ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्र सरकार प्रथमच, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील ग्राहकांच्या तक्रारींबाबत 18 एप्रिल 2023 रोजी मुंबईत संबंधित भागधारक आणि ग्राहक आयोगाशी चर्चा करणार


ग्राहक आयोगाकडे नोंदवण्यात आलेल्या एकूण तक्रारींमध्ये सुमारे 10% प्रकरणे स्थावर मालमत्ता क्षेत्रातील

Posted On: 17 APR 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2023

ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भातल्या  मागील  प्रयत्नांना मिळालेल्या लक्षणीय  यशानंतर केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने आता स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित तक्रारींचे परिणामकारकरित्या निवारण कसे करावे या विषयावर 18 एप्रिल 2023 रोजी मुंबई येथे गोलमेज परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचे आयोजन महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने करण्यात आले आहे. 

ग्राहक आयोगाकडे नोंदवण्यात आलेल्या एकूण तक्रारींमध्ये सुमारे 10% प्रकरणे स्थावर मालमत्ता क्षेत्रातील  आहेत हे यासंदर्भात लक्षात घेणे आवश्यक आहे. सुरुवातीपासून  आतापर्यंत ग्राहकांनी विविध ग्राहक आयोगांकडे  2,30,517 तक्रारी नोंदवल्या आहेत. आतापर्यंत त्यापैकी 1,76,895 तक्रारी सोडवण्यात आल्या असून 53,622 प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. गृहनिर्माण क्षेत्रातील अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी रेरा आणि एनसीएलटी यांसारखी वेगवेगळी न्यायाधिकरणे अस्तित्वात असूनही विविध ग्राहक आयोगांमध्ये दाखल झालेल्या तक्रारी प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढते आहे.

 स्थावर मालमत्ता क्षेत्रातील ग्राहक तक्रार निवारणासाठी विभागाने अशा प्रकारची व्यापक परिषद पहिल्यांदाच आयोजित केली आहे.

या परिषदेत ज्या महत्त्वाच्या घटकांबाबत चर्चा केली जाईल त्यात गृहनिर्माण क्षेत्रातील दाव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक हस्तक्षेपांचा समावेश असणार आहे. या संदर्भात, ग्राहक आयोगात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचे विश्लेषण करण्यात येईल आणि ग्राहकांच्या तक्रारींसाठी कारणीभूत प्रमुख घटक निश्चित करून त्यावर चर्चा घडविण्यात येईल.

विशेषतः  गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी रेरा सारखे   स्वतंत्र प्राधिकरण असूनही ग्राहक आयोगामध्ये या क्षेत्राशी संबंधित तक्रारी अधिक प्रमाणात का दाखल केल्या जात आहेत याची कारणमीमांसा देखील या परिषदेत करण्यात येईल. तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील तक्रारींचा परिणामकारक आणि वेगवान पद्धतीने निपटारा होणे कसे सुनिश्चित करता येईल यावर देखील या परिषदेत विचारविनिमय केला जाणार आहे.

राज्य / जिल्हा ग्राहक आयोगाने दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी भरवलेल्या  राष्ट्रीय लोक अदालतीत तसेच 16 डिसेंबर 2022 रोजी भरलेल्या ग्राहक मध्यस्थ समाधान मेळाव्यात  प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात मोठे यश मिळाले होते. तसेच, ग्राहक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या विमा क्षेत्राशी संबंधित प्रकरणांमध्ये भागधारकांकडून सल्ला मिळवण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने यापूर्वी ‘ग्राहक आणि विमा क्षेत्र’ या विषयावर आधारित गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव मुंबई येथे होणार असलेल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.राष्ट्रीय आयोगाचे सदस्य, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड तसेच गुजरात या राज्यांच्या राज्य आयोगाचे अध्यक्ष, रेराच्या महाराष्ट्र अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, दिल्ली तसेच महाराष्ट्राचे रेरा प्रमुख, दिल्ली, बेंगळूरू,ठाणे,पुणे,रायगड तसेच चंदीगड येथील जिल्हा आयोगाचे अध्यक्ष, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय, रेरा, आयबीबीआय, महाराष्ट्र राज्य सरकार, एएससीआय तसेच सर्व व्हीसीओ आणि बांधकाम समुदाय यांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. 

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी तसेच ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये विहित ध्येय साध्य करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग ग्राहक आयोगामध्ये प्रलंबित प्रकरणांचे प्रमाण कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. या संदर्भात, विभागाने ग्राहक आयोगातील प्रलंबित प्रकरणे कमी करण्याच्या उद्देशाने अनेक मोहिमा हाती घेतल्या आणि या समस्येवर तोडगा काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे.

 

 

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1917352) Visitor Counter : 224


Read this release in: Hindi , Tamil , English , Urdu , Telugu