पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशा द्वारे केलेले संबोधन

Posted On: 04 APR 2023 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2023

 

नमस्कार!

आदरणीय महोदय, राष्ट्रांचे प्रमुख, शिक्षण तज्ञ, व्यवसाय क्षेत्रातील नेते, धोरण कर्ते आणि जगभरातील माझ्या प्रिय मित्रांनो!

आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. भारतामध्ये आपलं स्वागत आहे! सर्वात प्रथम, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी एकत्र आल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. पाचवी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषद, आयसीडीआरआय-2023  नक्कीच विशेष  आहे.

मित्रहो,

सीडीआरआय चा उदय जागतिक दृष्टिकोनामधून झाला आहे. एकमेकांशी जोडल्या गेलेल्या जगात, आपत्तीचा प्रभाव केवळ स्थानिक नसतो. एका प्रदेशातल्या आपत्तीचा प्रभाव पूर्णपणे वेगळ्या प्रदेशावर मोठ्या प्रमाणात पडू शकतो. म्हणूनच, आपला प्रतिसादही वेगवेगळा नाही, तर एकत्रित असायला हवा.    

मित्रहो,

अवघ्या काही वर्षांत, 40 पेक्षा जास्त देश सीडीआरआय चा भाग बनले आहेत. ही परिषद, एक महत्त्वाचं व्यासपीठ बनली आहे. प्रगत अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था, मोठे आणि छोटे देश, ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साउथ या मंचावर एकत्र येत आहेत. यामध्ये केवळ सरकारांचा समावेश नाही, ही गोष्ट देखील प्रोत्साहन देणारी आहे. जागतिक संस्था, विविध क्षेत्रांचे तज्ञ आणि खासगी क्षेत्र देखील यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. 

मित्रहो,

पायाभूत सुविधांवर चर्चा करताना काही प्राधान्यक्रम लक्षात ठेवायलाच हवेत. आपत्ती प्रतिरोधक लवचीक  आणि सर्वसमावेशक पायाभूत सुविधा प्रदान करणं, ही या वर्षीच्या सीडीआरआय ची संकल्पना आहे. पायाभूत सुविधा म्हणजे केवळ फायदे नव्हेत, तर सर्वांसाठी उपलब्धता आणि लवचिकता हे देखील आहे. पायाभूत सुविधांसाठी कोनोही मागे राहता कामा नये आणि  संकट काळातही त्यांनी लोकांना सेवा द्यायला हवी.त्याशिवाय, पायाभूत सुविधांचा दृष्टिकोन सर्वांगीण असण्याची आवश्यकता आहे.वाहतुकीच्या पायाभूत सुविधांइतक्याच सामाजिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा देखील महत्त्वाच्या आहेत

मित्रहो,

आपत्तीच्या काळात,  आपत्तीमुळे बाधित व्यक्तींना मदत करावी, असं स्वाभाविकपणे आपल्याला वाटतं. मदत आणि बचाव कार्याला प्राधान्य दिलं जातं आणि ते योग्यच आहे. एखादी प्रणाली लोकांचं जीवन किती लवकर पूर्वपदावर आणू शकते, त्यालाच लवचिकता म्हणतात. दोन आपत्तीं दरम्यानच्या काळात प्रतिरोध क्षमता विकसित करता येते. यासाठी, भूतकाळातल्या आपत्तींचा अभ्यास करून त्यापासून बोध घेणं, हाच मार्ग आहे. सीडीआरआय आणि ही परिषद यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.

मित्रहो,

प्रत्येक देश आणि प्रदेश वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींचा सामना करतो. या आपत्तींना तोंड देऊ शकतील अशा पायाभूत सुविधांशी संबंधित ज्ञान प्रत्येक समाज विकसित करतो. पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण करताना या ज्ञानाचा हुशारीने वापर करायला हवा. स्थानिक ज्ञानाची जोड दिलेलं आधुनिक तंत्रज्ञान आपत्ती प्रतीरोधासाठी उपयोगी ठरू शकेल. तसंच, चांगल्या प्रकारे दस्त-ऐवजीकरण केलं, तर स्थानिक ज्ञान जागतिक स्तरावरची सर्वोत्तम पद्धती ठरेल!

मित्रहो,

सीडीआरआयच्या काही उपक्रमांमधून यापूर्वीच सर्वसमावेशक उद्देश  स्पष्ट झाला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रेझिलिएंट आयलंड स्टेट्‍स, किंवा आयआरआयएस  हा उपक्रम बेटांवरच्या राष्ट्रांसाठी लाभदायक ठरला आहे. ही बेटं लहान असली, तरी तिथे राहणारा प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्वाचा आहे. गेल्याच वर्षी पायाभूत सुविधा अनुकूल गतिवर्धक कोषाची घोषणा करण्यात आली आहे. या 50 दशलक्ष डॉलर्सच्या निधीने अनेक विकसनशील देशांची रुची वाढली आहे. आर्थिक साधन-संपत्तीची वचनबद्धता, ही कोणत्याही उपक्रमाच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

मित्रहो,

अलीकडच्या काळातल्या आपत्तींनी, आपल्याला आव्हानांच्या व्यापक स्वरुपाची जाणीव  करून दिली आहे. मी काही उदाहरणं देतो. भारत आणि युरोप मध्ये उष्णतेची लाट आली. भूकंप, चक्रीवादळ आणि ज्वालामुखीमुळे अनेक द्वीप देशांचं नुकसान झालं. तुर्कीए आणि सिरीया मधल्या भूकंपामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. तुमचं काम आणखी समर्पक ठरत आहे. सीडीआरआय कडून मोठ्या अपेक्षा आहेत.   

मित्रहो,

या वर्षी, भारत आपल्या G20 अध्यक्षपदाच्या माध्यमातून जगाला एकत्र आणत आहे. आपल्या G20 अध्यक्षपदा अंतर्गत, आम्ही अनेक कार्यगटांमध्ये यापूर्वीच सीडीआरआय चा समावेश केला आहे. या ठिकाणी शोधले जाणारे उपाय, जागतिक धोरण-निर्धारणाच्या सर्वोच्च स्तरावर विचारात घेतले जातील. पायाभूत सुविधांची प्रतिरोध क्षमता, विशेषतः हवामानाशी संबंधित जोखीम आणि आपत्तींविरोधात योगदान देण्याची सीडीआरआय साठी ही एक संधी आहे. आयसीडीआरआय-2023 मधली चर्चा, अधिक लवचीक जगाचा सामायिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी पथदर्शक ठरेल, असा मला विश्वास आहे.   

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913687) Visitor Counter : 295