वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय चहा उद्योगाला पाठबळ देण्यासाठी आणि चहाला जागतिक ब्रँड बनवण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना

Posted On: 02 MAR 2023 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2023  

देशात चहाच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी, तसेच चहाचा एक विशिष्ट ब्रँड तयार करण्यासाठी आणि चहा उद्योगाशी संबंधित कुटुंबांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी भारताने अनेक पावले उचलली आहेत.

भारत जगातील चहाचा दुसऱ्या क्रमाकांचा सर्वात मोठा चहा उत्पादक देश आणि काळ्या चहाचे सर्वाधिक म्हणजे 1350 मेट्रिक किलो उत्पादन करणारा देश आहे. चहाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर देश असून चहाची निर्यातही करतो. भारत, काळ्या चहाचाही मोठा ग्राहक असून, जगातील एकूण काळ्या चहापैकी 18 टक्के चहा भारतात विकला जातो. भारतातील चहा जगाच्या विविध भागात निर्यात केला जात असून देशांतर्गत चहाची संपूर्ण गरज भागवून, भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चहा निर्यातक देश ठरला आहे.

भारतीय चहा उद्योगामुळे 1.16 दशलक्ष कामगारांना थेट रोजगार मिळाला आहे आणि साधारण तितकेच लोक अप्रत्यक्षपणे या उद्योगाशी संबंधित आहेत.

छोटे चहा उत्पादक हे एक उदयोन्मुख क्षेत्र असून एकूण उत्पादनात ते जवळपास 52% योगदान देतात. सध्या पुरवठा साखळीमध्ये जवळपास 2.30 लाख लहान चहा उत्पादक आहेत. या क्षेत्रासाठी, खालील पावले उचलली गेली आहेत:

  • भारत सरकारने चहा मंडळाच्या माध्यमातून 352 बचत गट (SHG), 440 शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आणि 17 शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) तयार करण्यात मदत केली होती.
  • चहाची पाने खुडण्याची प्रक्रिया उत्तम दर्जाची असावी, तसेच क्षमता बांधणी, जलद पीक व्यवस्थापन अशा सगळ्यासाठी एसटीजी सोबत विविध चर्चासत्रे आणि संवाद करण्यात आला.
  • छाटणी यंत्रे आणि यांत्रिक कापणी यंत्रांच्या खरेदीसाठी सहाय्य.
  • उद्योजक आणि बेरोजगार तरुणांना पाठबळ  देण्यासाठी चहाचे छोटे कारखाने उभारणे.
  • चहा मंडळाने उत्पादक आणि उपुरवठादार यांच्यात पुरवल्या जाणाऱ्या हिरव्या पानांच्या किंमती निश्चित करण्यासाठी किंमत शेअरिंग फॉर्म्युलासाठी निविदा काढली. या वैज्ञानिक पद्धतीचा  अनेक लोकांना फायदा होण्याची अपेक्षा असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. लहान चहा उत्पादकांना चांगली किंमत आणि माहिती मिळावी यासाठी एक मोबाईल अॅप "चाय सहयोग" देखील विकसित केले जात आहे.
  • चहा उत्पादक कामगारांचे जीवनमान आणि शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी, चहा मंडळाने, “छोट्या चहा उत्पादकांच्या पाल्यांसाठी शिक्षणविषयक आर्थिक सहाय्य योजना” देखील सुरू केली आहे.
  • 2022-23 या वर्षात जानेवारी 2023 पर्यंत रु. या घटकासाठी 3.25 कोटी वितरीत करण्यात आले असून 2845 जणांना  त्याचा लाभ मिळाला आहे.

भारतीय चहा निर्यातदार आंतरराष्ट्रीय बाजारात सक्षमपणे स्पर्धा करत असून त्यामुळे, भारतीय चहाचे जागतिक पातळीवर विशिष्ट स्थान निर्माण झाले आहे. 2022-23 या काळात विविध भू-राजकीय, भौगोलिक-आर्थिक आणि लॉजिस्टिक आव्हाने असूनही भारतीय चहा निर्यात 883 दशलक्ष डॉलर्सच्या निर्धारित उद्दिष्टांपैकी 95% पेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य करेल. शिवाय, निर्यातदारांनी केलेल्या मागणीनुसार, कंटेनरची उपलब्धता इत्यादीसारकहे लॉजिस्टिक अडथळेही दूर करण्यात आले आहेत.

चहा उद्योगाला पाठबळ देण्यासाठी खालील पावले उचलण्यात आली आहेत.:

  • बाजाराच्या स्थितीबद्दल आलेल्या अहवालांवर चर्चा करण्यासाठी आणि चहाच्या निर्यातीत आणखी वाढ करण्याच्या संधीचा शोध घेण्यासाठी, विशेषतः इराक, सीरिया, सौदी अरब, रशिया अशा पारंपरिक चहा आयात करणार्‍या देशांच्या संदर्भात, परदेशातील भारतीय दूतावासांच्या मदतीने अधूनमधून विविध खरेदीदार-विक्रेता बैठका आयोजित केल्या जात आहेत.
  • चहा मंडळाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, चहाच्या निर्यातीसाठी RoTDEP चा दर 6.70 प्रति किलो  रुपयांच्या वाढीव मर्यादेसह वाढविण्यात आला आहे.  पूर्वी हा दर.3.60 प्रति किलो इतका होता.
  • चालू आर्थिक वर्षात, डिसेंबर 2022 पर्यंत देशातून 188.76 दक्षलक्ष किलो चहाची निर्यात झाली, ज्यांचे मूल्य 641.34 दशलक्ष डॉलर्स इतके होते. यात चहामध्ये 33.37 दक्षलक्ष इतकी वाढ तर, मूल्यात 70.93 दशलक्ष डॉलर्सची वाढ नोंदवली गेली आहे.
  • भारतीय चहा, त्याचे आरोग्यदायी लाभ यांची माहिती देणाऱ्या जाहिराती वाढवून भारतीय चहाचे ब्रँडिंग करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
  • टीबीआय सहभागी असलेल्या सर्व महत्त्वाच्या मंचांवर आणि कार्यक्रमांमध्ये विशेष  ब्रँडच्या चहाचे लोगो ठळकपणे प्रदर्शित केले जातात आणि या लोगोच्या वापरासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यासाठी भागधारकांना मदत केली जाते.

दार्जिलिंग चहा हा भारतातील प्रतिष्ठित उत्पादनांपैकी एक आहे जो पहिला GI नोंदणीकृत आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ भागात 87 चहाच्या बागांमध्ये त्याचे उत्पादन केले जाते. या चहाच्या बागांमध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त वयाची 70% पेक्षा जास्त झुडपे आहेत आणि त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होतो.आज दार्जिलिंग चहाचे साधारण उत्पादन, 6-7 दशलक्ष किलो इतके आहे. नेपाळमधील स्वस्त चहाच्या आयातीच्या आव्हानासह दार्जिलिंग चहा उद्योगाच्या इतर समस्या  दूर करण्यासाठी, दार्जिलिंग चहा उद्योगाच्या भागधारकांसह चहा मंडळाने एक समिती स्थापन केली असून ती संभाव्य उपाय शोधत आहे. स्वस्त आयात केलेल्या चहाच्या दर्जाच्या कठोर तपासणीसाठी चहा मंडळ आणि मंत्रालयाकडून विविध पावले उचलली जात आहेत.

त्याशिवाय, चहा मंडळाने "चहा विकास आणि प्रोत्साहन योजना, 2021-26" मध्ये आणखी सुधारणा सुचवल्या आहेत.  ज्यात चहा उद्योगाच्या सर्वांगीण लाभासाठी अनेक घटक समाविष्ट केले आहेत. वितरण आणि लाभार्थ्यांची ओळख यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी, “सर्व्हिस प्लस पोर्टल” अंतर्गत ऑनलाइन यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

 


S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1903630) Visitor Counter : 437