अर्थ मंत्रालय
3 महिन्यांच्या मोहिमेदरम्यान पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय अंतर्गत नावनोंदणीला चालना देण्यासाठी वित्तीय सेवा विभाग सचिवांच्या अध्यक्षतेखाली 10 केंद्रीय मंत्रालये/विभागांची बैठक
Posted On:
12 APR 2023 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023
ग्रामपंचायत स्तरावर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ( पीएमएसबीवाय ) या सूक्ष्म-विमा योजनांतर्गत व्याप्ती वाढवण्यासाठी, वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव डॉ. विवेक जोशी यांनी आज, श्रम आणि रोजगार मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, ग्राम विकास मंत्रालय, खाण मंत्रालय, कोळसा मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, टपाल विभाग आणि भारत पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी ) या दहा (10) केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या प्रतिनिधींसह घेतलेल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. 01.04.2023 ते 30.06.2023 या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या या 3 महिन्यांच्या मोहिमेत देशातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे.
या दोन सूक्ष्म-विमा योजनांतर्गत, बचतगट (एसएचजी ) सदस्य, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, खाण कामगार, सर्व असंघटित कामगार, पदपथ विक्रेते, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी कामगार, मनरेगा कामगार आणि पीएम किसान लाभार्थी इत्यादींची जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. जोशी यांनी संबंधित मंत्रालये/विभागांना केले.
पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय विषयी :
सामाजिक सुरक्षा कवचाचा भाग म्हणून नागरिकांना, विशेषत: समाजातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या घटकांना जीवन आणि अपघात विमा संरक्षण प्रदान करणे हे पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय या योजनांचे उद्दिष्ट आहे. कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास रु. 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण पीएमजेजेबीवाय अंतर्गत प्रदान केले जाते तर मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास रु.2 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्वाच्या बाबतीत 1 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण पीएमएसबीवाय अंतर्गत प्रदान केले जाते.अशा प्रकारच्या परिस्थितीत या दोन योजनांच्या लाभार्थ्यांना आणि/किंवा त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत आवश्यक आर्थिक सहाय्य प्रदान करतात.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915958)
Visitor Counter : 176