अर्थ मंत्रालय
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग व्यवस्थेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक
Posted On:
25 MAR 2023 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2023
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विविध आर्थिक आरोग्यविषयक मापदंडांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक झाली. अमेरिका आणि युरोपमधील काही आंतरराष्ट्रीय बँकांच्या अपयशामुळे उद्भवलेल्या सध्याच्या जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs) लवचिकतेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत किशनराव कराड; वित्तीय सेवा विभाग सचिव डॉ. विवेक जोशी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील उपस्थित होते.
वित्तमंत्र्यांनी या आढावा बैठकीत जोखीम व्यवस्थापन, ठेवींचे वैविध्य आणि मालमत्तेचा आधार यावर लक्ष केंद्रित करून नियामक चौकटीचे पालन करून योग्य परिश्रमासह सज्जता राखण्यावर भर दिला.
जागतिक बँकिंग क्षेत्रातील घडामोडींबाबत जागरुक असून कोणत्याही संभाव्य आर्थिक धक्क्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलत असल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे निर्मला सीतारामन यांना सूचित करण्यात आले. सर्व प्रमुख आर्थिक मापदंड मजबूत आर्थिक आरोग्यासह स्थिर आणि लवचिक असल्याचेही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे सांगण्यात आले.
वित्त मंत्र्यांनी बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना व्याजदराच्या जोखमींबद्दल जागरुक राहण्याचा आणि नियमितपणे तणाव संबंधी चाचण्या घेण्याची सूचना केली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी GIFT सिटी गुजरातमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये उघडलेल्या शाखांच्या पूर्ण क्षमतेचा लाभ घेतला पाहिजे आणि सोबतच भारतीय वंशाच्या व्यक्तींशी संबंधित (PIOs) संभावनांसह आंतरराष्ट्रीय संधी ओळखल्या पाहिजेत, असे निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1910749)
Visitor Counter : 198