पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तिरूअनंतपुरम येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 25 APR 2023 2:36PM by PIB Mumbai

नल्लवराय मलयाली स्नेहितरे,

नमस्कारम्।

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, केरळ सरकारमधील मंत्री, स्थानिक खासदार शशी थरूर, येथे उपस्थित असलेले इतर मान्यवर आणि केरळच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. मल्याळम नववर्षाची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली आहे. तुम्ही विशू सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

या आनंदाच्या वातावरणात मला केरळच्या विकासरूपी उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे. केरळात आज पहिली वंदे भारत रेल्वेगाडी सुरू झाली. आज कोचीला वॉटर मेट्रोची नवी भेट मिळाली तसेच  केरळात रेल्वेशी संबंधित अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत, होणार आहेत. दळणवळण वाढवणाऱ्या प्रकल्पांसोबतच आज केरळाच्या विकासाशी संबंधित आणखी काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. विकासाच्या या सर्व प्रकल्पांसाठी केरळच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन.

बंधू आणि भगिनींनो,

केरळ हे अत्यंत जागरूक, हुशार आणि सुशिक्षित लोकांचे राज्य आहे. इथल्या लोकांची ताकद, इथल्या लोकांची नम्रता, त्यांची मेहनत यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. देशातील आणि परदेशातील सध्याच्या परिस्थितीची तुम्हा सर्वांना चांगलीच कल्पना आहे. म्हणूनच आज जगभरातील देशांची स्थिती काय आहे, त्यांची अर्थव्यवस्था कोणत्या परिस्थितीतून जात आहे, हेही तुम्हाला चांगलेच माहीत आहे.

या जागतिक परिस्थितीतही भारतात विकास होऊ शकतो ही शक्यता जगाने स्वीकारली आहे, जगाने भारताला विकासाचे एक उज्ज्वल ठिकाण मानले आहे. जगाचा भारतावर ठाम विश्वास आहे याला अनेक कारणे आहेत. केंद्रात निर्णयक्षम सरकार असून ते भारताच्या हिताचे मोठे निर्णय घेत आहे हे त्यामागचे पहिले कारण आहे. दुसरे कारण म्हणजे, केंद्र सरकारने आधुनिक पायाभूत सुविधांवर केलेली अभूतपूर्व गुंतवणूक.

आपल्या लोकसंख्येचा मोठा भाग असलेल्या युवकांच्या कौशल्यांवर गुंतवणूक हे तिसरे कारण आहे. राहणीमान आणि व्यवसाय सुलभतेबाबत केंद्र सरकारची असलेली वचनबद्धता हे त्यामागचे चौथे कारण आहे. राज्यांचा विकास हे देशाच्या विकासाचे सूत्र मानून आमचे सरकार सहकारी संघराज्यवादावर  भर देते. केरळचा विकास झाला तर भारताचा विकास जलद होईल, या सेवाभावनेने आम्ही काम करत आहोत.

आज जगभरात भारताची विश्वासार्हता वाढली आहे. त्यात केंद्र सरकारच्या ग्लोबल आउटरीचच्या प्रयत्नांची मोठी भूमिका आहे आणि बाहेर इतर देशांत राहणाऱ्या केरळच्या लोकांनाही याचा मोठा फायदा झाला आहे. मी जेव्हा कुठेतरी बाहेर जातो तेव्हा तिथे राहणाऱ्या केरळमधील लोकांना भेटतो. परदेशात राहणार्‍या भारतीय समूदायालाही भारताच्या वाढत्या शक्तीचा, ताकदीचा मोठा फायदा होत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

गेल्या 9 वर्षात, भारतात दळणवळणाशी निगडित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अभूतपूर्व वेगाने आणि अभूतपूर्व प्रमाणात काम केले गेले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही आम्ही पायाभूत सुविधांवर १० लाख कोटींहून अधिक खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आम्ही देशातील सार्वजनिक वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला पूर्णपणे नवसंजीवनी देत आहोत. भारतीय रेल्वेच्या सुवर्णकाळाकडे आपण वाटचाल करत आहोत.

2014 पूर्वी आम्ही केरळसाठी सरासरी रेल्वे बजेट 5 पटीने वाढवण्याची व्यवस्था केली आहे. गेल्या 9 वर्षांत केरळमध्ये गेज रूपांतरण, दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आजही तिरुअनंतपुरमसह केरळच्या तीन स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू झाले.

हे स्थानक केवळ रेल्वे स्थानक नसून बहुविध वाहतूक केंद्र बनणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सारख्या आधुनिक गाड्या ही देखील आकांक्षी भारताची ओळख आहे. भारताचे रेल्वे जाळे झपाट्याने विस्तारत असून हे रेल्वे मार्ग अति वेगासाठी तयार होत असल्यामुळे त्यावर या सेमी-हाय स्पीड ट्रेन्स चालवता येत आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

आतापर्यंत धावलेल्या सर्व वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे एक वैशिष्ट्य हेही आहे की त्यांनी आपल्या सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडलं आहेत. केरळची पहिली वंदे भारत ट्रेनही उत्तर केरळला दक्षिण केरळशी जोडेल. या ट्रेनच्या मदतीने कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, कोझिकोड आणि कन्नूर या तीर्थक्षेत्रांना जाणे सोपे होणार आहे.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली ही वंदे भारत ट्रेन पर्यावरणाची हानी होऊ न देता वेगाने प्रवास करण्याचा उत्तम अनुभव देईल. आज, सेमी-हाय स्पीड गाड्यांसाठी तिरुवनंतपुरम-शोरनूर सेक्शन तयार करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर  तिरुअनंतपुरम ते मंगळुरूपर्यंतही सेमी-हाय स्पीड ट्रेन चालवता येईल.

बंधू आणि भगिनींनो,

देशातील सार्वजनिक वाहतूक आणि शहरी वाहतूक आधुनिक करण्याच्या दिशेने आम्ही आणखीन एक पाऊल उचलले आहे. स्थानिक परिस्थितीला साजेसा मेड इन इंडिया पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सेमी हायस्पीड रेल्वे असो, प्रादेशिक जलद वाहतूक व्यवस्था असो, रो-रो फेरी असो, रोपवे असो, गरज असेल तिथे तिथे सगळ्या ठिकाणी अशा यंत्रणा तयार केल्या जात आहेत. आज तुम्हाला भारतामध्ये तयार केलेली वंदे भारत एक्सप्रेस दिसत आहे. आज मेक इन इंडिया अंतर्गत देशभरातील अनेक शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार होत आहे. मेट्रो लाइट आणि अर्बन रोपवेसारखे प्रकल्पही छोट्या शहरांमध्ये उभारले जात आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

कोची वॉटर मेट्रोचा प्रकल्पही मेड इन इंडिया आहे, हे अद्वितीय आहे. यासाठी आवश्यक असलेल्या बोटींसाठी मी कोची शिपयार्डचे अभिनंदन करतो. वॉटर मेट्रोमुळे कोचीच्या आसपासच्या अनेक बेटांवर राहणाऱ्या लोकांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक उपलब्ध होईल. ही जेट्टी बस टर्मिनल आणि मेट्रो नेटवर्क दरम्यान इंटरमॉडल कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल. यामुळे कोचीची वाहतूक समस्याही कमी होणार असून बॅकवॉटर पर्यटनालाही नवे आकर्षण मिळणार आहे. केरळमध्ये होत असलेला हा प्रयोग देशातील इतर राज्यांसाठीही आदर्श ठरेल, याची मला खात्री आहे.

मित्रांनो,

भौतिक कनेक्टिव्हिटीसोबतच डिजिटल कनेक्टिव्हिटीलाही आज देशाची प्राथमिकता आहे. मी डिजिटल सायन्स पार्क सारख्या प्रकल्पाचे कौतुक करेन. अशा प्रकल्पांमुळे डिजिटल इंडियाचा विस्तार होईल. गेल्या काही वर्षांत भारताने जी डिजिटल प्रणाली उभारली आहे, त्याची जगभरात चर्चा होत आहे. भारताने विकसित केलेली डिजिटल प्रणाली पाहून जगातील विकसित देशही आश्चर्यचकित झाले आहेत. भारताने स्वतः 5G तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि यामुळे या क्षेत्रात अनेक नवीन शक्यता खुल्या झाल्या आहेत, नवीन डिजिटल उत्पादनांचा मार्ग मोकळा झाला आहे.

बंधू आणि भगिनींनो,

कनेक्टिव्हिटीवर केलेल्या गुंतवणुकीमुळे सुविधा तर वाढतातच, पण त्यामुळे अंतर कमी होते, विविध संस्कृती जोडल्या जातात. रस्ता असो, रेल्वे असो, गरीब-श्रीमंत, जात-पात भेदही करत नाही.  प्रत्येक जण त्याचा वापर करतो आणि हा विकासच योग्य विकास आहे. यामुळे एक भारत श्रेष्ठ भारताची भावना बळकट होते. आज भारतात हेच घडताना दिसत आहे.

केरळमध्ये देशाला आणि जगाला देण्यासारखे बरेच काही आहे. येथे संस्कृती, पाककृती आणि उत्तम हवामान आहे आणि समृद्धीचे सूत्र यातच जोडलेले आहे. तुम्ही पाहिलेच असेल, काही दिवसांपूर्वी कुमारकोममध्ये G-20 शी संबंधित एक बैठक झाली होती. केरळमध्ये आणखी अनेक G-20 बैठका होत आहेत. जगाला केरळची अधिक चांगली ओळख व्हावी हाही यामागचा उद्देश आहे.  केरळचा मटका तांदूळ आणि नारळ याशिवाय नाचणी पुट्टूसारखे श्री अन्न सुद्धा प्रसिद्ध आहेत. आज आपण भारताचे श्रीअन्न जगभर नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे शेतकरी, आमचे कारागीर जे काही उत्पादने केरळमध्ये बनवतात, आम्ही त्यांच्यासाठी व्होकल व्हायला पाहिजे. जेव्हा आपण वोकल फॉर लोकल होऊ तेव्हाच जग आपल्या उत्पादनांबद्दल बोलेल. आमची उत्पादने जगापर्यंत पोहोचतील तेव्हा विकसित भारत घडवण्याचा मार्ग अधिक मजबूत होईल.

तुम्ही बघितले आहे, मी अनेकदा मन की बातमध्ये केरळमधील लोक आणि येथील स्वयं-सहायता गटांनी बनवलेल्या उत्पादनांबद्दल बोलतो. यामागे माझा प्रयत्न असा आहे की आपण स्थानिकांसाठी बोलते व्हावे. या रविवारी मन की बातचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. मन की बातचे हे शतक राष्ट्र उभारणीतील प्रत्येक देशवासीयांच्या प्रयत्नांना समर्पित आहे, ते एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेलाही समर्पित आहे. विकसित भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. वंदे भारत एक्स्प्रेस आणि कोची वॉटर मेट्रो सारखे प्रकल्प यामध्ये खूप मदत करतील. सर्व विकास प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद.

भारत मातेचा विजय असो.

भारत मातेचा विजय असो.

भारत मातेचा विजय असो.

 

***

Jaydevi PS/Sonal T/PrajnaJ/Gajendra/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920403) Visitor Counter : 180