युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे एका भव्य उद्घाटन समारंभात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून 'खेलो इंडिया दस का दम' चा केला प्रारंभ
है दम तो बढ़ाओ कदम' हे 'खेलो इंडिया दस का दम' या कार्यक्रमाचे घोषवाक्य असून, खेळांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही उचललेले आणखी एक मोठे पाऊल आहे: अनुराग सिंह ठाकूर
50 हून अधिक शहरांमध्ये एकाच वेळी स्पर्धेचा प्रारंभ
Posted On:
10 MAR 2023 4:46PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे एका भव्य उद्घाटन समारंभात 'खेलो इंडिया दस का दम' कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला आज देशातील 50 हून अधिक शहरांमध्ये एकाच वेळी सुरुवात झाली.
अनेक महिन्यांपासून देशभरात सुरू असलेल्या विविध खेलो इंडिया महिला लीगच्या यशस्वी आयोजनानंतर सुरु झालेला दस का दम हा उपक्रम देशभरातील हजारो महिलांना आणखी नव्या संधी मिळवून देईल. 10 ते 31 मार्च या कालावधीत एकूण 10 खेळांमध्ये भारतातील 26 राज्यांमधील 50 हून अधिक शहरांमध्ये आयोजित स्पर्धेत सुमारे 15000 खेळाडू सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी भारत सरकारकडून एकूण 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शुक्रवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमाच्या भव्य शुभारंभाला क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदिप प्रधान तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रिडा प्राधिकरणातील इतर मान्यवर उपस्थित होते. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या उद्घाटन समारंभाला सुमारे 2000 महिला खेळाडूंनी हजेरी लावली. यामध्ये खेलो इंडिया दस का दम मध्ये सहभागी खेळाडू तसेच शिबिरार्थींचा देखील समावेश होता.
“है दम तो बढ़ाओ कदम' हे 'खेलो इंडिया दस का दम' या कार्यक्रमाचे घोषवाक्य असून खेळाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही उचललेले हे आणखी एक मोठे पाऊल आहे,” असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले. “गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरातील 14 खेळांमध्ये महिला लीग आयोजित करण्याच्या भारतीय क्रिडा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे 20,000 महिला खेळाडूंना त्यांना आवश्यक असलेली क्रीडासंधी आणि सक्षमीकरण प्राप्त झाले आहे, असे ते म्हणाले. या लीगला मोठे यश मिळाले आहे हे सांगताना आपल्याला आनंद होत असल्याचे ठाकूर म्हणाले.
मेरी कोम आणि पी व्ही सिंधू यांसारख्या यशस्वी क्रीडापटूंची उदाहरणे देत ठाकूर म्हणाले की, “मेरी कोम ते लव्हलिना ते निखत आणि पी व्ही सिंधू ते सायना नेहवाल, या खेळाडूंनी खेळासाठी स्वतःला वाहून घेत भारताला वेळोवेळी गौरव प्राप्त करून दिला आहे. अशा स्पर्धांमुळे आता असे आणखी सुपरस्टार निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वोत्कृष्ट स्पर्धा आणि खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न राहिला असून आता सर्व महिलांनी त्यांच्या क्रीडा क्षमतेचे दर्शन घडवण्याची वेळ आली आहे.” असेही ते म्हणाले.
उद्घाटन समारंभाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असलेल्या 8 वर्षीय ट्रॅक अँड फील्ड क्रीडा प्रकारातील खेळाडू साक्षीसोबत अनुराग सिंह ठाकूर यांनी दिल्लीतील या कार्यक्रमाला झेंडा दाखवला. साक्षी 'खेलो इंडिया दस का दम' कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वात लहान सहभागींपैकी एक आहे. खो-खो, जलतरण, ऍथलेटिक्स, वुशू, तिरंदाजी, तलवारबाजी, ज्युडो, भारोत्तोलन, हॉकी आणि योगासन या क्रीडा प्रकारांचे आयोजन या कार्यक्रमात केले जाणार आहे.
स्थळांच्या यादीसाठी येथे क्लिक करा.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905618)
Visitor Counter : 192