शिक्षण मंत्रालय
कामाचे भविष्य: भारत आणि सिंगापूरच्या कौशल्ययुक्त वास्तुरचना आणि प्रशासन मॉडेल्स या विषयावरील कार्यशाळेला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले संबोधित
भविष्यासाठी सज्ज असलेली कार्यस्थाने तयार करण्यासाठी भारत आणि सिंगापूर हे दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतात : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
Posted On:
25 APR 2023 7:47PM by PIB Mumbai
भुवनेश्वर, 25 एप्रिल 2023
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्यविकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज भुवनेश्वर येथे आयोजित 'कामाचे भविष्य: भारत आणि सिंगापूरच्या कौशल्ययुक्त वास्तुरचना आणि प्रशासन मॉडेल्स' या विषयावरील कार्यशाळेला संबोधित केले.

सिंगापुरचे भारतातील उच्चायुक्त सिमॉन वाँग, सिंगापूरच्या शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण आणि कौशल्य विभागाच्या उपसचिव मेलिसा खू यांनी समारोप सत्रात भाग घेतला.
केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे सचिव के.संजय मूर्ती, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सचिव अतुल कुमार तिवारी, शालेय शिक्षण तसेच साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्यासह केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री प्रधान यांनी भारत तसेच सिंगापूरची प्रतिनिधी मंडळे, कौशल्य परिसंस्थेचे भागधारक, शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थी यांच्या समवेत जी-20 समूहाच्या ईडीडब्ल्यूजीच्या तिसऱ्या बैठकीच्या सोबत आयोजित करण्यात आलेल्या या एक दिवसीय कार्यशाळेला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री म्हणाले की कौशल्य विकास आणि शिक्षण विषयक सहकार्य हे धोरणात्मक भागीदारीसाठी महत्त्वाचे घटक आहेत. परस्पर प्राधान्यक्रमाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी, विशेषतः भविष्यासाठी सज्ज कार्यस्थाने उभारण्यासाठी एकत्र येऊन काम करण्यास भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांना मोठा वाव आहे. ते पुढे म्हणाले की आपल्याला कौशल्य हा विषय पुन्हा परिभाषित आणि पुनःकल्पित करावा लागेल. कौशल्य हे आयुष्यभरासाठी असते असे सांगून ते म्हणाले की येत्या पाव दशकात जागतिक पातळीवरील 25% मनुष्यबळ भारताकडून पुरवलेले असेल. आपण आपल्या युवा पिढीला कौशल्यांनी सज्ज करणे, पुनःपुन्हा कौशल्यांची भर घालणे आणि कौशल्यांचे अद्ययावतीकरण करणे आणि त्यांना भविष्यातील कार्यांसाठी सिद्ध करणे हे काम केले नाही तर आपण आपल्या जागतिक दायीत्वांची पूर्तता करू शकणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये शिक्षण आणि कौशल्य मिळवण्याला समान महत्त्व देण्यात आले आहे यावर प्रधान यांनी अधिक भर दिला. या धोरणाने शालेय शिक्षण आणि कौशल्य यांच्या एकत्रीकरणासाठी तसेच राष्ट्रीय क्रेडीट आराखड्याच्या माध्यमातून उभ्या-आडव्या गतिशीलतेसाठी आणि भारताची कौशल्यविषयक परिसंस्था अधिक उज्ज्वल करण्यासाठी मार्ग तयार केला आहे , असे त्यांनी सांगितले.
सिमॉन वाँग यांनी त्यांच्या भाषणात भारत आणि सिंगापूर यांच्यात असलेल्या दृढ संबंधांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की सिंगापूरची पेनाऊ ही जलद भरणा प्रणाली त्यांनी भारताच्या युपीआयशी जोडणारा सिंगापूर हा पहिला देश ठरला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भारतीय पीएसएलव्ही च्या सहाय्याने सिंगापुरचे दोन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. कौशल्याच्या क्षेत्रात या दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढविण्याची प्रचंड संधी आहे असे त्यांनी सांगितले. उत्तम प्रकारच्या नोकरीमुळे व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास वृद्धींगत होतो म्हणून सिंगापूरने कोणालाही मागे न राहू देण्याचे, उत्तम नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्याचे आणि आत्मविश्वासपूर्ण देशाच्या उभारणीचे तत्वज्ञान अनुसरले आहे याकडे सिमॉन वाँग यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919595)