माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पंतप्रधानांनी 91 नव्या 100 वॅट एफएम ट्रान्समीटर्सचे केले उद्घाटन, आकाशवाणीशी आणखी दोन कोटी श्रोते जोडले जाणार
18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशात 91 नवे 100 वॅट ट्रान्समीटर्स सुरू
तंत्रज्ञानाचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार सातत्याने कार्यरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
आकाशवाणीचे देशातील सर्वात मोठे एफएम नेटवर्क नव्या भारताची विकासगाथा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
Posted On:
28 APR 2023 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 91 ठिकाणी 100 वॅट क्षमतेचे लो पॉवर एफएम ट्रान्समीटर सुरू केले. 20 राज्यांतील 84 जिल्ह्यांमध्ये हे ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. यामुळे आकाशवाणीसोबत जोडलेल्या ट्रान्समीटरची संख्या 524 वरून 615 पर्यंत वाढली आहे. या मुळे आकाशवाणीची व्याप्ती देशातील 73.5% लोकसंख्येपर्यंत वाढेल.
ट्रान्समीटर बसवण्यासाठी नक्षलग्रस्त क्षेत्र, आकांक्षी जिल्हे आणि देशाच्या सीमावर्ती भागांना प्राधान्य देण्यात आले आहे.
सुस्पष्ट ध्वनी गुणवत्ता आणि एफएम सुविधेने सुसज्ज मोबाईल फोनची सहज उपलब्धता यामुळे देशात एफएम रेडिओ सेवेची मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आणि संस्थेची क्षमता वाढवण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल म्हणून सरकारने देशात आणखी 63 एफएम ट्रान्समीटर्स बसवण्यास मंजुरी दिली आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी आकाशवाणीचे अभिनंदन केले. या जोडणीच्या महत्त्वाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आकाशवाणीच्या एफएम सेवेच्या विस्तारात आजचा दिवस अखिल भारतीय एफएम बनण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आकाशवाणीद्वारे 91 एफएम ट्रान्समीटर्सची सुरुवात ते जिल्हे आणि देशातील 2 कोटी लोकांसाठी जणू भेटवस्तू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी, तंत्रज्ञानाचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार सातत्याने काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “भारताला आपल्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी कोणत्याही भारतीयाला संधीची उणीव भासू नये हे महत्त्वाचे आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान सुलभ आणि किफायतशीर बनवणे महत्त्वाचे आहे. सर्व गावांना ऑप्टिकल फायबर आणि माहिती सुलभतेने उपलब्ध करून देणाऱ्या सर्वात स्वस्त डेटाचा उल्लेख करून त्यांनी हे स्पष्ट केले. ते म्हणाले की, यामुळे ग्रामीण भागात डिजिटल उद्योजकतेला एक नवीन आयाम मिळाला आहे. त्याचप्रमाणे युपीआय ने छोटे व्यवसाय आणि पदपथ विक्रेत्यांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात मदत केली आहे.
पंतप्रधानांनी त्यांच्या पिढीचे रेडिओशी असलेले भावनिक नाते अधोरेखित केले. “मन की बात’च्या आगामी 100 व्या भागाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले, “माझ्यासाठी, आणखी एक आनंदाची गोष्ट आहे की, एक कार्यक्रम सादरकर्ता म्हणूनही माझे रेडिओशी नाते आहे.” ते म्हणाले, "देशवासीयांशी अशा प्रकारचा भावनिक ऋणानुबंध केवळ रेडिओद्वारेच शक्य झाला. याद्वारे मी देशाच्या सामर्थ्याशी आणि देशवासियांमधील कर्तव्याच्या सामूहिक शक्तीशी संलग्न राहिलो. स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि हर घर तिरंगा यांसारखे उपक्रम मन की बातच्या माध्यमातून लोकचळवळ बनले असे त्यांनी यासारख्या उपक्रमात या कार्यक्रमाच्या भूमिकेची उदाहरणे देऊन विशद केले.म्हणून, एक प्रकारे, मी तुमच्या आकाशवाणी चमूचा भाग आहे,” असेही पंतप्रधान म्हणाले.
या सुविधेपासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या उपेक्षितांना प्राधान्य देणार्या सरकारच्या धोरणांना 91 एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन पुढे नेत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "ज्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हते त्यांना आता व्यापक प्रमाणावर जोडण्याची संधी मिळेल," पंतप्रधान म्हणाले. एफएम ट्रान्समीटर्सचे फायदे सांगताना महत्त्वाची माहिती वेळेवर प्रसारित करणे, समुदाय बांधणीचे प्रयत्न, कृषी पद्धतींशी संबंधित हवामानाची अद्ययावत स्थिती, शेतकऱ्यांसाठी अन्न आणि भाजीपाला या विषयीची माहिती, शेतीत रसायनांच्या वापरामुळे होणारे नुकसान याबद्दल चर्चा, शेतीसाठी प्रगत यंत्रसामग्री एकत्र करणे, महिला बचत गटांना नवीन बाजार पद्धतींबद्दल माहिती देणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संपूर्ण समुदायाला मदत करणे याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. त्यांनी एफएमच्या माहितीपर मनोरंजन उपयुक्ततेचाही उल्लेख केला.
पंतप्रधानांनी भाषिक विविधतेच्या आयामांना स्पर्श केला आणि माहिती दिली की एफएम प्रसारण सर्व भाषांमध्ये आणि विशेषत: 27 बोली असलेल्या प्रदेशांमध्ये होईल. “ही कनेक्टिव्हिटी केवळ संप्रेषणाची साधने जोडत नाही तर ती लोकांनाही जोडते. प्रत्यक्ष कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासोबत सामाजिक संपर्कावर भर देण्यात आला आहे यावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले, “हे या सरकारच्या कार्यसंस्कृतीचे प्रतिबिंब आहे.”
भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी आकाशवाणी सारख्या सर्व संप्रेषण वाहिन्यांचा दृष्टिकोन आणि ध्येय अधोरेखित केले आणि सांगितले की कनेक्टिव्हिटी कोणत्याही स्वरूपात असो, देश आणि 140 कोटी नागरिकांना जोडणे हा त्याचा उद्देश आहे. सातत्यपूर्ण संवादातून देश बळकट होईल, या दृष्टीकोनातून सर्व हितधारक वाटचाल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लेह मधल्या उपस्थितांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. सरकारच्या कार्यक्रमांची आणि धोरणांची माहिती तसेच मनोरंजनाशी संबंधित आशय देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी ट्रान्समीटर्स एक वाहिनी म्हणून काम करतील, असे या कामगिरीबद्दल बोलताना अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
भारतात रेडिओ कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराचे श्रेय केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आणि रेडिओचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांच्या मन की बात कार्यक्रमाचे,योगदान अधोरेखित केले,जे आयआयएम रोहतकने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात मांडण्यात आले आहे.
आकाशवाणीकडे आज भारतातील सर्वात मोठे एफएम नेटवर्क आहे आणि हे नेटवर्क नव्या भारताची विकासगाथा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल, असे अनुराग ठाकूर यांनी अधोरेखित केले.
पार्श्वभूमी
देशातील FM कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये 91 नवीन 100W FM ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. या विस्ताराचा विशेष भर आकांक्षी जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागातील व्याप्ती वाढवण्यावर आहे. यामधे बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, लडाख आणि अंदमान आणि निकोबार बेटे, अशा विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा यात समावेश आहे. आकाशवाणीच्या एफएम सेवेच्या या विस्तारामुळे, ज्यांना या माध्यमाची कनेक्टिव्हीटी उपलब्ध नव्हती त्या अतिरिक्त 2 कोटी लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार असून सुमारे 35,000 चौरस किमी क्षेत्र विस्तारले जाणार आहे.
* * *
N.Chitale/V.Joshi/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920556)
Visitor Counter : 174