पंतप्रधान कार्यालय

कर्नाटकमध्ये हुबळी-धारवाड येथे पंतप्रधानांकडून महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण आयआयटी धारवाडचे केले लोकार्पण


सिद्धारूढ स्वामीजी हुबळी रेल्वे स्थानकातील जगातील सर्वात लांब फलाटाचे देखील केले लोकार्पण

हम्पी येथील शिल्पांनुरूप रचना केलेल्या पुनर्विकसित होस्पेट स्थानकाचे देखील केले लोकार्पण

धारवाड बहु ग्राम पाणीपुरवठा योजना प्रकल्पाची केली पायाभरणी

हुबळी धारवाड स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

“राज्यातील प्रत्येक जिल्हा गाव आणि पाड्याच्या संपूर्ण विकासासाठी डबल इंजिन सरकार अतिशय तळमळीने प्रयत्न करत आहे”

“धारवाड खास असून भारताच्या सांस्कृतिक सचेतनपणाचे ते प्रतिबिंब आहे”

“धारवाड मधील आयआयटीच्या नव्या संकुलात दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल, अधिक चांगल्या भविष्यासाठी ते युवा मनोवृत्तीची जोपासना करेल”

“पायाभरणी करण्यापासून ते प्रकल्पाचे उद्घाटन करेपर्यंत डबल इंजिन सरकार सातत्यपूर्ण गतीने काम करत राहते”

“उत्तम शिक्षण सर्वत्र पोहोचले पाहिजे, दर्जेदार संस्थांच्या वाढत्या संख्येनुसार चांगले शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे सुनिश्चित होईल”

“तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि स्मार्ट सुशासन हुबळी-धारवाड भागाला नव्या उंचीवर नेईल”

“आज आम्ही युवा वर्गाला पुढील 25 वर्षात त्यांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची संसाधने देत आहोत”

“सध्या भारत सर्वाधिक सामर्थ्यवान डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक आहे”

“भारताच्या लोकशाहीची मुळे आमच्या अनेक शतके जुन्या इतिहासात रुजलेली आहेत. जगातील कोणतीही ताकद भारताच्या लोकशाही परंपराची हानी करू शकणार नाही”

“कर्नाटक म्हणजे उच्च तंत्रज्ञानयुक्त भारताचे इंजिन आहे”

Posted On: 12 MAR 2023 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मध्ये हुबळी धारवाड येथे महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. लोकार्पण केलेल्या या प्रकल्पांमध्ये आयआयटी धारवाडचा समावेश आहे ज्याची पायाभरणी पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती तसेच श्री सिद्धारूढ स्वामीजी हुबळी स्थानका मधील 1507 मीटर लांबीचा जगातील सर्वात जास्त लांब रेल्वे फलाट म्हणून ज्याला अलीकडेच जागतिक विक्रमांच्या गिनेस बुकने मान्यता दिली आहे तो प्रकल्प आणि होस्पेट हुबळी तिनईघाट सेक्शनचे विद्युतीकरण आणि या भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी होस्पेट रेल्वे स्थानकाच्या दर्जात सुधारणा आदी प्रकल्पांचा समावेश होता.

पंतप्रधानांनी हुबळी धारवाड स्मार्ट सिटी च्या विविध प्रकल्पांचे देखील लोकार्पण आणि पायाभरणी केली.

त्यांनी जयदेव रुग्णालय आणि संशोधन केंद्र, धारवाड बहुग्राम पाणीपुरवठा योजना आणि तुप्परीहल्ल पूरहानी नियंत्रण प्रकल्पांची देखील पायाभरणी केली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या वर्षाच्या सुरुवातीला हुबळीला भेट देण्याची संधी मिळाली होती त्या आठवणीला उजाळा दिला आणि त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या लोकांनी त्यांच्यावर केलेल्या आशीर्वादाचा  वर्षावही  सांगितला.

गेल्या काही वर्षात कर्नाटकमध्ये बंगळुरू पासून बेळगावीपर्यंत कलबुर्गी पासून शिवमोगा आणि मैसूर ते तुमकुर या भागांना दिलेल्या भेटींची त्यांनी आठवण करून दिली. या भेटींमध्ये कन्नडिगांनी त्यांच्याविषयी दाखवलेला जिव्हाळा आणि प्रेम याचे आपण सदैव ऋणी राहू असे पंतप्रधानांनी सांगितले आणि हे सरकार नेहमीच लोकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुकर करण्यासाठी, युवकांसाठी अनेक रोजगार संधी निर्माण करण्यासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत राहील, असे सांगितले.“राज्यातील प्रत्येक जिल्हा गाव आणि पाड्याच्या संपूर्ण विकासासाठी डबल इंजिन सरकार अतिशय तळमळीने काम करत आहे”. पंतप्रधान म्हणाले.

अनेक शतके धारवाड हे मलेनाडू आणि बायलू सीमे या प्रदेशांमधील प्रवेशद्वार राहिले आहे. ज्याने प्रत्येकाचे खुल्या मनाने स्वागत केले आहे आणि प्रत्येकाकडून काहीतरी शिकून स्वतःला समृद्ध केले आहे. त्यामुळेच धारवाड हे केवळ प्रवेशद्वार बनून न राहता कर्नाटक आणि भारत यांच्या गतिशीलतेचे प्रतिबिंब बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपले साहित्य आणि संगीत यासाठी प्रसिद्ध असलेले

धारवाड हे कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी यावेळीं धारवाड मधील सांस्कृतिक क्षेत्रातील महान व्यक्तिमत्वांना अभिवादन केले.

आज दौऱ्याच्या सुरुवातीला मांड्या येथे भेट दिल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.नवा बंगळूरू मैसूरू द्रुतगती मार्ग कर्नाटकची सॉफ्टवेअर हब ही ओळख आणखी पुढे घेऊन जाण्याचा मार्ग प्रशस्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्याचप्रकारे पंतप्रधान म्हणाले की बेळगावीमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे एकतर लोकार्पण होत असे किंवा त्यांची पायाभरणी होत असे. त्यांनी शिवमोगा कुवेंपू विमानतळाचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की हे प्रकल्प आजच्या प्रकल्पांसोबत कर्नाटकमध्ये विकासाची नवी गाथा लिहीत आहेत.

धारवाड मधील आयआयटीचे नवे संकुल दर्जेदार शिक्षणाची सुविधा निर्माण करेल. तर उज्वल भविष्यासाठी आपल्या युवा मनोवृत्तीची जोपासना करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. कर्नाटकच्या विकासाच्या वाटचालीच्या इतिहासात हे नवे आयआयटी संकुल एक नवा अध्याय निर्माण करत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. धारवाड आयआयटी संकुलाच्या उच्च तंत्रज्ञान सुविधांची त्यांनी दखल घेतली आणि हे संकुल एक प्रेरणा स्रोत म्हणून काम करेल जे जगातील आघाडीच्या इतर संस्थांच्या उंचीवर या संस्थेला घेऊन जाईल, असा विश्वास व्यक्त केला. आयआयटी धारवाड संकुल हे सध्याच्या सरकारच्या ‘संकल्प से सिद्धी’ या भावनेचे प्रमुख उदाहरण आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी यावेळी ही आठवण करून दिली की फेब्रुवारी 2019 मध्ये या संस्थेच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती आणि चार वर्षांच्या काळात कोरोना महामारीमुळे अनेक प्रकारच्या अडचणी आल्यानंतरही ते पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पायाभरणी करण्यापासून ते प्रकल्पांचे उद्घाटन करण्यापर्यंत डबल इंजिन सरकार एका निश्चित गतीने काम करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ज्या प्रकल्पांची आम्ही पायाभरणी करतो त्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याच्या संकल्पावर आमचा विश्वास आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

उत्तम दर्जाच्या शिक्षणसंस्थांचा विस्तार केला तर त्यांची पत कमी होते, या मागच्या काळातील विचारप्रक्रियेबद्दल पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली. या विचारपद्धतीमुळेच, युवा पिढीचे खूप मोठे नुकसान झाले असे सांगत, नव्या भारताने मात्र आता असा विचार मागे ठेवला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “उत्तम दर्जाचे शिक्षण सगळीकडे आणि सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि अशा मोठ्या, उत्तम गुणवत्ता असलेल्या संस्थाच अधिकाधिक लोकांपर्यंत उत्तम शिक्षण पोहोचणे सुनिश्चित करतील,” असे त्यांनी नमूद केले. म्हणूनच, गेल्या 9 वर्षात, अशा उत्तम दर्जाच्या संस्थांची संख्या सातत्याने वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, असे ते पुढे म्हणाले. एम्सची संख्या तिपटीने वाढली आहे. गेल्या 9 वर्षात, 250 वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत, त्या आधी स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकात, 380 वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली होती. गेल्या 9 वर्षात अनेक नवे एम्स आणि आयआयटी देखील अस्तित्वात आल्या आहेत.

21 व्या शतकातील भारत आपल्या शहरांचे आधुनिकीकरण करून पुढे जात आहे. हुबळी-धारवाडचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश करण्यात आला असून आज अनेक स्मार्ट प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. "तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि स्मार्ट प्रशासन हुबळी-धारवाड प्रदेशाला नव्या शिखरावर घेऊन जाईल", असं ते पुढे म्हणाले.

बेंगळुरू, म्हैसूर आणि कलबुर्गी इथे कार्यरत असलेल्या श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस अँड रिसर्च संस्थेवर कर्नाटकातील लोकांनी व्यक्त केलेला विश्वास पंतप्रधानांनी अधोरेखित केला. याच संस्थेच्या तिसर्‍या शाखेची पायाभरणी आज हुबळी येथे करण्यात आली.

धारवाड आणि आसपासच्या भागातील लोकांना, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहे, हे ही त्यांनी अधोरेखित केले. जलजीवन अभियानाअंतर्गत, सुरु करण्यात येणाऱ्या 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित असलेल्या योजनेची पायाभरणी आज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत रेणुका सागर जलाशय आणि मलप्रभा नदी यातील पाणी नळाद्वारे 1.25 लाख घरांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. धारवाडमध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार झाल्यावर त्याचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली. आज पायाभरणी करण्यात आलेला आणखी एक प्रकल्प म्हणजे तुपरीहल्ला पूर नुकसान नियंत्रण प्रकल्पाचीही त्यांनी माहिती दिली.  या प्रकल्पामुळे या प्रदेशातील पुरामुळे होणारे नुकसान कमी होईल पंतप्रधान म्हणाले.

कर्नाटकातील सिद्धारुधा स्वामीजी स्थानकावर आता जगातील सर्वात मोठा फलाट बांधण्यात आला असून या राज्याने दळणवळण क्षेत्रातही एक मैलाचा दगड साध्य केला आहे, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हा केवळ फलाटाचा विक्रमी विस्तार एवढेच याचे महत्त्व नसून, यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देणारा विचार पुढे नेला जात आहे असे ते म्हणाले. होस्पेट-हुबळी-तीनईघाट विभागाचे विद्युतीकरण आणि होस्पेट स्थानकाचे आधुनिकीकरण देखील याच दृष्टीकोनाला बळकटी देत असल्याचे त्यांनी नमूद केले.या मार्गावरून उद्योगांसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते.  या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन या प्रक्रियेत पर्यावरणाचे रक्षण होईल, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. या प्रयत्नांमुळे या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल आणि त्याच वेळी पर्यटनालाही चालना मिळेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

"उत्तम आणि प्रगत पायाभूत सुविधा केवळ चांगल्या दिसत नाहीत   तर लोकांचे जीवन देखील सुखकर बनवतात " असे पंतप्रधान म्हणाले. चांगले रस्ते आणि रुग्णालयांच्या अभावी सर्व समुदाय आणि वयोगटातील लोकांना भेडसावणाऱ्या अडचणी अधोरेखित करत पंतप्रधानांनी नमूद केले की, देशभरात विकसित होत असलेल्या प्रगत पायाभूत सुविधांचा लाभ देशातील प्रत्येक नागरिक घेत आहे. त्यांनी विद्यार्थी, शेतकरी आणि मध्यमवर्गाची उदाहरणे दिली जे त्यांच्या गंतव्य स्थानी पोहचण्यासाठी या उत्तम संपर्क व्यवस्थेचा वापर करत आहेत. गेल्या 9 वर्षांत पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने केलेल्या कामाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की, पीएम सडक योजनेच्या माध्यमातून गावांमधील रस्त्यांचे जाळे दुपटीने वाढले आहे तर राष्ट्रीय महामार्गाचे जाळे 55% पेक्षा अधिक वाढले आहे. गेल्या 9 वर्षांत देशातील विमानतळांची संख्या देखील दुपटीने वाढल्याची माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान म्हणाले की, यापूर्वी कधी  इंटरनेटच्या जगात भारताचा इतका दबदबा  नव्हता. मात्र आज भारत सर्वात शक्तिशाली डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. सरकारने स्वस्त दरात इंटरनेट उपलब्ध करून ते खेड्यापाड्यात नेल्यामुळे हे शक्य झाले . “गेल्या 9 वर्षात दररोज सरासरी 2.5 लाख ब्रॉडबँड जोडण्या  देण्यात आल्या ”, अशी माहिती त्यांनी दिली. आज पायाभूत विकास वेगाने होत आहे कारण आज देशाच्या गरजांनुसार पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. यापूर्वी राजकीय नफा-तोटा विचारात घेऊन रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची घोषणा केली जात  होती. आम्ही संपूर्ण देशासाठी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा आणला आहे. जेणेकरून देशात जिथे जिथे गरज असेल तिथे जलद गतीने  पायाभूत सुविधा निर्माण करता येतील”, असे ते म्हणाले.

सामाजिक पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व लक्ष केंद्रित केले जात असल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी घरे, शौचालये, स्वयंपाकाचा गॅस, रुग्णालये आणि पिण्याचे पाणी यांसारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांतील पूर्वीच्या  टंचाईच्या दिवसांची आठवण करून दिली.  या क्षेत्रांकडे कशाप्रकारे लक्ष दिले जात  आहे आणि या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत हे त्यांनी स्पष्ट केले. "आज आम्ही युवकांना पुढील 25 वर्षात त्यांचे संकल्प  साकार करण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध करून देत आहोत", असे ते म्हणाले.

भगवान बसवेश्वरांच्या योगदानाचा उल्लेख करत  पंतप्रधानांनी अनुभव मंडपमची स्थापना ही त्यांच्या अनेक योगदानांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले आणि या लोकशाही व्यवस्थेचा जगभरात अभ्यास केला जातो असे ते म्हणाले. लंडनमध्ये भगवान बसवेश्वरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आल्याची  आठवण त्यांनी सांगितली. मात्र, लंडनमध्येच भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले हे दुर्दैवी आहे असे पंतप्रधान म्हणाले. “भारताच्या लोकशाहीची मुळे आपल्या अनेक शतके जुन्या इतिहासात आढळतात . जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही परंपरांना हानी पोहोचवू शकत नाही”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. “असे असूनही काही लोक सतत भारताच्या लोकशाहीला अडचणीत आणत  आहेत. असे लोक भगवान बसवेश्वरांचा आणि कर्नाटक तसेच  देशातील जनतेचा अपमान करत आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी कर्नाटकच्या जनतेला दिला.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी कर्नाटक हे भारताची भविष्यातील तंत्रज्ञान विषयक ओळख बनेल यावर  भर दिला. “कर्नाटक हे हायटेक भारताचे  इंजिन आहे”, आणि या हायटेक इंजिनाला बळ देण्यासाठी दुहेरी इंजिन  सरकारची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटक सरकारचे मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी आयआयटी धारवाड राष्ट्राला समर्पित केले. फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या संस्थेची पायाभरणी करण्यात आली होती. 850 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या संस्थेत सध्या 4 वर्षांचा बी.टेक. अभ्यासक्रम, आंतर-विद्याशाखीय 5-वर्षीय BS-MS, एम टेक  आणि पीएचडी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

पंतप्रधानांनी श्री सिद्धारूढ स्वामीजी हुबळी स्थानका वरील  जगातील सर्वात लांब रेल्वे फलाट (प्लॅटफॉर्म)  राष्ट्राला समर्पित केला. या विक्रमाला नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मान्यता दिली आहे. सुमारे 1507 मीटर लांबीचा हा  फलाट सुमारे  20 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी होसपेट  – हुबळी  – तीनईघाट या खंडाचे  विद्युतीकरण तसेच या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी  होसपेट स्थानकाचे अद्ययावतीकरण राष्ट्राला  समर्पित केले.  530 कोटींहून अधिक खर्च करून विकसित केलेला हा विद्युतीकरण प्रकल्प इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर वेगवान रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतो. पुनर्विकसित होसपेट स्थानक  प्रवाशांना आरामदायी आणि आधुनिक सुविधा देईल. त्याची रचना हम्पीच्या शिल्पानुरुप  करण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी हुबळी-धारवाड स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांचा एकूण अंदाजे खर्च सुमारे 520 कोटी रुपये आहे. या प्रयत्नांमुळे सार्वजनिक ठिकाणे  स्वच्छ, सुरक्षित आणि कार्यक्षम करून  शहराला भविष्यातील गरजांच्या अनुरूप  शहरी केंद्रात रूपांतरित करून जीवनमान उंचावतील.

पंतप्रधानांनी जयदेव रुग्णालय आणि संशोधन केंद्राची पायाभरणीही केली. सुमारे 250 कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय विकसित केले जाणार आहे. आणि प्रदेशातील लोकांना तृतीयक श्रेणीच्या कार्डियाक सेवा  प्रदान करेल. या प्रदेशातील पाणी पुरवठा आणखी वाढवण्यासाठी, पंतप्रधानांनी धारवाड बहु ग्राम पाणी पुरवठा योजनेची पायाभरणी केली,  यासाठी 1040 कोटींहून अधिक खर्च येणार आहे. तुप्परीहल्ला पूर नुकसान नियंत्रण  प्रकल्पासाठी  सुमारे 150 कोटी रुपये खर्च येणार आहे.  या प्रकल्पाचे उद्दिष्ट पुरामुळे होणारे नुकसान कमी करणे हे आहे आणि त्यामध्ये  भिंती कायम ठेवून बंधारा  बांधणे समाविष्ट आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/Shailesh/Radhika/Sushma/D.Rane



(Release ID: 1906208) Visitor Counter : 149