रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्थेची (एनआयपीपीईआर) नियामक मंडळाची पहिली बैठक संपन्न
औषध निर्माण क्षेत्रातील सर्वांगीण संशोधन परिसंस्था मजबूत करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
Posted On:
01 MAR 2023 3:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2023
“औषधनिर्मिती क्षेत्राच्या शाश्वत वाढीसाठी संशोधन आणि नवोन्मेषकता आवश्यक आहेत. संशोधन आधार वाढवणे, उद्योग निर्माण आणि पायाभूत सुविधा वाढवणे याद्वारे आपले लक्ष स्वयं-निर्वाह प्रारुपाकडून नफा प्रारुपाकडे वळले पाहिजे. इतर संस्थांसह सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींच्या अंमलबजावणीसह आपल्या मनुष्यबळ कौशल्याचा वापर केला पाहिजे. तरच आपण राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था (एनआयपीपीईआर) ही उच्च दर्जाच्या संशोधनाचे केंद्र बनवू शकू आणि देशात औषध निर्माण नवोन्मेषासाठी एक मूलभूत आधार तयार करू शकू.”
केंद्रीय रसायने आणि खते मंत्री, डॉ. मनसुख मांडविया, राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (एनआयपीपीईआर) पहिल्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था (एनआयएचएफडब्लू), येथे काल ही बैठक झाली. लोकसभा सदस्य रमेश बिधुरी, डॉ. मदिला गुरुमूर्ती, राज्यसभा सदस्य डॉ. राधामोहन दास अग्रवाल यावेळी उपस्थित होते. मालविया यांनी मार्गदर्शक तत्त्वे आणि संरचनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी प्रत्येकाकडून सूचना मागवल्या जेणेकरून सर्व भागधारक दर्जेदार कल्पना घेऊन येतील. त्या वेगाने कार्यान्वित करता येतील.
"सरकारने, औषध निर्माण नवोन्मेष, औषध निर्माणामधील संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम यांसारखी विविध पावले सुरू केली आहेत असे मांडविया यांनी सांगितले. वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य तंत्रज्ञान यासारख्या विशिष्ट प्राधान्य क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्योगांना देखील प्रोत्साहित करायला हवे. आपण एनआयपीपीईआर मार्फत स्पर्धात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उपाय शोधले पाहिजेत. हे केवळ एनआयपीपीईआर मधीलच नव्हे तर जैवतंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, आयसीएमआर, डीआरडीओ इत्यादी संबंधित संशोधन संस्थांमध्ये मजबूत सहकार्य आणि सल्लामसलती द्वारेच होऊ शकते. या संदर्भात, समवयस्क, संशोधक यांच्यात औपचारिक आणि अनौपचारिक संवाद साधणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी आणि त्यांना व्यापारीकरणासाठी अधिक बळ देण्यासाठी, संशोधन भांडाराचा विस्तार करण्याची सूचना डॉ. मांडविया यांनी केली. यामुळे संशोधकांमध्ये अधिक चांगला समन्वय निर्माण होईल आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उत्पादनांसाठी अधिक चांगले संशोधन करण्यासाठीच्या प्रयत्नांचा समन्वय साधता येईल, असे ते म्हणाले.” एनआयपीपीईआर संशोधन पोर्टल हे सर्व एनआयपीपीईआरच्या संशोधन उपक्रमांबद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी आणि इतर संशोधकांना, विशेषत: उद्योगांना संबंधित संस्थांशी संपर्क साधण्यासाठी मदत करण्यासाठी एक पाऊल आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी एनआयपीपीईआरला तरुण पिढीच्या कलागुणांचा उपयोग करून, शैक्षणिक स्वायत्ततेला चालना देऊन आणि त्यांच्या संशोधनाची उद्दिष्टे साध्य करून एक चैतन्यशील वैज्ञानिक समुदाय निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले.
S.Thakur/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903356)
Visitor Counter : 191