गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची आज हैदराबाद येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 54 व्या स्थापना दिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती


देशातील औद्योगिक संस्था, विमानतळ आणि बंदरे यांची सुरक्षा सुनिश्चित करून, सीआयएसएफने गेल्या 53 वर्षांत देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये लक्षणीय योगदान दिले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि ते साध्य करण्यासाठी आपले विमानतळ, बंदरे, राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे

Posted On: 12 MAR 2023 3:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2023

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज हैदराबाद येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) 54 व्या स्थापना दिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात , केंद्रीय गृहमंत्र्यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सेंटिनेल-2023 मासिकाचे आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. यावेळी तेलंगणाच्या राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुंदरराजन, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री  जी. किशन रेड्डी, सीआयएसएफचे महासंचालक , इतर अनेक मान्यवर आणि सीआयएसएफचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयही  उपस्थित होते.

   

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, सीआयएसएफचा 53 वर्षांचा इतिहास, देशाच्या आर्थिक प्रगतीतले  त्याचे मोठे योगदान दर्शवतो.  एखादा देश तेव्हाच प्रगती करू शकतो जेव्हा त्याच्या औद्योगिक संस्था, विमानतळ आणि बंदरे यांची सुरक्षा सुनिश्चित केली जाते असे ते म्हणाले. सीआयएसएफच्या प्रत्येक जवानाने सीआयएसएफची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करून गेल्या 53 वर्षांमध्ये देशाची अमूल्य सेवा केली आहे असे ते पुढे म्हणाले.

   

केंद्रीय गृह  आणि सहकार मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले असून ते साध्य करण्यासाठी आपले विमानतळ, बंदरे आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. सीआयएसएफ भविष्यातील सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत:ला सज्ज  करून देशाची यापुढेही सेवा करत राहील, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

  

वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत गेल्या 4 वर्षात 3 कोटींहून अधिक झाडे लावून पर्यावरणाप्रति आपली जागरूकता आणि समर्पण दाखवून दिले आहे असे अमित शाह म्हणाले.

भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असून देशाच्या औद्योगिक संस्था, खाणी, विमानतळ सुरक्षित राखणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

   

ज्या देशाची विमानतळे आणि बंदरे सुरक्षित नाहीत, तो देश कधीही सुरक्षित असू शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.  आज आपल्यासमोर बनावट चलनाचा व्यापार, घुसखोरी आणि अंमली पदार्थ यांसारखी अनेक आव्हाने आहेत आणि उज्ज्वल इतिहास असलेल्या सीआयएसएफने देशाला सुरक्षित केले आहे असे ते म्हणाले .

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906103) Visitor Counter : 157