आहेत. आपल्याला आपल्या देशाच्या या विविधतेला याच समग्र दृष्टीने पाहायचे आहे. तेंव्हाच आपल्या पूर्णत्वाची आपल्याला जाण होईल, तेंव्हाच आपण आपले संपूर्ण सामर्थ्य जागृत करु शकू. गंगा - पुष्करालु सारखे उत्सव राष्ट्रसेवेच्या या संकल्पाला असेच पूर्णत्वाकडे घेऊन जातील. याच कामनेसह मी तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा देतो. तुमची ही यात्रा फलदायी ठरो, सुविधापूर्ण असो आणि काशीच्या नवनव्या आठवणींनी आपले मन मंदिर दिव्यतेने भरुन जावो. बाबांच्या चरणी हीच प्रार्थना करतो. पून्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद! 
 
 

*****

Ankush Chavan/ Shailesh P/Shraddha M/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920861) Visitor Counter : 162