संरक्षण मंत्रालय
माजी सैनिकांचे कल्याण आणि पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे 31 व्या केंद्रीय सैनिक मंडळाची बैठक
Posted On:
11 APR 2023 3:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सैनिक मंडळाची ( केएसबी) आज ( 11 एप्रिल, 2023) नवी दिल्ली येथे 31 वी बैठक झाली. माजी सैनिकांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी धोरणात्मक उपाययोजना निश्चित करण्याच्या विविध मार्गांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत बीजभाषण देताना राजनाथ सिंह यांनी माजी सैनिकांचा उल्लेख राष्ट्रीय संपत्ती असा केला. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या समृद्ध आणि व्यावहारिक अनुभवाचा राष्ट्रहितासाठी उपयोग करण्यासाठी नवीन मार्ग तयार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, अनेक राज्यांमध्ये माजी सैनिकांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे, ज्याचे पूर्णपणे पालन आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे.
केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी सैनिकांच्या कल्याणासाठी नेहमीच एकत्र काम केले आहे, त्याचे संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आणि केएसबीच्या वतीने सुरू असलेले कार्य सहकारी संघराज्यवादाचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सशस्त्र दलाच्या ज्येष्ठांच्या दिनाच्या उत्सवाची व्याप्ती वाढविण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला होता. माजी सैनिक समुदायामध्ये अभिमान वृध्दिंगत करणे; सशस्त्र सेना ध्वज दिन निधी अंतर्गत अनुदानात वाढ करणे, सशस्त्र दलातील कर्मचार्यांना मिळणारा राज्यांकडून लाभ/अनुदान यामध्ये एकसमानता आणणे; संबंधित राज्यांमध्ये माजी सैनिक महामंडळाची स्थापना करणे आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य सैनिक मंडळासाठी पुरस्कार देणे. यावर या बैठकीत चर्चा झाली. निवृत्तीवेतन प्रशासन रक्षा (स्पर्श) ही प्रणाली माजी सैनिकांना भेडसावणाऱ्या निवृत्ती वेतनासंबंधीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल, अशी आशा मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. माजी सैनिकांचे तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांचे जमिनीच्या वादाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारांना केले.
विविध राज्यांचे मंत्री; ‘चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ’ – सीडीएस जनरल अनिल चौहान; नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार; लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे; सचिव (माजी सैनिक कल्याण) विजय कुमार सिंह; सचिव, केएसबी कमोडोर एचपी सिंग; राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आणि इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी या बैठकीतील चर्चेत भाग घेतला.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915585)
Visitor Counter : 282