आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डिजिटल आरोग्यावरील जागतिक परिषदेच्या समारोपाप्रसंगी, डिजिटल परिवर्तनातील आव्हाने, संधी आणि यश या विषयावर डॉ. मनसुख मांडविया यांनी केले बीजभाषण
प्रभावी आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी डिजिटल आरोग्य उपायांचा लाभ घेण्याच्या दिशेने भारताने मोठी झेप घेतली आहे: डॉ मनसुख मांडविया
"एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य या जी 20 ब्रीदवाक्याअंतर्गत, डिजिटल आरोग्य परिसंस्थेमध्ये अधिक सहकार्य आणि निरंतर प्रयत्नांसाठी भारत काम करत आहे"
Posted On:
21 MAR 2023 4:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2023
"डिजिटल आरोग्य उपाययोजना फक्त वैयक्तिक आरोग्यसेवा वितरण कार्यक्रमांपुरत्याच मर्यादित नाहीत, तर आरोग्य क्षेत्रातील अनेक परिणामांमध्ये त्यांची व्याप्ती आहे. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य (जीवन शैलीमुळे होणारे) आजार या क्षेत्रातही त्याची व्याप्ती असून त्यामुळे आरोग्य आणि आजार क्षेत्रावरील ताण कमी करण्यात मदत होत आहे असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. "भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत "डिजिटल आरोग्य - शेवटच्या नागरिकापर्यंत सार्वजनिक आरोग्य सेवा पोहचवणे" या जागतिक परिषदेच्या समारोपाच्या प्रसंगी ते बोलत होते. केन्द्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या – दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाद्वारे याचे आयोजन करण्यात आले होते. मार्शल आयलंडचे आरोग्य आणि मानव सेवा मंत्री जो बेजांग आणि डब्लूएचओचे दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक डॉ पूनम खेत्रपाल सिंग यादेखील यावेळी उपस्थित होत्या. नीना बर्गस्टेड, वरिष्ठ सल्लागार, डेटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि सायबर सुरक्षा कार्यालय, डेन्मार्कचे आंतरिक आणि आरोग्य मंत्रालय; बर्नार्डिना डी सौसा, आरोग्य प्रशिक्षणासाठीच्या राष्ट्रीय उपसंचालक, आरोग्य मंत्रालय, मोझांबिक; बदेर अवलादथनी, माहिती तंत्रज्ञान महासंचालक, ओमान आणि डॉ प्रीथा राजारामन, आरोग्य आणि दक्षिण आशिया प्रादेशिक प्रतिनिधी, अमेरिका आरोग्य आणि मानव सेवा विभाग हे मान्यवरही उच्चस्तरीय सत्रात सहभागी झाले.
प्रभावी आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी डिजिटल आरोग्य उपायांचा लाभ घेण्याच्या दिशेने भारताने मोठी झेप घेतली आहे असे डॉ मनसुख मांडवीया यांनी यावेळी अधोरेखित केले. भारताने, माता आणि बाल आरोग्य क्षेत्रात, 200+ दशलक्ष पात्र जोडपी, 140 दशलक्ष गरोदर महिला आणि 120 दशलक्ष मुलांची नाव-आधारित आकडेवारी तयार केली आहे. त्यांचे प्रसूतीपूर्व, प्रसवोत्तर आणि लसीकरण संबंधित आरोग्य सेवांसाठी निरीक्षण केले जात आहे असे त्यांनी सांगितले.
डिजिटल आरोग्य आणि सेवा वितरण या क्षेत्रातील भारताची कामगिरी अधोरेखित करून डॉ मांडवीय यांनी सांगितलं की ”जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने विकसित केलेल्या एकात्मिक आरोग्य माहिती मंचाचा (आयएचआयपी) रोगावर देखरेख ठेवणारी राष्ट्रीय यंत्रणा म्हणून वापर करून भारताने 36 महामारी प्रवण रोगांवर नाव-आधारित, GIS-सक्षम वास्तविक (रियल टाइम) देखरेख ठेवण्यात यश मिळवले आहे .”
याशिवाय डॉ मांडवीय यांनी ई रक्तकोष, ओ आर एस ( देशभरातील आरोग्य सुविधांसाठी नोंदणी करता असलेली ऑनलाइन नोंदणी प्रणाली), मेरा अस्पताल ( रुग्णालये देत असलेल्या आरोग्य सुविधांविषयी अभिप्राय देण्यासाठी उपलब्ध मंच), ई संजीवनी (जगातील सर्वात मोठे टेलिमेडिसिन नेटवर्क) आणि कोविन (लसीकरण व्यवस्थापन मंच ) या संपूर्ण भारतातील इतर डिजिटल अॅप्लिकेशन्सविषयी सांगितले. “आतापर्यंत या प्लॅटफॉर्मद्वारे दूरध्वनीच्या माध्यमातून सुमारे 100 दशलक्ष आरोग्य तक्रारींविषयी सल्लामसलत करण्यात आली आहे तर जागतिक स्तरावर प्रसिद्ध कोविन लस व्यवस्थापन मंचाच्या सहकार्याने कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 2.2 अब्जाहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत“, असे त्यांनी सांगितले. जी 20 परिषदेच्या एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या ध्येयानुर भारत अधिकाधिक सहकार्य आणि निरंतर प्रयत्नांनी डिजिटल आरोग्य परिसंस्था स्थापन करण्यासाठी कार्य करत आहे. भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली भारत वैद्यकीय प्रतिकार, तांत्रिक ज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि किफायतशीर डिजिटल आरोग्य उपाय सामायिक करण्यासाठी एक समान जागतिक व्यासपीठ विकसित करण्यास देखील प्रोत्साहन देत आहे,” असे ते म्हणाले.
जो बेजांग यांनी डिजिटल आरोग्य क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचे कौतुक केले. डिजिटल सुविधांच्या विकासामुळे सेवा वितरण अधिक परिणामकारकरित्या करता येते, औषध आणि पुरवठा व्यवस्थापन यंत्रणेतील दोष दूर करता येतात आणि आणि टेलीमेडिसिन आणि दूरध्वनीवरून केलेल्या सल्ला मसलतीमुळे आवश्यकता नसेल तर प्रत्यक्ष रुग्णालयात जाण्याची गरज कमी होते, असे त्यांनी सांगितले.
"ई-संजीवनी प्लॅटफॉर्मद्वारे 100 दशलक्षाहून अधिक टेलि-कन्सल्टेशन (ई-सल्ला) आयोजित करणे ही काही साधी कामगिरी नाही". अशा शब्दात डॉ पूनम खेत्रपाल सिंग यांनी भारताच्या डिजिटल आरोग्य क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. जागतिक नेते आणि आरोग्य विकास क्षेत्रातील भागीदार, आरोग्य विषयक योजनाकर्ते, डिजिटल आरोग्य नवोन्मेषक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व, शैक्षणिक क्षेत्रासह आणि जगभरातील इतर हितसंबंधीय देखील या परिषदेला उपस्थित होते.
R.Aghor/Vinayak/Bhakti/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1909149)
Visitor Counter : 277