गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य-देशांच्या आपत्कालीन परिस्थिती प्रतिबंध आणि निर्मूलनाशी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक संपन्न
शांघाय सहकार्य संघटनेचा आवाका अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने पाच प्रमुख कार्यक्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत - आशिया खंडात विश्वासबांधणी, एकत्रित उत्तरदायित्वाच्या दृष्टिकोनाचा अंगिकार, संवाद आणि माहितीच्या आदानप्रदानात सहकार्य वाढवणे, प्राधान्य क्षेत्रांची ओळख आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपत्ती लवचिकता क्षमता निर्माण करणे
Posted On:
20 APR 2023 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य-देशांच्या (SCO) आपत्कालीन परिस्थिती प्रतिबंध आणि निर्मूलनाशी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक झाली.
2017 मध्ये पूर्ण सदस्य राष्ट्र म्हणून मान्यता मिळाल्यानंतर भारत पहिल्यांदाच भारत शांघाय सहकार्य संघटनेच्या विभाग प्रमुखांची बैठकीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यावेळी म्हणाले. या शिखर परिषदेचा अध्यक्ष या नात्याने भारताचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस सी ओ च्या चिंगदाओ येथे झालेल्या शिखर परिषदेत मांडलेल्या SECURE या संकल्पनेचा पाठपुरावा करणे हे आहे, असे शाह म्हणाले. याचा अर्थ, S – सुरक्षा, E – आर्थिक सहकार्य, C – कनेक्टिव्हिटी, U – एकता, R – सार्वभौमत्व आणि अखंडतेबद्दल आदर आणि E – पर्यावरण संरक्षण, असा आहे.
भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विशेष महत्त्व देत असून एस सी ओ सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य आणि परस्पर विश्वास वाढीला लागावा यासाठी या क्षेत्रातील आपले कौशल्य आणि अनुभव सामायिक करण्याची भारताची तयारी आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले. कोणतेही संकट हे लहान किंवा मोठे नसते आणि ते कोणालाच सोडत नाही हा भारताचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. भारताकडे आता अधिक अचूक आणि आपत्तीची सूचना देणारी तत्पर प्रणाली उपलब्ध आहे आणि दुष्काळ, पूर, वीजेचा कडकडाट, उष्णतेची लाट, थंडीची लाट, चक्रीवादळ अशा हवामानाशी संबंधित जवळपास सर्व आपत्तींसाठी भारताने आपल्या प्रणालींमध्ये ज्या प्रकारे सुधारणा केली आहे, त्यामुळे देशातील आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे, असेही शाह यांनी सांगितले.
प्रत्येकाचे आयुष्य, प्रत्येक कुटुंब आणि त्यांची उपजीविका हे अत्यंत मोलाचे असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, एक काळ असा होता की भारतात चक्रीवादळामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी होत असे मात्र भारताने सामुदायिक सक्षमीकरण हाच आपल्या प्रयत्नांचा आधार मानून कार्य केले ज्यामुळे चक्रीवादळामुळे होणारे नुकसान कमी झाले आहे, याची सर्व जगाकडून प्रशंसा होत आहे. असे शाह म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपत्तीचा धोका कमी करण्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. भारताच्या नेतृत्वाखालील आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीमध्ये (सीडीआरआय) आज जगभरातील 39 सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे अशी माहिती त्यांनी दिली.जगातील लहान बेटांनी बनलेल्या विकसनशील देशांसारख्या काही सर्वात असुरक्षित प्रदेशांवर सीडीआरआय विशेष भर देत आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, महासागरविषयक सेवांसाठीच्या भारतीय राष्ट्रीय केंद्राने (आयएनसीओआयएस) हिंद महासागराच्या परिघावरील देशांसाठी स्थापन केलेल्या ‘त्सुनामीचा पूर्व इशारा देणाऱ्या यंत्रणे’चा उपयोग केवळ भारतालाच नव्हे तर इतर दोन डझन इतर देशांना देखील होत आहे. भारताने वर्ष 2017 मध्ये सोडलेल्या दक्षिण आशियायी भूस्थिर दळणवळण उपग्रहामुळे भारतीय उपखंडातील देशांमध्ये परस्पर संपर्क, हवामानविषयक अंदाज इत्यादीमध्ये सुधारणा होण्यास मदत झाली आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत, एससीओ क्षेत्राने मोठ्या तीव्रतेच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड दिले असून त्यात प्रचंड प्रमाणात अप्रत्यक्ष आर्थिक हानी झाली आहे तसेच जगभरात भूकंप, दुष्काळ,पूर, अचानक आलेली वादळे आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. या सगळ्या आपत्ती हवामान बदलाशी संबंधित होत्या आणि हवामान बदल हा घटक आता जागतिक विकासासाठी मोठा धोका ठरू लागला आहे असे ते म्हणाले. धोक्याचे प्रमाण कमी करणे ही आता स्थानिक पातळीवरील समस्या राहिली नाहीये आणि जगाच्या एका भागात केलेल्या कृतीचा परिणाम जगाच्या दुसऱ्या भागांमधील धोक्याच्या तीव्रतेवर होताना दिसतो आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
जर आपण शाश्वत विकास ध्येये (एसडीजीज) आणि एसईएनडीएआय आराखड्याने निश्चित केलेली ध्येये एकत्रितपणे साध्य केली नाहीत तर या दोन्ही आराखड्यांनी निश्चित केलेली उद्दिष्ट्ये गाठणे आपल्याला कठीण होईल यावर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार्य मंत्री यांनी भर दिला. ते म्हणाले की ही गोष्ट लक्षात घेऊनच, भूकंप आणि पूर यांचे परिणाम कमी करण्याच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी भारताने ‘माहितीचे सामायीकीकरण करणाऱ्या दोन कार्यशाळा’ आयोजित केल्या आहेत. यशस्वीपणे पार पडलेल्या या दोन्ही कार्यक्रमांमध्ये सदस्य देशांनी अत्यंत सक्रियतेने भाग घेतला ही बाब लक्षात घेणे आनंददायी आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, शांघाय सहकार्य परिषदेचा दृष्टीकोन आणखी मजबूत करण्यासाठी खालील 5 प्रमुख कार्यक्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत-
1. आशियामध्ये आत्मविश्वास निर्मितीविषयक प्रयत्न,
2. सामूहिक जबाबदारीचा दृष्टीकोन,
3. संपर्क तसेच माहितीचे सामायीकीकरण या क्षेत्रात सहकार्याचा विस्तार,
4. प्राधान्यक्रम क्षेत्रांची निश्चिती, आणि,
5. आपत्ती प्रतिरोधक क्षमता निर्मितीसाठी नव्याने विकसित तंत्रज्ञानाचा वापर.
उपरोल्लेखित 5 कार्यक्षेत्रांबाबत तपशीलवारपणे बोलताना केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की आपत्तीच्या प्रतिरोधासाठी सामूहिक जबाबदारीचा दृष्टीकोन स्वीकारल्यामुळे एससीओ सदस्य देशांना अधिक परिणामकारक पद्धतीने एकत्र काम करण्यात मदत होईल.
नवी दिल्ली येथे झालेली ही बैठक, सदस्य देशांमध्ये सहकार्याचे नवे मार्ग खुले करेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला.
Jaydevi PS/Bhakti/Sanjana/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918317)
Visitor Counter : 188