रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
लडाखशी सर्व ऋतुत संपर्क कायम ठेवण्यासाठीच्या आशियातील सर्वात लांब झोजीला बोगद्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासमवेत केली पाहणी
Posted On:
10 APR 2023 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग संसदीय सल्लागार समितीच्या सदस्यांसमवेत, लडाख बरोबर सर्व ऋतुत संपर्क स्थापित करण्यासाठी बांधण्यात आलेल्या, आशियातील सर्वात लांब झोजीला बोगद्याची तसेच जम्मू-काश्मीरमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली.
जम्मू-काश्मीरमध्ये 25000 कोटी रुपये खर्चून 19 बोगदे बांधले जात आहेत. या अंतर्गत झोजिलामध्ये 6800 कोटी रुपये खर्चाचा 13.14 किमी लांबीचा बोगदा आणि लगतच्या रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. घोड्याच्या नालेच्या आकाराचा, हा 7.57 मीटर उंच सिंगल-ट्यूब, 2-लेन बोगदा आहे, जो हिमालयातील झोजिला खिंडीतून काश्मीरमधील गंडेरबल आणि लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील द्रास शहरादरम्यान बांधला जात आहे. या प्रकल्पामध्ये स्मार्ट टनेल (SCADA) प्रणालीचा वापर करण्यात आला असून बांधकामात न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरण्यात आली आहे. सीसीटीव्ही, रेडिओ कंट्रोल, अखंड वीजपुरवठा, वायुविजन अशा अद्ययावत सुविधांनी हा बोगदा सुसज्ज आहे. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे भारत सरकारची 5000 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची बचत झाली आहे.
झोजिला बोगदा प्रकल्पांतर्गत, 13,153 मीटरचा मुख्य झोजिला बोगदा एकूण 810 मीटर लांबीच्या 4 कल्व्हर्टसह, 4,821 मीटर लांबीचे 4 निलग्रार बोगदे, 2,350 मीटर लांबीचे 8 कट आणि कव्हर तसेच 500 मीटर,391 मीटर आणि 220 मीटर उभे वेंटिलेशन शाफ्ट प्रस्तावित आहेत. झोजिला बोगद्याचे आतापर्यंत 28 टक्के काम पूर्ण झाले आहे.
या बोगद्याच्या बांधकामामुळे लडाखसोबत सर्व ऋतुत संपर्क कायम राखता येईल. सध्या झोजिला खिंड ओलांडण्यासाठी सरासरी प्रवास वेळ तीन तासांचा आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ 20 मिनिटांवर येईल. प्रवासाचा वेळ कमी झाल्याने परिणामी इंधनाचीही बचत होईल.
झोजिला पास जवळील भूभाग अत्यंत प्रतिकूल असून दरवर्षी या भागात अनेक जीवघेणे अपघात होतात. झोजिला बोगदा पूर्ण झाल्यानंतर अपघातांची शक्यता पूर्णपणे नाहीशी होईल. हा बोगदा काश्मीर खोरे आणि लडाख दरम्यान वर्षभर संपर्क सुविधा प्रदान करेल. जे लडाखच्या विकासासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी, स्थानिक वस्तूंची निर्वेध वाहतूक आणि आणीबाणीच्या परिस्थितीत भारतीय सशस्त्र दलांच्या हालचालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असेल.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915310)
Visitor Counter : 253