श्रम आणि रोजगार मंत्रालय
राष्ट्रीय करिअर सेवा(एनसीएस) वर वर्ष 2022-23 मध्ये 35.7 लाख रिक्त पदांची नोंदणी
दहा लाखांहून अधिक नियोक्ते झाले एनसीएस मध्ये सहभागी
Posted On:
11 APR 2023 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
राष्ट्रीय रोजगार सेवेचा कायापालट करण्याच्या उद्देशाने श्रम आणि रोजगार मंत्रालय,राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस ) प्रकल्प मिशन मोड वर राबवत आहे. नोकरीचे मूल्यमापन, करिअर समुपदेशन,व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रमांची माहिती, इंटर्नशिप अशा रोजगाराशी संबंधित सेवा पुरवणे हा यामागील उद्देश आहे.पंतप्रधानांनी 2015 मध्ये राष्ट्राला समर्पित केलेल्या एनसीएस पोर्टल अंतर्गत असलेल्या सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत.
जुलै 2015 मध्ये स्थापना झाल्यापासून एनसीएस पोर्टल वर वर्ष 2022-23 मध्ये रिक्त पदांची सर्वोच्च नोंदणी झाली आहे. नियोक्त्यांकडून वर्ष 2021-22 मध्ये नोंद केलेल्या 13 लाख रिक्त पदांच्या तुलनेत वर्ष 2022-23 मध्ये सुमारे 35.7 लाख रिक्त पदांची नोंद करण्यात आली आहे. वर्ष 2021-22 च्या तुलनेत वर्ष 2022-23 मध्ये एनसीएस पोर्टल वर रिक्त पदांच्या अहवालात 175% वृद्धी झाली आहे. याशिवाय, 2022-23 या वर्षात 30 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वाधिक 5.3 लाख पेक्षा जास्त सक्रिय रिक्त पदांची संख्या नोंदवली गेली.
एनसीएस पोर्टल वर सर्व क्षेत्रात रिक्त पदांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. वित्त आणि विमा क्षेत्रात 800% इतकी अभूतपूर्व वाढ झाली असून 2021-22 मधील 2.2 लाख रिक्त पदांच्या तुलनेत 2022-23 मध्ये 20.8 लाख रिक्त पदांची नोंदणी झाली. कार्यान्वयन आणि सहकार्य क्षेत्रातील रिक्त पदांमध्ये 2021-22 मधील 76 हजारांच्या तुलनेत 2022-23 मध्ये 3.75 लाख म्हणजे 400% वाढ झाली आहे. ‘हॉटेल्स, खाद्य पदार्थ सेवा आणि खानपान ’, ‘उत्पादन ’, ‘आरोग्य’, ‘शिक्षण’, इत्यादी क्षेत्रांमध्येही 2022-23 या वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
एनसीएस पोर्टलची स्थापना झाल्यापासून लॉन्च 2022-23 या वर्षात, दहा लाखांहून अधिक नियोक्ते नोंदणी करण्याचा एक मैलाचा दगड देखील गाठला आहे. नोंदणी केलेल्या एकूण नियोक्त्यांपैकी 8 लाख नियोक्त्यांची नोंदणी वर्ष 2022-23 मध्ये झाली. नियोक्त्यांची सर्वाधिक नोंदणी, सेवा क्षेत्रातील होती (6.5 लाख) त्यापाठोपाठ उत्पादन क्षेत्रातील नियोक्त्यांचा क्रमांक लागतो.
एनसीएस पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा, नोकऱ्या शोधणारे, नियोक्ते, प्रशिक्षण पुरवठादार आणि प्लेसमेंट संस्थांसह सर्व भागधारकांसाठी विनामूल्य आहेत.
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1915641)