वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
फ्रान्ससोबतच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक भागीदारीला भारताकडून महत्त्वाचे स्थान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा पॅरिसमध्ये भारतीय समुदायाशी संवाद
Posted On:
11 APR 2023 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
जगाचे प्रत्येक क्षेत्रात भारताकडे लक्ष लागून राहिले आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. फ्रान्स सोबतच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक भागीदारी आणि 75 वर्षांच्या मैत्रीला भारत मनापासून महत्त्व देतो असेही त्यांनी सांगितले. संरक्षण, अर्थव्यवस्था, गुंतवणूक इत्यादींमध्ये फ्रान्स हा प्राधान्यक्रमावरील भागीदार आहे. हा 25 वर्षांचा प्रवास खरोखरच भारताच्या प्रगतीच्या प्रवासाचे प्रतिबिंब आहे. फ्रान्ससोबतची ही भागीदारी अधिक मजबूत करण्याची भारताची इच्छा आहे असे ते म्हणाले. फ्रान्समधील चैतन्यशील भारतीय समुदाय दोन्ही देशांमधील खरा जिवंत सेतू म्हणून काम करत आहे. ज्यामुळे तंत्रज्ञान, गुंतवणूक, पर्यटन इत्यादी क्षेत्रात भारताचे फ्रान्ससोबतचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
पॅरिसमध्ये काल भारतीय समुदायाशी गोयल यांनी संवाद साधला. यावेळी भारताची विकासगाथा सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर एक उज्ज्वल देश म्हणून कसा उदयास येत आहे याचे त्यांनी वर्णन केले.
भारत, फ्रान्ससोबतच्या भागीदारीची 25 वर्षे आणि भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. गेल्या 75 वर्षांत साध्य केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींवर चिंतन करण्याचा हा एक उत्तम क्षण आहे असे ते म्हणाले.
सरकारने आपल्या गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात भारतात केलेल्या बदलांचा त्यांनी उल्लेख केला. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या, विशेषत: समाजातील सर्वात खालच्या स्तरातील लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होतेय ना, याची खातरजमा करण्यावर सरकारचे लक्ष आहे. सर्वांसाठी घरे, आरोग्य सेवा, अन्न, वस्त्र, निवारा अशा सर्वच पातळ्यांवर सरकारने जोरदार पाठपुरावा केला आहे असे ते म्हणाले.
कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक काळात देशातील प्रत्येक व्यक्तीला अन्न, पाणी इत्यादी उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले. कोविडचा सामना करण्यासाठी जगातील सर्वात कडक टाळेबंदी असतानाही भारत सरकारने ज्या पद्धतीने सर्व भारतीयांची काळजी घेतली त्याचे जगातील इतर देशांनी कौतुक केले असे त्यांनी सांगितले.
भारताने उर्वरित जगाला मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 2022-23 मध्ये भारताची एकूण निर्यात 765 अब्ज अमेरिकी डॉलर्स पर्यंत वाढणे हे एका नवीन भारताचे उदाहरण आहे. तो उर्वरित जगाला क्षमता, सामर्थ्य आणि आत्मविश्वासाने मार्ग दाखवत आहे. परदेशातील भारतीय समुदायाचा प्रत्येक सदस्य हा भारताचा राजदूत आहे असे गोयल म्हणाले.
पंतप्रधानांनी, 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवण्याचा संकल्प केला आहे. अमृतकाळातील या प्रवासात फ्रान्समधील भारतीय समुदाय हातभार लावू शकतो. भारताला आता राष्ट्रांच्या समुदायात त्याचे योग्य स्थान शोधलेच पाहिजे कारण पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे हीच योग्य वेळ आहे असे गोयल म्हणाले.
S.Thakur/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915561)
Visitor Counter : 147