गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत आज राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमलीपदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात 2047 पर्यंत व्यसनमुक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेने दृढतेने एकत्र येऊन प्रयत्न करू: गृहमंत्री
Posted On:
19 APR 2023 8:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह नवी दिल्ली इथे आज आयोजित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमलीपदार्थ विरोधी कृती दलाच्या प्रमुखांच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमित शाह यांच्या हस्ते अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या 2022 च्या (विशेष आवृत्ती) चे प्रकाशन केले आणि व्यसनमुक्त भारत - राष्ट्रीय संकल्प पुस्तिकेचे देखील प्रकाशन केले. अंमलीपदार्थांची अवैध शेती शोधून ती नष्ट करण्यासाठीच्या ‘मॅप ड्रग्ज’ - मोबाइल ॲप आणि वेब पोर्टलचे देखील त्यांनी उद्घाटन केले. गृहमंत्र्यांनी अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग, इंदोर प्रादेशिक कार्यालयाच्या परिसराचे ऑनलाईन उद्घाटन केले.
याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार, गृहराज्य मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृहसचिव आणि अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे महासंचालक एस. एन. प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात 2047 मध्ये आपण व्यसनमुक्त भारत निर्माण करू, असे अमित शाह यावेळी म्हणाले. येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचे आहे. आज आपण व्यसनाविरुद्धच्या युद्धात अशा ठिकाणी आहोत की इथून दृढसंकल्प, सामूहिक प्रयत्न, एकसंघता आणि संपूर्ण सरकार हा दृष्टीकोन घेऊन पुढे गेलो तर आपला विजय निश्चित आहे, असेही ते पुढे म्हणाले.
अंमलीपदार्थांची अवैध शेती शोधून काढण्यासाठी एक मोबाइल ॲप सुरु करण्यात आले आहे, अंमलीपदार्थ विरोधी विभागाचा वार्षिक अहवाल प्रकाशित झाला आहे आणि या सोबतच इंदोर प्रादेशिक कार्यालयाचे देखील उद्घाटन झाले आहे. असे त्यांनी सांगितले. ही सर्व पावले अमलीपदार्थांच्या विरोधात आपल्या लढाईला बळ देणारी सिद्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. की अंमलीपदार्थांचे व्यसन देशाच्या तरुण पिढीचे नुकसान तर करत आहेतच, त्या सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील वाईट परिणाम करत आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसोबतच अंमलीपदार्थ दहशतवाद देशाच्या सीमा आणि तिथली सुरक्षा खिळखिळी करत आहे. यावर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय गृह मंत्रालयाने एक रणनीती तयार केली आहे ज्यात तीन महत्वाचे मुद्दे आहेत - संस्थात्मक व्यवस्था मजबूत करणे, सर्व अंमलीपदार्थ विरोधी संस्थांमध्ये समन्वय स्थापन करणे आणि व्यापक जनजागृती अभियान चालवणे. शाह म्हणाले की, एकसंघ भावना आणि संपूर्ण सरकार हा दृष्टीकोन ठेवून आपण पुढे गेले पाहिजे. ते म्हणाले की ही लढाई पक्षीय राजकारण आणि राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन लढावी लागेल.
गेल्या तीन वर्षांतले व्यसनाविरुद्धच्या लढाईचे यश उत्साहवर्धक आहे, असे अमित शाह म्हणाले. 2006-2013 दरम्यान 1257 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, जी 2014-2022 दरम्यान 181 टक्के वाढून 3544 पर्यंत पोचली आहेत. या काळात अटक झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या 1363 होती जी जवळपास 300 टक्के वाढून 5408 झाली आहे. वर्ष 2006-2013 दरम्यान 1.52 लाख किलोग्राम अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते, ज्यात 2014-2022 दरम्यान दुप्पट वाढ होऊन 3.73 लाख किलोग्राम झाले. वर्ष 2006-2013 दरम्यान 768 कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते, जे 2014-2022 दरम्यान 25 पटींपेक्षा जास्त वाढून 22 हजार कोटी रुपये झाले आहेत. अंमलीपदार्थ विरोधी विभागाने तयार केलेल्या NCORD आणि NIDAAN पोर्टल्सचा सर्व राज्यांनी भरपूर वापर केला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. पोलीस तंत्रज्ञान अभियानाअंतर्गत भारत सरकार ज्या सुविधा देईल, त्यात पहिली प्राथमिकता अंमलीपदार्थ विरोधी पथकाला द्यायला हवी. NCORD च्या चारही बैठका, दोन केंद्रीय आणि दोन राज्य स्तरावर, नियमितपणे व्हायला हव्यात अशीही सूचना त्यांनी केली.ज्यात सर्वात महत्वाची जिल्हास्तरीय NCORD बैठक आहे,असे ते म्हणाले .
आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ तस्करीच्या जाळ्यापर्यंत आपला तपास पोहचणे गरजेचे आहे आणि आपल्या देशाच्या प्रत्येक भागातून ते जाळे नष्ट करण्याची जबाबदारी सर्व अंमलीपदार्थ विरोधी कृती दलांच्या प्रमुखांची आहे. व्यसनाच्या विरोधातली ही लढाई कठीण नक्कीच आहे, मात्र आपण सर्वांनी मोदींच्या 2047 मध्ये व्यसनमुक्त भारताचे ध्येय साध्य करण्याचा संकल्पाला साथ दिली पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे, असे गृहमंत्री यावेळी म्हणाले.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918089)
Visitor Counter : 208