संरक्षण मंत्रालय
नवोन्मेष आणि संशोधन यांच्या माध्यमातून देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञानात सक्षम कराः उत्कृष्टता साध्य करणे ही काळाची गरज आहेः उदयपूर येथे एका कार्यक्रमात संरक्षणमंत्र्यांचे युवा वर्गाला आवाहन
भारतीय परंपरा, मूल्ये आणि संस्कृती यांचा अंगिकार करण्यावरही भर देण्याचा राजनाथ सिंह यांचा युवा वर्गाला आग्रहः चरित्र विकासाचा तो एक महत्त्वाचा पैलू असल्याचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
15 APR 2023 1:26PM by PIB Mumbai
देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी आणि भारताला सुरक्षित, सामर्थ्यवान आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी नव्या कल्पना पुढे आणाव्यात असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते आज 15 एप्रिल 2023 रोजी उदयपूर येथे जनार्दन राय नगर राजस्थान विद्यापीठाच्या 16 व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. येणाऱ्या काळात तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात वाढणार आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानात उत्कृष्टता आत्मसात करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. या क्षेत्रात नव्या कल्पना मांडाव्यात, नवनिर्मिती, संशोधन करावे आणि या क्षेत्रात आघाडी घेऊन देशाला नव्या उंचीवर घेऊन जावे असे आवाहन त्यांनी युवा वर्गाला केले.
युवा वर्गामध्ये निर्मितीची, जोपासनेची आणि परिवर्तनाची एक वैशिष्ट्यपूर्ण क्षमता असते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नव्या भारताचा दृष्टीकोन लवकरच प्रत्यक्षात येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार युवा वर्गाला आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा आणि वातावरण देत आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये युवा वर्गाला योगदान देता यावे यासाठी संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या पावलांबाबत त्यांनी माहिती दिली .
अर्थव्यवस्था असो विज्ञान आणि तंत्रज्ञान असो, आरोग्य आणि संरक्षण असो, अलीकडच्या काही वर्षात भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला आहे आणि 2027 पर्यंत जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने अगदी योग्य प्रकारे वाटचाल करत असल्याकडे राजनाथ सिंह यांनी निर्देश केला.
“भारत नवी स्वप्ने पाहात आहे आणि आपल्या युवा वर्गाच्या सामर्थ्याने नवी उद्दिष्टे निर्धारित करत आहे. भारताला जगामधील सर्वात सामर्थ्यवान देश बनवण्यासाठी आम्ही झटत आहोत आणि प्रज्वलित युवा मने हा दृष्टिकोन साकार करण्यामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावतील,” राजनाथ सिंह यांनी सांगितले.
भारतीय परंपरा , मूल्ये आणि संस्कृती यांचा अंगिकार करण्याकडेही विद्यार्थ्यांनी इतर विषयांप्रमाणेच लक्ष द्यावे कारण चरित्र विकासाचा तो एक अत्यावश्यक पैलू आहे, असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. समाजासमोर मूल्ये प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांकडून प्रेरणा घेण्याचे राजनाथ सिंह यांनी आवाहन केले. या मूल्यांमुळे भारताची प्रगती परिपूर्ण होईल, असे ते म्हणाले.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1916933)
आगंतुक पटल : 207