राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवभारत टाइम्सने आयोजित केलेल्या महिलांच्या बाइक रॅलीला राष्ट्रपतींनी व्हिडिओ संदेशाद्वारे दिल्या शुभेच्छा

Posted On: 12 MAR 2023 4:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (12 मार्च 2023) नवभारत टाइम्सने आयोजित केलेल्या महिलांच्या बाइक रॅलीला व्हिडिओ संदेशाद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या  की, जर महिला सुरक्षित असतील तर कुटुंब सुरक्षित आहे; जर कुटुंब सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित आहे; जर समाज सुरक्षित असेल तर देश सुरक्षित आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की,  महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात ज्या  प्रथा आहेत त्या बंद करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे राज्यघटना सांगते. हे मूलभूत कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा  महिलांप्रती आदरयुक्त दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. महिलांप्रति आदरयुक्त वर्तनाचा  पाया कुटुंबातच घातला जाऊ शकतो. त्यांनी प्रत्येक माता आणि भगिनीला आपल्या मुलामध्ये आणि भावामध्ये सर्व महिलांना आदराची वागणूक देण्याची  मूल्य रुजवण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये महिलांप्रती आदर आणि संवेदनशीलतेची भावना दृढ करणे ही कुटुंबासोबतच शिक्षकांचीही जबाबदारी आहे.

राष्ट्रपतींनी मुलींना सांगितले की, निसर्गाने महिलांना आई बनण्याची क्षमता दिली आहे; आणि जिच्याकडे मातृत्वाची क्षमता आहे, तिच्यात नेतृत्वाची क्षमता स्वाभाविकपणे असते. अनेक मर्यादा आणि आव्हाने असूनही  महिलांनी आपल्या अदम्य साहस आणि कौशल्याच्या बळावर यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

राष्ट्रपती म्हणाल्या की, प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित जाहिराती, बातम्या आणि कार्यक्रमांमध्ये महिलांचा सन्मान आणि सुरक्षेप्रति  पूर्ण संवेदनशीलता असणे अपेक्षित आहे. 

'आत्मनिर्भर भारत' आणि 'नवभारत ' उभारणीचे  उद्दिष्ट तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपल्या मुली आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासाच्या भावनेने पुढे वाटचाल करतील असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1906133) Visitor Counter : 174