पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशात वाराणसी येथे वन वर्ल्ड टीबी समिटमध्ये पंतप्रधानांचे संबोधन


क्षयरोग प्रतिबंधक अल्पकालीन उपचार आणि क्षयासाठी कुटुंब केंद्रित मॉडेलला देशभरात राबवणाऱ्या अधिकृत क्षयमुक्त पंचायत उपक्रमाचा केला प्रारंभ

क्षयमुक्त समाज सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेचा भारताकडून पुनरुच्चार

2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारताकडे सर्वोत्तम योजना, महत्त्वाकांक्षा आणि उपक्रमांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करणारी व्यवस्था आहेः स्टॉप टीबीचे कार्यकारी संचालक

“क्षयरोगासारख्या आजारांविरोधातील संघर्षामध्ये जागतिक संकल्पांना काशी नवी ऊर्जा प्रदान करेल”

“वन वर्ल्ड टीबी समिट च्या माध्यमातून भारत जगाच्या कल्याणाच्या आणखी एका संकल्पाची पूर्तता करत आहे”

“क्षयरोगाविरोधातील लढाईसाठी भारताचे प्रयत्न एक नवा आदर्श आहेत”

“क्षयरोगाविरोधातील लढ्यातील लोकांचा सहभाग हे भारताचे सर्वात मोठे योगदान आहे”

“2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या लक्ष्याच्या दिशेने भारत आता काम करत आहे”

“भारतातील सर्व प्रकारच्या मोहिमा, नवोन्मेष आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा जगातील जास्तीत जास्त देशांना लाभ मिळाला पाहिजे, असे मला वाटते”

Posted On: 24 MAR 2023 3:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे रुद्राक्ष कन्वेन्शन सेंटरमध्ये वन वर्ल्ड टीबी समिट या शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी क्षयरोग प्रतिबंधक अल्पकालीन उपचार आणि क्षयासाठी  कुटुंब केंद्रित मॉडेलला देशभरात राबवणाऱ्या अधिकृत क्षयमुक्त पंचायत सह विविध उपक्रमांचा देखील त्यांनी प्रारंभ केला आणि भारताच्या वार्षिक क्षयरोग अहवाल 2023 चे प्रकाशन केले. पंतप्रधानांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि उच्च प्रतिबंधित प्रयोगशाळेची पायाभरणी केली आणि वाराणसीमधील महानगरी सार्वजनिक आरोग्य देखरेख केंद्राचे उद्घाटन केले. क्षयरोग संपवण्यासाठी केलेल्या प्रगतीबद्दल निवडक राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना पंतप्रधानांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले. राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर कर्नाटक आणि जम्मू काश्मीर या पुरस्कारांचे मानकरी ठरले आणि जिल्हा पातळीवर निलगिरी, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांना पुरस्कार प्राप्त झाला.  

स्टॉप टीबीच्या कार्यकारी संचालक डॉ. लुसिका डिट्यू यांनी सांगितले की जगातील सर्वाधिक प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या वाराणसी या शहरात हजारो वर्षे जुन्या आजारावर म्हणजेच ट्युबरक्युलोसिस किंवा टीबीवर चर्चा करण्यासाठी ही शिखर परिषद होत आहे. या आजाराचा खूप जास्त भार भारतावर आहे मात्र, सर्वोत्तम नियोजन, महत्त्वाकांक्षा आणि विविध उपक्रमांची मोठ्या प्रमाणात होणारी अंमलबजावणी भारताकडे आहे, असे त्यांनी सांगितले. भारताच्या जी-20 अध्यक्षतेमुळे जागतिक कल्याणाची व्याप्ती त्यांनी अधोरेखित केली आणि एक जग एक आरोग्य या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या मार्गावर भारत वाटचाल करत आहे, असे त्या म्हणाल्या. भारतासारख्या देशांच्या प्रयत्नांमुळे क्षयरोगाचे निदान होत नसलेल्या आणि उपचार मिळत नसलेल्या लोकांचे प्रमाण इतिहासात पहिल्यांदाच 30 लाखांच्या खाली गेले आहे, असे त्यांनी सांगितले. क्षयरोगाची हाताळणी आणि क्षयमुक्त भारताचा उपक्रम यांची त्यांनी प्रशंसा केली आणि भारताच्या पाठबळामुळे 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान 22 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांची क्षयरोगावर उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीला उपस्थित रहावे अशी त्यांना विनंती केली. क्षयरोगाविरोधातील या लढाईमध्ये नेतृत्व करावे आणि इतर जागतिक नेत्यांना प्रेरणा द्यावी असे आवाहन देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.  

या कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी वाराणसी येथे वन वर्ल्ड टीबी समिट होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि याच शहरातून ते संसदेचे सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करतात असे नमूद केले. काशी  हे शहर हजारो वर्षांपासून मानवतेचे कष्ट आणि प्रयत्नांचे साक्षीदार असलेल्या निरंतर वाहात असलेल्या प्रवाहाप्रमाणे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

कोणतेही अडथळे असोत, काशीने नेहमीच ‘सबका प्रयास’ने नवे मार्ग तयार करतात येतात हे सिद्ध केले आहे असे त्यांनी सांगितले. क्षयरोगासारख्या आजारांविरोधातील संघर्षामध्ये जागतिक संकल्पांना काशी नवी ऊर्जा प्रदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एक देश म्हणून भारताच्या विचारसरणीचे प्रतिबिंब वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे या भावनेत दिसून येते असे पंतप्रधान म्हणाले.   ही प्राचीन विचारधारा आजच्या प्रगत जगाला एकात्मिक दृष्टी आणि सम्यक उपाय देत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जी 20 अध्यक्ष या नात्याने भारताने ‘एक कुटुंब, एक जग, एक भविष्य’ ही संकल्पना निवडली. जी 20 ची ही संकल्पना संपूर्ण जगाच्या सामायिक भविष्यासाठी एक संकल्प आहे",असे पंतप्रधान म्हणाले. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही संकल्पना भारत जागतिक पातळीवर पुढे नेत आहे आणि वन वर्ल्ड टीबी समिटद्वारे जागतिक हिताचे संकल्प प्रत्यक्षात आणत असल्याचे त्यांनी सांगितले.

2014 नंतर क्षयरोगाचा सामना करण्यासाठी भारताने ज्या वचनबद्धतेने आणि दृढनिश्चयाने स्वतःला झोकून दिले ते अभूतपूर्व असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारताचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. टीबीविरोधातल्या जागतिक युद्धासाठी हे एक नवीन मॉडेल आहे, असं मत त्यांनी व्यक्त केले. गेल्या 9 वर्षांत क्षयरोगाच्या विरोधात सरकारने घेतलेला बहुआयामी दृष्टिकोन त्यांनी मांडला. लोकांचा सहभाग, पोषण वृद्धी, उपचाराच्या नवकल्पना, तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आणि निरोगीपणा आणि प्रतिबंध याला अनुसरून फिट इंडिया, योग आणि खेलो इंडिया उपक्रमांद्वारे यासाठी होत असलेल्या सरकारी प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी केला.

क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी लोकसहभागाला चालना देणाऱ्या नि-क्षय मित्र मोहिमेबद्दल पंतप्रधानांनी सांगितले. सुमारे 10 लाख टीबी रुग्ण नागरिकांनी दत्तक घेतले असून 10 ते12 वर्षे वयाची मुलेही क्षयरोग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना आर्थिक मदत एक हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही मोहीम प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले. या मोहिमेत प्रवासी भारतीयही सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

क्षयरुग्णांसाठी पोषणाचे मोठे आव्हान लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी नि-क्षय मित्र मोहिमेच्या योगदानावर प्रकाश टाकला. सरकारने 2018 मध्ये क्षयरुग्णांसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना जाहीर केली होती आणि परिणामी त्यांच्या उपचारांसाठी अंदाजे 2000 कोटी रुपये थेट बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेले आहेत. सुमारे 75 लाख क्षयरोगी रुग्णांना याचा लाभ झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  नि-क्षय मित्र आता सर्व क्षयरुग्णांसाठी ऊर्जेचा नवीन स्रोत बनले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. कालबाह्य मार्गांचा वापर करत असताना नवीन उपाय शोधणे अत्यंत अवघड आहे हे लक्षात पंतप्रधानांनी लक्षात आणून दिले.  क्षयरोगी उपचारापासून वंचित राहू नयेत यासाठी सरकारने नवीन धोरणे आखली आहेत, असे त्यांनी सांगितले. क्षयरोगाच्या तपासणी आणि उपचारांसाठी आयुष्मान भारत योजना सुरू करणे, देशात चाचणी प्रयोगशाळांची संख्या वाढवणे आणि रुग्णांची संख्या जास्त असलेल्या शहरांवर लक्ष केंद्रीत करून प्रदेश-विशिष्ट कृती धोरणे तयार करणे, ही उदाहरणे त्यांनी दिली. त्याच धर्तीवर ‘क्षयरोग मुक्त पंचायत अभियान’ ही नवीन मोहीम सुरू करण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. क्षयरोग प्रतिबंधासाठी सरकार 6 महिन्यांच्या  क्रमाऐवजी 3 महिन्यांचा उपचार कार्यक्रम सुरू करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी रुग्णांना 6 महिने दररोज औषधे घ्यावी लागत होती, मात्र आता नवीन प्रणालीत रुग्णाला आठवड्यातून एकदाच औषध घ्यावे लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

क्षयरोग मुक्त भारत या मोहिमेत तंत्रज्ञानाचाही समावेश केला असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. नि-क्षय हे पोर्टल आणि विदा- विज्ञानाचा वापर हा याबाबतीत अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे, असे ते म्हणाले.

आरोग्य मंत्रालय व भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था यांनी देशातील या आजाराचे सर्वेक्षण करण्यासाठी निवडलेल्या पद्धतीमुळे भारत हा जागतिक आरोग्य संघटनेव्यतिरिक्त या आजारासंदर्भातील मॉडेल उभे करणारा एकमेव देश ठरला आहे.  क्षयरोगाची घटती रुग्णसंख्या नमूद करायची झाल्यास याचे मानकरी कर्नाटक आणि जम्मू-काश्मीरला आहेत, असे सांगत पंतप्रधानांनी भारताने केलेल्या अजून एका निश्चयाची माहिती दिली.  तो म्हणजे क्षयरोग निर्मूलनाचे जागतिक लक्ष्य 2030 साल असताना भारताने 2025 सालापर्यंत क्षयरोग मुक्ती मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. महामारीच्या काळात  दाखवलेली क्षमता आणि आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी  शोध, निदान, माग, उपचार आणि तंत्रज्ञान यांचा वाढता वापर या आजाराशी दोन हात करण्यास उपयुक्त होईल हे अधोरेखित केले, भारताचा हा दृष्टीकोन स्थानिक असला तरी जागतिक क्षमतेचा आहे, असे ते म्हणाले. या क्षमतेचा एकत्रितपणे वापर करण्यावर त्यांनी भर दिला. क्षयरोगावरची 80 टक्के औषधे भारतातच तयार होतात असे सांगून त्यांनी "भारतातील अशा मोहिमा, संशोधने आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा फायदा अधिकाधिक देशांनी घेतल्यास आपल्याला आवडेल. या परिषदेत सहभागी असलेल्या सर्व देशांनी यासाठी व्यवस्था विकसित करावी- मला खात्री आहे की आमचे हे लक्ष्य नक्कीच पूर्ण होणार.  होयआम्ही क्षयरोगाचे निर्मूलन करणारच", असे पंतप्रधानांनी सांगितले.

कुष्ठरोगाच्या निर्मूलनात महात्मा गांधींनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी गांधीजीं अहमदाबादमध्ये कुष्ठरोग रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले असतानाचा एक घटना सांगितली. रुग्णालयाच्या या दरवाजांना कुलपे लागली तर आपल्याला आनंद होईल, असे त्यांनी समारंभासाठी जमलेल्या लोकांना सांगितल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली.  त्यानंतर पंतप्रधानांनी उल्लेख केला की ते रुग्णालय असेच कित्येक दशके सुरू राहिले आणि कुष्ठरोग निर्मूलन मात्र झाले नाही. 2001 साली कुष्ठरोगाविरुद्धच्या मोहिमेला नवीन आयाम मिळाले. त्यावर्षीच गुजरातमधल्या जनतेने आपल्याला संधी दिली आणि गुजरातमधील कुष्ठरोगाचा दर 23 टक्क्यांवरून एक टक्क्यांपेक्षाही खाली घसरला.  2007 साली आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना कुष्ठरोगासाठीचे हे रुग्णालय बंद झाले, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सामाजिक संस्था आणि सार्वजनिक सहभाग यांची भूमिका यात महत्त्वाचे होती, हे अधोरेखित करत त्यांनी भारत क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत यश मिळवेल.  अशी खात्री व्यक्त केली. हागणदारीमुक्तसौर विद्युत निर्मितीचे क्षमता गाठण्याचे लक्ष्य त्याचप्रमाणे इंधनात ठराविक टक्केवारीने इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठराविक कालमर्यादेआधीच पूर्ण झाले, अशी अनेक उदाहरणे देत आजचा नवीन भारत हा त्याची उद्दिष्टे साधण्याकरता ओळखला जातो असे पंतप्रधान म्हणाले. जनसामान्यांचा सहभागाची शक्ती ही संपूर्ण जगाचा आत्मविश्वास वाढीला लावते असे नमूद करत भारतात क्षयरोगाविरुद्धच्या मोहिमेत मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी जनतेच्या सहभागाला दिले. क्षयरोगाच्या रुग्णांना आजाराची कल्पना देण्याकडेही तेवढेच लक्ष दिले गेले पाहिजे अशी विनंती त्यांनी केली.

आरोग्य सेवांच्या विस्तारासाठी काशीमध्ये  होत असलेल्या कार्याची पंतप्रधानांनी माहिती दिली. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या वाराणसी शाखेचे आज उद्घाटन करण्यात आले. पब्लिक हेल्थ सव्‍‌र्हेलन्स युनिटन अर्थात(सार्वजनिक आरोग्य संनिरीक्षण कक्ष) यांनीही आपले काम सुरू केले आहे. पंतप्रधानांनी यावेळी बीएचयू अर्थात बनारस हिंदू विद्यापीठामधील चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट, रक्तपेढ्यांचे आधुनिकीकरण, आधुनिक ट्रॉमा सेंटर, सुपर स्पेशालिटी ब्लॉक आणि पंडित मदन मोहन मालवीय कर्करोग नियंत्रण केंद्र यांचा उल्लेख केला; जिथे 70 हजारांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यांनी कबीर चौरा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, डायलिसिस सुविधा, सीटी स्कॅन सुविधा आणि काशीच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवांचा विस्तार यांचाही उल्लेख  आपल्या भाषणात केला. वाराणसीमध्ये आयुष्मान भारत योजनेंतर्गत 1.5 लाखांहून अधिक रुग्णांना मोफत उपचार मिळाले आणि 70 हून अधिक जन औषधी केंद्रे रुग्णांना स्वस्त दरात औषधे पुरवत आहेत, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, आपल्या अनुभव, कौशल्य आणि इच्छाशक्तीच्या बळावर भारत देश समूळ क्षयरोग निर्मूलनाच्या मोहिमेत प्रयत्नशील आहे. भारत प्रत्येक गरजू देशाला मदत करण्यास सतत तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले. टीबी अर्थात क्षयरोग विरुद्धची आपली  मोहीम सबका प्रयास (प्रत्येकाच्या प्रयत्नांनी) नेच यशस्वी होईल. मला विश्वास आहे की, आजचे आपले प्रयत्न आपल्या सुरक्षित भविष्याचा पाया मजबूत करतील आणि आपण आपल्या भावी पिढ्यांना एक चांगले जग सोपवण्याच्या स्थितीत असू, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

उत्तर प्रदेशच्या  राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडविय, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि स्टॉप टीबी संस्थेच्या  कार्यकारी संचालक डॉ. लुसिका डिट्यू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  वन वर्ल्ड टीबी परिषदेला संबोधित केले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) आणि स्टॉप टीबी या  भागीदारी संस्थेच्या एकत्रित प्रयत्नातून या शिखर परिषदेचे आयोजन केले गेले आहे. 2001 मध्ये स्थापित, स्टॉप टीबी भागीदारी ही संयुक्त राष्ट्रांनी पुरस्कृत केलेली एक संस्था आहे जिच्या माध्यमातून क्षयरोगाने  बाधित व्यक्ती, समुदाय आणि देशांच्या भावना जगापुढे मांडल्या जातात. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी टीबी-मुक्त पंचायत उपक्रमासह विविध उपक्रम सुरू केले, यात लहान कालावधीच्या क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार पद्धती (टीपीटी) चे संपूर्ण भारतात अधिकृतपणे लोकार्पण; क्षयरोग नियंत्रणासाठी कुटुंब-केंद्रित काळजी घेणारे मॉडेल आणि भारताचा वार्षिक टीबी अहवाल 2023 चे प्रकाशन इत्यादी कार्यक्रमांचा समावेश होता. यावेळी पंतप्रधानांनी निवडक राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना क्षयरोग संपुष्टात आणण्यासंदर्भातल्या  त्यांच्या प्रगतीसाठी पुरस्कारही दिला.

मार्च 2018 मध्ये, नवी दिल्ली येथे आयोजित क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधानांनी भारताला 2025 पर्यंत टीबी-संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे(SDG)निर्धारित वेळेच्या पाच वर्षे अगोदर साध्य करण्याचे आवाहन केले होते. क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी देश पुढे जात असताना, ही जागतिक क्षयरोग शिखर परिषद आपल्याला आपल्या लक्ष्यांवर अधिक विचार करण्याची संधी देईल. याच्या माध्यमातून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातून मिळालेले अनुभव आपल्याला प्रदर्शित करण्याचीही संधी असेल. या परिषदेला 30 हून अधिक देशांचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

 

  

 

 

JPS/GC/SRT/Shailesh P/Prajna/Vijaya/Vikas/PM

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1910327) Visitor Counter : 202