शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील भेदभाव घटनांबाबत शून्य सहिष्णुता बाळगण्यासंबंधी तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य चांगले राखण्याशी संबंधित मुद्यांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न


विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालय वचनबद्ध - केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान

विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी संर्वंकष कार्यकारी मार्गदर्शक तत्वांचा आराखडा तयार करण्याचे धर्मेंद्र प्रधान यांचे मंत्रालयाला निर्देश

Posted On: 20 MAR 2023 10:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2023

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील भेदभाव घटनांबाबत शून्य सहिष्णुता बाळगण्यासंबंधी तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य चांगले राखण्याशी संबंधित मुद्यांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार तसेच शालेय आणि उच्च शिक्षण विभाग, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

संबंधीतांनी तक्रार निवारणासाठीची प्रभावशाली व्यवस्था तयार करावी आणि त्याअंतर्गत परस्परांच्या जबाबदाऱ्याही सुनिश्चित कराव्यात, अशी सूचना प्रधान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. या मुद्याशी संबंधीत सर्व भागधारकांकडून ऑनलाइन माध्यमातून सूचना मागववाव्यात असेही मंत्र्यांनी सूचवले. स्त्री-पुरुष समानता, जातवास्तवाबद्दलची संवेदनशीलता, शैक्षणिक तणाव कमी करणे, समुपदेशनासाठी सर्वंकष व्यवस्था अशा विविध विषयांवरही त्यांनी भाष्य केले. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालय वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांवरचा शिक्षणाचा ताण कमी व्हावा यासाठी शिक्षण मंत्रालयाने वेळोवेळी विविध पावले उचलली आहेत. यात विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून त्यांना शिकण्यामध्ये सहकार्य करणे, १३ प्रादेशिक भाषांमध्ये तंत्रशिक्षण सुरू करणे, १३ भाषांमध्ये प्रवेश परीक्षांची सोय उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्यासाठी मनोदर्पण हा उपक्रम राबवणे, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना प्रतिबंध करणे, अशा समस्यांचे निदान आणि त्यावरच्या उपचारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासारख्या उपाययोजना आणि उपक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगीतले.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक जीवनकाळ हा त्यांच्या मानसिक तसेच वर्तणुकीतील बदलांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, यात सामाजिक संवाद आणि संबंध, नातेसंबंध आणि कारकिर्दीच्या विविध वाटांसंबंधी गुंता किंवा संभ्रम निर्माण करणाऱ्या अनेक पैलुंचा संबंध येत असतो. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतील अशा असंख्य बाबी आहेत. शिक्षणाचा ताण, आपल्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांचा दबाव, तीव्र स्पर्धेचे स्वरुप आलेली शैक्षणिक परिसंस्था, वर्तणुकीशी संबंधीत समस्या, आपल्या कामगिरीशी निगडीत समस्या, मनावरचे दडपण, आपल्या कारकिर्दिविषयीची चिंता, नैराश्य इतकी या समस्यांची व्याप्ती मोठी आहे असे त्यांनी सांगीतले.

या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी दिलेले निर्देश आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याचे सुरक्षीत राखता यावे यासाठी, शिक्षण मंत्रालयाने शालेय तसेच उच्च शिक्षणविषयक संस्थांना सामावून घेऊ शकेल अशा व्यापक आणि संर्वंकष कार्यकारी मार्गदर्शक तत्वांचा आराखडा तयार करायला घेतला आहे.

या मार्गदर्शक तत्वांच्या आराखड्याच्या माध्यमातून, शारीरिक, सामाजिक, भेदभावपूर्ण, सांस्कृतिक तसेच भाषिक अशा कोणत्याही स्वरुपातील धोके तसेच हिंसेमुळे, विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होऊन ते स्वतःलाच नुकसान पोहचवण्याच्या मनस्थितीत पोहचू नयेत म्हणून, अशी परिस्थिती निर्माण होण्यालाच प्रतिबंध करत विद्यार्थी पूर्णतः सुरक्षीत राहू शकतील, अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्वे आणि उपाययोजनांचा अंतर्भाव असलेली संस्थात्मक व्यवस्था उभारली जाणार आहे.

या आराखड्याद्वारे सर्वसमावेशक, एकात्मिक आणि भेदभावाचा स्पर्ष नसणारे वातावरण निर्माण केले जाणार आहे. तसेच याद्वारे शिक्षण संस्थांमधील शिक्षकांमध्ये या विषयाबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी तसेच यादृष्टीनेच त्यांची क्षमतावृद्धी करण्यासाठी या शिक्षक समुहाकरता, जाणिवजागृती, समुपदेशन विषयक कार्यक्रमांचे आयोजन, एखाद्याला आधार देण्यासाठी तसेच, सुरवातीच्या टप्प्यावरच विद्यार्थ्यांमधील मानसिक समस्या ओळखण्यासाठीच्या कृतींविषयीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या परस्परांसोबतच्या सामुदायिक संवादाला चालना देणे, असे विविध उपक्रमक शैक्षणिक उपक्रमाअंतर्गतच राबवले जाणार आहेत. प्रभावशाली आणि गतिमान तक्रार निवारण व्यवस्था, शारीरिक तंदुरुस्तीसाठीच्या तरतुदी आणि उपक्रम, पोषणावरचा भर हे मुद्‌देही या आराखड्याच्या केंद्रस्थानी असणार आहेत. महत्वाचे म्हणजे या सगळ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत संबंधित संस्थाप्रमुख, शिक्षक आणि पालक अशा सर्व घटकांचा वैयक्तिक सहभाग आणि देखरेखही असणार आहे.

 

 

  

 

 

 

 

G.Chippalkatti/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1908983) Visitor Counter : 315