पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 1780 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी आणि लोकार्पण


वाराणसी कॅन्टॉन्मेंट स्थानक ते गोडोलिया दरम्यान प्रवासी रोपवे प्रकल्पाची केली पायाभरणी

जल जीवन मिशन अंतर्गत 19 पेयजल योजनांचे लोकार्पण

“काशीने लोकांचे पूर्वग्रह चुकीचे ठरवले आणि शहराचा कायापालट करण्यात यश मिळवले."

“गेल्या 9 वर्षात गंगा घाटांच्या परिसराच्या कायापालटाचा प्रत्येकाने अनुभव घेतला आहे”

“गेल्या 3 वर्षात देशातील 8 कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे”

“भारताच्या अमृत काळातील विकासाच्या प्रवासात प्रत्येक नागरिकाचे योगदान राहील आणि कोणीही मागे पडणार नाही यासाठी सरकार झटत आहे”

“उत्तर प्रदेश राज्यातील विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात नव्या पैलूंची भर घालत आहे”

“उत्तर प्रदेश निराशेच्या छायेतून बाहेर पडले आहे आणि आता आकांक्षा आणि अपेक्षांच्या मार्गावर आगेकूच करत आहे”

Posted On: 24 MAR 2023 11:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 1780 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये वाराणसी कॅन्टोनमेन्ट स्थानक ते गोडोवलिया दरम्यानच्या प्रवासी रोपवे प्रकल्पाची पायाभरणी, नमामि गंगा योजनेअंतर्गत भगवानपूर येथे 55 एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सिग्रा स्टेडियमच्या पुनर्विकास प्रकल्पाचा दुसरा आणि तिसरा टप्पा, सेवापुरीमधील इसरवार गावात  हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून उभारला जाणारा एलपीजी बॉटलिंग प्लांट आणि कपडे बदलण्याची सोय असलेल्या खोल्यांसह तरंगती जेटी यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी जल जीवन मिशन अंतर्गत 19 पेयजल योजनांचे देखील लोकार्पण केले. या योजनांचा 63 ग्रामपंचायतींमधील 3 लाखांहून अधिक लोकांना लाभ होणार आहे.या मिशन अंतर्गत 59 पेयजल योजनांची पायाभरणीही त्यांनी केली. फळे आणि भाज्यांची प्रतवारी, वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी कारखियांमध्ये एकात्मिक पॅक हाऊसचे देखील लोकार्पण केले. वाराणसी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत विविध प्रकल्पांचे देखील त्यांनी लोकार्पण केले.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की हा नवरात्रीचा शुभ मुहूर्त आहे आणि आज चंद्रघंटा मातेची पूजा करण्याचा दिवस आहे. या विशेष प्रसंगी वाराणसीच्या नागरिकांमध्ये उपस्थित राहायला मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि वाराणसीच्या समृद्धीमध्ये एक नवीन अध्याय जोडला जात आहे, असे त्यांनी सांगितले. प्रवासी रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे तर वाराणसीच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचे इतर प्रकल्प देखील सुरू करण्यात आले आहेत ज्यात पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, गंगा स्वच्छता, पूर नियंत्रण, पोलीस सेवा आणि क्रीडा सुविधा यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. बनारस हिंदू विद्यापीठात(BHU)  सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन मशीन टूल्स डिझाईन प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे, ज्यामुळे शहरात आणखी एका जागतिक दर्जाच्या संस्थेची भर पडेल, अशी माहितीही त्यांनी दिली. आजच्या विकास प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी वाराणसी आणि पूर्वांचलच्या जनतेचे अभिनंदन केले.

काशीच्या विकासाबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि प्रत्येक अभ्यागत इथून नवी ऊर्जा घेऊन जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. काशीने लोकांच्या शंका चुकीच्या ठरवल्या आणि शहराचा कायापालट करण्यात यश मिळवले, असे ते म्हणाले.

काशीमध्ये एकाचवेळी प्राचीन आणि आधुनिक असे ‘दर्शन’ होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. काशी विश्वनाथ धाम, गंगा घाटाचे काम आणि सर्वाधिक लांब अंतराचा नदी क्रूझ प्रवास यामुळे या ठिकाणी परदेशी पर्यटकांची वर्दळ वाढल्याचे सांगितले. केवळ एका वर्षात सात कोटींपेक्षा जास्त पर्यटकांनी काशीला भेट दिली आहे. यामुळे या शहरात नव्या आर्थिक संधी आणि रोजगार निर्माण होत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

पर्यटन आणि शहराच्या सौंदर्यीकरणाशी संबंधित नवीन विकास प्रकल्पांना देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “रस्ते असोत, पूल असोत, रेल्वे असोत किंवा विमानतळ असोत, वाराणसीशी कनेक्टिव्हिटी पूर्णपणे सुलभ झाली आहे”, पंतप्रधान म्हणाले. नवीन रोपवे प्रकल्प शहरातील कनेक्टिव्हिटीला एका नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे पर्यटकांसाठी नवीन आकर्षण निर्माण होण्याबरोबरच शहरातील सुविधांनाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. बनारस कॅंट रेल्वे स्टेशन आणि काशी-विश्वनाथ कॉरिडॉर यामधील अंतर रोपवे पूर्ण झाल्यानंतर काही मिनिटांत कापता येईल आणि कॅंट स्टेशन आणि गोडोलिया दरम्यानच्या भागातील वाहतूक कोंडी देखील कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

शेजारील शहरे आणि राज्यांमधून येणाऱ्या लोकांना अगदी कमी वेळेत शहराचा फेरफटका मारता येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. रोपवेसाठी आधुनिक सुविधांमुळे आर्थिक घडामोडींचे नवे केंद्र निर्माण होईल, यावर त्यांनी भर दिला.

काशी शहरासोबत हवाई संपर्क मजबूत करणारे एक पाऊल म्हणून बाबतपूर विमानतळावरील नवीन एटीसी टॉवरबद्दलही पंतप्रधानांनी माहिती दिली. तरंगत्या जेटीच्या विकासाच्या मुद्द्याला स्पर्श करत पंतप्रधानांनी यात्रेकरू आणि पर्यटकांच्या गरजा हा मुख्य केंद्रबिंदू असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांनी सांगितले की नमामि गंगे मिशन अंतर्गत, गंगेच्या काठावरील सर्व शहरांमध्ये सांडपाणी प्रक्रियेचे जाळे तयार करण्यात आले आहे. “गेल्या 8-9 वर्षात तुम्ही गंगेच्या बदललेल्या घाटांचे साक्षीदार आहात.”, पंतप्रधान म्हणाले. गंगेच्या दोन्ही बाजूला एक नवीन पर्यावरण मोहीम सुरू आहे जिथे सरकार 5 किलोमीटरच्या पट्ट्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. नैसर्गिक शेती करताना शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नवीन केंद्रे विकसित केली जात असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

वाराणसीसह संपूर्ण पूर्व उत्तर प्रदेश कृषी आणि कृषी निर्यातीचे केंद्र बनत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी वाराणसीमध्ये प्रक्रिया, वाहतूक आणि साठवण सुविधांचा उल्लेख केला ज्यामुळे वाराणसीचा ‘लंगडा’ आंबा, गाझीपूरची  ‘भेंडी’ आणि ‘हिरवी मिरची’, जौनपूरचा ‘ मुळा आणि टरबूज ’ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत आहेत.  

स्वच्छ पेयजलाचा मुद्दा नमूद करत पंतप्रधानांनी यावर भर दिला की सरकारने निवडलेल्या विकासाच्या मार्गात सेवेसोबतच सहानुभूतीचा देखील भाग आहे. आज स्वच्छ पेयजलाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले, तर विविध प्रकल्पांची पायाभरणीही आज करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी ‘हर घर नल से जल’ या मोहिमेकडे लक्ष वेधले. गेल्या तीन वर्षांत देशातील 8 कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा झाला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी उज्ज्वला योजनेचा देखील उल्लेख केला आणि सेवापुरीतील एलपीजी बॉटलिंग प्लांटचा फायदा केवळ लाभार्थ्यांनाच होणार नाही तर पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारमधील गॅस सिलिंडरच्या मागणीची पूर्तता देखील होईल, असे नमूद केले.

केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील सरकारे गरिबांच्या सेवेवर विश्वास ठेवतात, हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, लोक जरी त्यांना 'प्रधानमंत्री' म्हणत असले तरी लोकांच्या सेवेसाठी आपण येथे आलो आहेत, अशी आपली धारणा आहे. आजच्या दिवसात सुरुवातीला विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींशी झालेल्या संभाषणाची आठवण करत पंतप्रधानांनी वाराणसीतील हजारो नागरिक सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पंतप्रधानांनी 2014 पूर्वीच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले ज्या काळात बँक खाते उघडणे सुद्धा एक त्रासदायक काम होते आणि आज देशातील सर्वात गरीब लोकांकडेही जन धन बँक खाती आहेत जिथे सरकारी योजनांचे लाभ सरकारकडून थेट जमा केले जातात, हे निदर्शनास आणून दिले. “लहान शेतकरी असो, व्यापारी असो किंवा महिला बचत गट असो, मुद्रा योजनेद्वारे कर्ज मिळणे खूप सोपे झाले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. गुरेढोरे आणि मत्स्यपालकांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आली आहेत, रस्त्यावरील विक्रेत्यांना पीएम स्वानिधी योजनेद्वारे कर्ज मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि भारताच्या विश्वकर्मांसाठी पीएम-विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. “अमृत काळामध्ये भारताच्या विकासाच्या प्रवासात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे आणि कोणीही मागे राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी यावेळी एक लाख खेळाडू सहभागी झालेल्या खेलो बनारस स्पर्धेतील विजेत्यांसोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी यामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचे आणि विजेत्यांचे अभिनंदन केले. बनारसच्या युवा वर्गासाठी तयार होत असलेल्या क्रीडा सुविधांचा त्यांनी उल्लेख केला. सिग्रा स्टेडियमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पाची आज पायाभरणी झाली. तसेच वाराणसीमध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार असल्याची माहिती दिली.

“आज उत्तर प्रदेश राज्यातील विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात नव्या पैलूंची भर घालत आहे”, पंतप्रधान म्हणाले. उद्या 25 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील योगी सरकारला आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आणि दोन-तीन दिवसांपूर्वी योगीजींनी उत्तर प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही केला आहे, असे त्यांनी नमूद केले. “ उत्तर प्रदेश निराशेच्या छायेतून बाहेर पडले आहे आणि आता आकांक्षा आणि अपेक्षांच्या मार्गावर आगेकूच करत आहे”, अशा शब्दात त्यांनी या राज्याच्या वाटचालीची प्रशंसा केली. समृद्धी सुनिश्चित करणारी वाढलेली सुरक्षा आणि सेवा यांचे उत्तर प्रदेश हे एक ठळक उदाहरण आहे, असे त्यांनी नमूद केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की नव्या विकास प्रकल्पांमुळे आज समृद्धीचा मार्ग बळकट झाला आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  

 

पार्श्वभूमी

गेल्या नऊ वर्षांत, पंतप्रधानांनी वाराणसीचा कायापालट करण्यावर आणि या शहरात आणि लगतच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी राहणीमान सुलभ करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या दिशेने आणखी एक पाऊल टाकत पंतप्रधानांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावरील कार्यक्रमादरम्यान 1780 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले आणि पायाभरणी केली.

वाराणसी कॅंट स्टेशन ते गोडोलिया या प्रवासी रोपवे प्रकल्पाची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 645 कोटी रुपये आहे. ही रोपवे प्रणाली 3.75 किमी लांबीची असून त्यामध्ये  पाच स्थानके असतील. यामुळे पर्यटक, यात्रेकरू आणि वाराणसीतील रहिवाशांना या भागातून ये-जा करणे सोपे होईल.

पंतप्रधानांनी भगवानपूर येथे नमामि गंगा योजनेंतर्गत 300 कोटी रुपये खर्चाने उभारण्यात येणाऱ्या 55 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणी देखील केली. खेलो इंडिया योजनेंतर्गत, सिग्रा स्टेडियमच्या पुनर्विकासाच्या कामाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून सेवापुरी येथे इसरवार गावात उभारण्यात येणाऱ्या एलपीजी बॉटलिंग प्लांटची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. भरथरा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चेंजिग रुमसह एक तरंगती जेट्टी यांसह इतर विविध प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधानांनी जल जीवन मिशन अंतर्गत 19 पेयजल योजनांचे देखील लोकार्पण केले. या योजनांचा 63 ग्रामपंचायतींमधील 3 लाखांहून अधिक लोकांना लाभ होणार आहे.या मिशन अंतर्गत 59 पेयजल योजनांची पायाभरणीही त्यांनी केली.

वाराणसी आणि आजूबाजूच्या शेतकरी, निर्यातदार आणि व्यापार्‍यांसाठी, कारखिया येथे बांधण्यात आलेल्या एकात्मिक पॅक हाऊसमध्ये फळे आणि भाज्यांची प्रतवारी, वर्गीकरण आणि प्रक्रिया करणे शक्य होईल. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी या प्रकल्पाचे राष्ट्रार्पण केले. वाराणसी आणि लगतच्या भागातील कृषीमालाच्या निर्यातीला यामुळे चालना मिळेल.

पंतप्रधानांनी वाराणसी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राजघाट आणि महमूरगंज सरकारी शाळांचा पुनर्विकास, शहरातील अंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण, शहरातील 6 उद्यानांचा आणि तलावांचा पुनर्विकास या प्रकल्पांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले.   लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एटीसी टॉवर, भेलुपूर येथे वॉटर वर्क्स परिसरात 2 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प, कोनिया पंपिंग स्टेशनवर 800 किलोवॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प, सारनाथ येथे नवीन सामुदायिक आरोग्य केंद्र, चांदपूर येथील औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, केदारेश्वर, विश्वेश्वर आणि ओंकारेश्वर खंड परिक्रमा या मंदिरांचा जीर्णोद्धार यांसह इतर विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे देखील पंतप्रधानांनी लोकार्पण केले.

 

 

 

 

 

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1910760) Visitor Counter : 195