पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताचे एससीओ अध्यक्षपद या प्रदेशातील बहुपक्षीय, राजकीय, सुरक्षा, आर्थिक आणि लोकांच्या परस्परसंवादाला चालना देणाऱ्या "सुरक्षित एससीओच्या दिशेने” या मंत्रावर आधारित असल्याचे भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन

Posted On: 18 APR 2023 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2023

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या शांघाय सहकार्य संघटना अर्थात एससीओ सदस्य देशांच्या मंत्रालय आणि विभाग प्रमुखांची चौथी बैठक दूरदृश्य माध्यमातून पार पडली.रिपब्लिक ऑफ कझाकस्तान, द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, किरगिझ रिपब्लिक, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, रशियन फेडरेशन, रिपब्लिक ऑफ ताजिकिस्तान, रिपब्लिक ऑफ उझबेकिस्तानचे मंत्री/उपमंत्री यांच्या नेतृत्वाखालील  शिष्टमंडळ आणि एससीओ  सचिवालयातील प्रतिनिधी, एससीओ सदस्य देशांची उच्चस्तरीय शिष्टमंडळे या बैठकीला उपस्थित होती. 

या बैठकीपूर्वी, 18 जानेवारी 2023 रोजी पहिली तदर्थ तज्ञ गटाची बैठक आणि 15 फेब्रुवारी 2023 रोजी दुसरी तदर्थ तज्ञ गटाची बैठक आणि 17 एप्रिल 2023 रोजी तिसरी तज्ञ गटस्तरीय बैठक, अशा तीन बैठका पार पडल्या होत्या. या बैठकीत चार सत्रे झाली ती सर्व  दूरदृश्य माध्यमातून आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत, शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य विकसित करण्याच्या दिशेने स्थिती आणि संभाव्यता तसेच 2022-24 च्या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखड्याचा पाठपुरावा करण्याबाबत एससीओ सदस्य राष्ट्रांचे पर्यावरण संरक्षण क्षेत्रात सहकार्य आदींबाबत एससीओ सदस्य राष्ट्रांची विधाने/भाषणे झाली. 

पंतप्रधानांनी 2018 मधे क्विंगदाओ शिखर परिषदेत "सुरक्षित एससीओच्या दिशेने" हा मंत्र दिला होता. भारताचे एससीओ अध्यक्षपद या मंत्रावर आधारित असल्याचे भूपेंद्र यादव यावेळी म्हणाले.  प्रदेशात बहुपक्षीय, राजकीय, सुरक्षा, आर्थिक आणि लोक-परस्पर संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत एससीओला विशेष महत्व देतो असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू केलेल्या मिशन लाईफचा उल्लेख करत, भारताचे अनुभव आणि  जीवनशैली याबाबत यादव यांनी माहिती दिली. वैयक्तिक, कुटुंब आणि समुदाय-आधारित कृतींसाठी एससीओ समुदायाला मिशन लाईफचा भाग होण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले.

पर्यावरण संरक्षण समस्यांची जबाबदारी असलेल्या एससीओ सदस्य देशांच्या मंत्रालय आणि एजन्सीच्या प्रमुखांच्या चौथ्या बैठकीच्या निकालांव आधारित संयुक्त ज्ञापन नवी दिल्लीत 18 एप्रिल 2023 रोजी या बैठकीत स्वीकारण्यात आले. पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी 2022-24 संकल्पना लागू करण्यासाठी एससीओ कृती आराखड्याच्या आधारे संयुक्त ज्ञापन तयार करण्यात आले आहे.

 

G.Chippalkatti/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 


(Release ID: 1917714) Visitor Counter : 156