संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 12 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण वित्त आणि अर्थशास्त्र या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे करणार उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
11 APR 2023 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 12 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण वित्त आणि अर्थशास्त्र या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. संरक्षण (वित्त) मंत्रालयाने परिषदेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून देशांतर्गत आणि परदेशातील सरकारी अधिकारी, दिग्गज धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांना व्यासपीठ उपलब्ध केले जाईल. जागतिक स्तरावर निर्माण होत असलेली सुरक्षा आव्हाने आणि धोरणांच्या संदर्भात संरक्षण वित्त आणि अर्थशास्त्रावरील आपले विचार आणि अनुभव हे मान्यवर यात सामायिक करतील. या परिषदेत अमेरिका, यूके, जपान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश आणि केनिया येथील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
सहभागींमध्ये संवाद आणि सहकार्य वाढवणे, उत्तम आर्थिक संसाधनांसह देशाच्या संरक्षण सज्जतेत योगदान देणे, संरक्षण तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. संरक्षण वित्त आणि अर्थशास्त्र या विषयावरील जागतिक चर्चेत सहभागी होणे आणि या विषयावर शाश्वत ब्लूप्रिंट प्रस्तावित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
विविध देशांच्या सर्वोत्तम पद्धती, अनुभव आणि कौशल्य यांचा प्रसार करणे आणि भारताच्या संदर्भाने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रक्रिया संरेखित करणे हा या परिषदेमागील उद्देश आहे. संरक्षण क्षेत्राचे स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरतेसाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.त्यांना पाठबळ देणे आणि परिवर्तनात्मक सुधारणांना पुढे नेण्यासाठी संरक्षण वित्त आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रात परदेशी सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि जागतिक नेतृत्वासोबत सहकार्य करण्याचीही याद्वारे अपेक्षा आहे.
संरक्षण वित्त आणि अर्थशास्त्र क्षेत्रातील वर्तमान आव्हाने तसेच संधी यांचा चर्चेच्या विषयांमध्ये समावेश असेल. त्यात संसाधनांचे कार्यक्षम आणि प्रभावीपणे कसे वाटप करायचे, ती कशी वापरायची आणि खर्चाच्या दृष्टीने दळणवळणाचे व्यवस्थापन कसे करावे आदी चर्चा विषय समाविष्ट असतील. जगभरातील संरक्षण खरेदीशी संबंधित वित्त आणि अर्थशास्त्राच्या विविध प्रारुप, पद्धती तसेच संरक्षण संशोधन आणि विकासातील ताज्या घडामोडी आणि नवोन्मेषावर देखील सहभागी चर्चा करतील.
याव्यतिरिक्त, संरक्षण क्षेत्रातील मनुष्यबळाच्या सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धतींवर चर्चा केली जाईल.त्यात वेतन, निवृत्तीवेतन, संरक्षण कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि संरक्षण परिसंस्थेतील देखरेख यंत्रणेची भूमिका तसेच कार्ये यांचा समावेश आहे.परिषदेबाबत अधिक तपशील https://cgda.nic.in/ICDFE या संकेतस्थळावर पाहता येईल.
S.Patil/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1915658)
आगंतुक पटल : 256