पर्यटन मंत्रालय

जी किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली  शांघाय सहकार्य संघटना(एससीओ) पर्यटन प्रशासनाच्या प्रमुखांची  काशी(वाराणसी) बैठक


 “2023 मध्ये एससीओ अवकाशात पर्यटन विकासाचे वर्ष” यासाठी कृती आराखड्याचा केला अंगिकार

Posted On: 17 MAR 2023 6:56PM by PIB Mumbai

 

केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज काशी(वाराणसी) येथे शांघाय सहकार्य संघटना(एससीओ) पर्यटन प्रशासनाच्या प्रमुखांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला एससीओ संघटनेच्या सदस्य देशांचे विविध मंत्री आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एससीओ सदस्य देशांच्या पर्यटन विभागांचे वरिष्ठ अधिकारी, शांघाय सहकार्य संघटनेच्या सचिवालयाचे आणि भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. एससीओ पर्यटन मंत्र्यांनी एससीओ सदस्य देशांच्या सरकारांमध्ये झालेल्या पर्यटन सहकार्य विकासविषयक कराराची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त कृती आराखडा अंतिम केला आणि त्याला मान्यता दिली. मान्यता मिळालेल्या या संयुक्त कृती आराखड्यामध्ये प्राधान्यक्रमाचे खालील घटक आहेत-

एससीओ पर्यटन ब्रँडची प्रसिद्धी.

पर्यटनात एससीओ सदस्य देशांच्या सांस्कृतिक वारशाची प्रसिद्धी.

पर्यटनातील डिजिटल तंत्रज्ञान आणि माहितीची परस्परांमध्ये देवाणघेवाण आणि सामायिकीकरण.

वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनामधील परस्पर सहकार्याला प्रोत्साहन.

सेवांच्या दर्जात सुधारणा करणे.

 

सदस्य देशांमध्ये सहमती झालेल्या संयुक्त कृती आराखड्यानुसार एससीओ पर्यटन प्रदर्शन, एससीओ खाद्य महोत्सव, पर्यटनावरील वेबिनार आणि परिसंवाद, परिषदा आणि तज्ञांचे मार्गदर्शन  यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करतील.

या बैठकीत 2023 मध्ये एससीओ देशांमध्ये  पर्यटन विकासाचे वर्ष” यासाठी कृती आराखड्याचा देखील अंगिकार करण्यात आला. या दस्तावेजामध्ये एससीओ सदस्य देशांच्या पर्यटन उत्पादनांचे प्रदर्शन आणि प्रसिद्धी करणाऱ्या उपक्रमांची आणि कार्यक्रमांची एक यादी समाविष्ट करण्यात आली आहे.  

या बैठकीनंतर एससीओ सदस्य देशांच्या पर्यटन प्रशासन प्रमुखांकडून एक संयुक्त निवेदन देखील प्रसिद्ध करण्यात आले. एससीओ पर्यटन प्रशासनाच्या प्रमुखांच्या बैठकीपूर्वी भारताच्या अध्यक्षतेखाली तज्ञ कार्य गटाच्या(ईडब्लूजी)  दोन बैठकींचे आयोजन करण्यात आले. पहिली बैठक 31 जानेवारी 2023 रोजी ऑनलाईन घेण्यात आली तर दुसरी बैठक 14-15 मार्च 2023 रोजी काशी(वाराणसी) येथे प्रत्यक्ष उपस्थितीच्या स्वरुपात घेण्यात आली.

काशी’ ही एससीओची पहिली पर्यटन आणि संस्कृती राजधानी म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या मान्यतेमुळे जागतिक पर्यटन नकाशावर या शहराला आणखी जास्त महत्त्व प्राप्त होणार आहे. अध्यात्मवाद, गूढवाद, काशीविषयक अध्ययन यावर जास्त भर देऊन भारतीय संस्कृतीचे उगमस्थानही असलेल्या काशीकडे हा उपक्रम आणखी जास्त प्रमाणात लक्ष वेधून घेईल. एससीओ पर्यटन प्रशासनाच्या प्रमुखांची पुढील बैठक 2024 मध्ये कझाकस्तान येथे होणार आहे. एससीओ पर्यटन प्रशासनांच्या प्रमुखांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या चीन, कझाकस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक आणि उझबेकिस्तान यांच्याशी द्विपक्षीय बैठका देखील झाल्या.   

शांघाय सहकार्य संघटना(एससीओ) ही शांघायमध्ये 15 जून 2001 रोजी स्थापन झालेली आंतरसरकारी संघटना असून त्यामध्ये सध्या  चीन, भारत, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या 8 सदस्य देशांचा समावेश आहे.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908108) Visitor Counter : 122


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Tamil