राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे 11 वे द्वैवार्षिक राष्ट्रीय ग्रासरूट इनोव्हेशन पुरस्कार आणि उत्कृष्ट पारंपरिक ज्ञान पुरस्कार केले प्रदान, राष्ट्रपतींच्या हस्ते फाइन-2023 चे उद्घाटन

Posted On: 10 APR 2023 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (10 एप्रिल, 2023) राष्ट्रपती भवन मधील   सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (एनआयएफ), अर्थात राष्ट्रीय नवोन्मेष प्रतिष्ठानचे, तळागाळातील नवोन्मेषासाठी दिले जाणारे 11 वे द्वैवार्षिक  राष्ट्रीय ग्रासरूट इनोव्हेशन पुरस्कार आणि उत्कृष्ट  पारंपरिक ज्ञान पुरस्कार प्रदान केले. आरबीसीसी जवळच्या क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी फेस्टिव्हल ऑफ इनोव्हेशन अँड आन्त्रप्रूनरशिप (FINE) -2023, अर्थात नवोन्मेष आणि उद्योजकता महोत्सव-2023 चे उद्घाटनही केले.

पुरस्कार समारंभाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, तळागाळातील नागरिकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित नवोन्मेषी उपाय शोधण्याची आणि त्यांच्या सर्वोच्च क्षमतेनुसार देशाची सेवा करण्याची क्षमता आहे. नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन अशा नवोन्मेषींना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने देशाच्या 625 पेक्षा जास्त जिल्ह्यांमधील 325000 पेक्षा जास्त तंत्रज्ञान विषयक कल्पना, नवोन्मेष आणि पारंपारिक ज्ञानावर आधारित पद्धतींचा डेटाबेस तयार केल्याचे त्यांनी नमूद केले. नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन ने आपल्या विविध पुरस्कार समारंभांमध्ये तळागाळातील 1093 नवोन्मेषी आणि शालेय विद्यार्थ्यांचा यापूर्वीच समावेश केला आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  

राष्ट्रपती म्हणाल्या की, आज आपण केवळ नवोन्मेषींच्या यशाचा नव्हे तर सृजनशीलतेची ऊर्जा, नवोन्मेष आणि उद्योजकतेचा उत्सव साजरा करत आहोत. आपल्या सभोवताली आपण रोज छोट्या  प्रमाणातील नवोन्मेष आकाराला येत असताना पाहतो. आपण केवळ सगळीकडे आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या सृजनशीलतेला आणि नवोन्मेषाला समजून घ्यायला हवे आणि त्याला प्रोत्साहन द्यायला हवे.    

राष्ट्रपती म्हणाल्या की सृजनशीलतेला समर्थन आणि प्रोत्साहन देण्याचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे, लहान मुले आणि तरुणांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करणे. आव्हानात्मक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जिज्ञासा आणि चौकस बुद्धीची आवश्यक आहे. आपल्या मुलांनी मोठे होऊन, समस्यांवरील उपाय देणारे बनायला हवे.   

राष्ट्रपती म्हणाल्या की, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या नागरिकांमध्ये देशाची सेवा करण्याची आस हवी. त्याने किंवा तिने देशात निर्माण होणार्‍या समस्या आणि प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा, आणि लहान प्रमाणात का होईना, या समस्या सोडवण्यामध्ये योगदान देण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. नवोन्मेषी, उद्योजक, पारंपरिक ज्ञान धारक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी पर्यावरण-पूरक आणि शाश्वत उपाय शोधण्यासाठी एकत्र यावे, आणि नवोन्मेषाला या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.    

फाइन हा एक आगळा उपक्रम असून, तो विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देतो, आणि नागरिकांना उद्योजकतेकडे वळून भारतात आणि परदेशात आपला ठसा उमटवण्यासाठी प्रोत्साहन देतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या. उद्योजकतेची भावना आणि आव्हानात्मक समस्यांवर उपाय शोधण्याच्या उत्साहाला प्रोत्साहन द्यायला हवे असे त्या म्हणाल्या.

नागरिकांना, https://nif.org.in/fine2023 येथे नोंदणी करून 10 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान नवोन्मेष प्रदर्शनाला भेट देता येईल.

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1915333) Visitor Counter : 157