पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कर्नाटकमधील बेळगावी येथे 2,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले
पीएम-किसान अंतर्गत सुमारे 16,000 कोटी रुपयांची 13 व्या हप्त्याची रक्कम केली जारी
पुनर्विकसित बेळगावी रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे केले लोकार्पण
जल जीवन मिशन अंतर्गत सहा बहु-ग्राम योजना प्रकल्पांची केली पायाभरणी
"आजचा बदलता भारत वंचितांना प्राधान्य देत एकामागून एक विकास प्रकल्प पूर्ण करत आहे"
2014 पूर्वी देशात कृषी क्षेत्रासाठी 25,000 कोटी रुपये तरतूद होती , त्यात पाच पट वाढ करत ती आता 1,25,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली
"भविष्यातील आव्हानांचे विश्लेषण करताना भारतातील कृषी क्षेत्र अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर "
"दुहेरी इंजिन सरकार म्हणजे वेगवान विकासाची हमी आहे"
“खरगे जी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, मात्र त्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते त्यावरून संपूर्ण जगाला समजलंय रिमोट कंट्रोल कोणाकडे आहे ”
"सच्च्या हेतूने काम केले तरच खरा विकास घडतो"
Posted On:
27 FEB 2023 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकमधील बेळगावी येथे 2,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. तसेच त्यांनी पीएम-किसान अंतर्गत सुमारे 16,000 कोटी रुपयांची 13 व्या हप्त्याची रक्कम जारी केली. पंतप्रधानांनी पुनर्विकसित बेळगावी रेल्वे स्थानकाची इमारत राष्ट्राला समर्पित केली. तसेच जल जीवन अभियानांतर्गत सहा बहु-ग्राम योजना प्रकल्पांची पायाभरणीही केली.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, बेळगावच्या लोकांचे अतुलनीय प्रेम आणि आशीर्वाद सरकारला जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देतात आणि शक्तीचा स्रोत बनतात. “बेळगावी येणे हे तीर्थयात्रेपेक्षा कमी नाही” असे पंतप्रधान म्हणाले. ही चित्तूरची राणी चेन्नम्मा आणि क्रांतिवीर सांगोली रायण्णा यांची भूमी असून वसाहतवादी राजवटीविरोधात आवाज उठवल्याबद्दल आजही त्यांचे स्मरण केले जाते असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी बेळगावीचे योगदान अधोरेखित करत सांगितले की आजच्या लढ्यात आणि भारताच्या पुनरुत्थानात याला स्थान लाभले आहे. कर्नाटकातील स्टार्टअप संस्कृतीशी साधर्म्य साधत पंतप्रधान म्हणाले की, बेळगावीमध्ये शंभर वर्षांपूर्वी देखील स्टार्टअप होते. यावेळी त्यांनी बाबुराव पुसाळकर यांचे उदाहरण दिले, ज्यांनी बेळगावीमध्ये एक कारखाना स्थापन करून विविध उद्योगांचा पाया रचला. चालू दशकात बेळगावीची ही भूमिका दुहेरी इंजिन सरकारला आणखी मजबूत करायची आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.
ज्या प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे तसेच ज्यांचे आज उद्घाटन झाले आहे त्यांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, या प्रकल्पांमुळे बेळगावीच्या विकासाला नवी ऊर्जा आणि गती मिळेल. कनेक्टिव्हिटी आणि पाण्याच्या सुविधांशी संबंधित शेकडो कोटींच्या प्रकल्पांबद्दल त्यांनी या प्रदेशातील नागरिकांचे अभिनंदन केले. बेळगावीच्या माध्यमातून आज देशातील प्रत्येक शेतकऱ्याला एक विशेष भेट मिळाली आहे, ज्यात पीएम किसान योजनेच्या निधीतील आणखी एक हप्ता जारी करण्यात आला आहे असे पंतप्रधान म्हणाले. “केवळ एका बटणावर क्लिक करून देशातील कोट्यवधी शेतकर्यांच्या बँक खात्यात 16,000 कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले. कुठल्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय एवढी मोठी रक्कम हस्तांतरित करण्यात आल्यामुळे जगभरातील लोकांचे याकडे लक्ष गेले आहे. असे ते म्हणाले. काँग्रेसच्या राजवटीची तुलना करताना पंतप्रधानांनी आठवण करून दिली की, तत्कालीन पंतप्रधान म्हणाले होते की जेव्हा 1 रुपया दिला जातो तेव्हा त्यातील केवळ 15 पैसे गरीबांपर्यंत पोहोचतात. “परंतु हे मोदी यांचे सरकार आहे”, “प्रत्येक पैसा तुमचा आहे आणि तो तुमच्यासाठी आहे” असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी भारतातील सर्व शेतकर्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना होळीपूर्वी एक खास भेट मिळाली आहे असे ते म्हणाले.
आजचा बदलता भारत वंचितांना प्राधान्य देत एकापाठोपाठ एक विकास प्रकल्प पूर्ण करत आहे असे पंतप्रधान म्हणाले आणि या सरकारसाठी छोटा शेतकरी हे प्राधान्य असल्याचे नमूद केले. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2.5 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले असून त्यापैकी 50 हजार कोटींहून अधिक रक्कम महिला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हा पैसा शेतकऱ्यांच्या छोट्या मात्र महत्वाच्या गरजा पूर्ण करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.
2014 पूर्वी देशात कृषी क्षेत्रासाठी 25,000 कोटी रुपये तरतूद होती, ती आता 1,25,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून त्यात पाच पट वाढ झाली आहे याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
देशातील शेतकऱ्यांना आधार देण्याच्या भाजप सरकारच्या कटिबद्धतेचा हा पुरावा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना थेट फायदा पोहचवणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. यासाठी त्यांनी जन धन बँक खाती, मोबाईल कनेक्शन आणि आधारचे उदाहरण दिले. शेतकऱ्यांना कोणत्याही गरजेच्या वेळी बँकांच्या मदतीचा लाभ घेता यावा या उद्देशाने सरकार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डशी जोडत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
या वर्षीचा अर्थसंकल्प वर्तमानातील चिंतेसह कृषी क्षेत्राच्या भविष्यातील गरजा पूर्ण करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. साठवणूक करणे, शेतीवरील खर्च कमी करणे, लहान शेतकऱ्यांना संघटित करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळेच या अर्थसंकल्पात साठवणूक सुविधांवर आणि सहकारी संस्थांवर भर देण्यात आला आहे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे नैसर्गिक शेतीवर भर दिल्यास शेतकऱ्याचा खर्च कमी होईल, अशी सूचना त्यांनी केली. प्रधानमंत्री प्रणाम योजनेसारख्या उपाययोजनांमुळे खतांवर होणारा खर्च आणखी कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“भविष्यातील आव्हानांचे विश्लेषण करताना भारताच्या कृषी क्षेत्राला बळकट करण्यावर सरकारचा भर आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले. हवामान बदलाच्या आव्हानावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी भरड धान्याच्या पारंपरिक शक्तीचे पुनरुज्जीवन करण्यावर भर दिला. या भरड धान्यांमध्ये कोणत्याही हवामानाचा सामना करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी भरडधान्याला श्री अन्न अशी नवी ओळख दिली असल्याचे अधोरेखित केले. कर्नाटक हे भरड धान्याचे मुख्य केंद्र असून येथे श्री अन्न पूर्वी श्री धान्य म्हणून ओळखले जात असे. या भागातील शेतकरी विविध प्रकारच्या श्री अन्नाची लागवड करतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी यावेळी श्री अन्नाच्या प्रचारासाठी तत्कालीन बी एस येडियुरप्पा सरकारने चालवलेल्या महत्त्वपूर्ण मोहिमेची आठवण करून दिली. आता आपल्याला ते जगासमोर मांडायचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. श्री अन्न पिकवण्यासाठी कमी मेहनत आणि कमी पाणी लागत असल्याने शेतकऱ्यांचा दुप्पट फायदा होतो, असे पंतप्रधानांनी श्री अन्नाच्या फायद्यांची यादी करताना सांगितले.
कर्नाटक हे प्रमुख ऊस उत्पादक राज्य असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजा पंतप्रधानांनी विस्तृतपणे मांडल्या. 2016-17 पूर्वी देय रकमेच्या सहकारी उसाच्या पेमेंटवर करात सवलत देणार्या या वर्षीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. या तरतुदीमुळे साखर सहकारी संस्थांना 10 हजार कोटींचा दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले. इथेनॉलच्या उत्पादनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असे पंतप्रधानांनी इथेनॉल मिश्रणासाठी सरकारच्या प्रयत्नाविषयी बोलताना सांगितले. गेल्या 9 वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 1.5 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत वाढले असून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य सरकारने आधीच निश्चित केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृषी, उद्योग, पर्यटन आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात केवळ उत्तम संपर्क सुविधेमुळेच बळकटी येऊ शकते असेही ते म्हणाले. 2014 च्या आधीच्या 5 वर्षात कर्नाटकातील रेल्वेचा एकूण अर्थसंकल्प 4,000 कोटी रुपये होता, तर यावर्षी कर्नाटकातील रेल्वेसाठी 7,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कर्नाटकात आज सुमारे 45 हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ सुविधांमुळे विकासाला चालना मिळत नाही तर रेल्वेवरील विश्वासही वाढत असल्याचे पंतप्रधानांनी बेळगावी येथे नव्याने उदघाटन झालेल्या आधुनिक रेल्वे स्थानकाचा संदर्भ देत सांगितले. "कर्नाटकातील अनेक स्थानके अशा आधुनिक स्वरुपात समोर आणली जात आहेत", असे ते म्हणाले. लोंडा- घटप्रभा मार्गाच्या दुहेरीकरणामुळे प्रवास जलद आणि सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेळगावी हे शिक्षण, पर्यटन आणि आरोग्यसेवेसाठी महत्त्वाचे केंद्र असून सुधारित रेल्वे संपर्क या क्षेत्रांना चालना देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“दुहेरी इंजिन सरकार म्हणजे जलद गतीच्या विकासाची हमी आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. 2019 पूर्वी कर्नाटकातील गावांमधील केवळ 25 टक्के घरांमध्ये पाईपद्वारे पाण्याची जोडणी होती, तर आज ही व्याप्ती 60 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, असे पंतप्रधानांनी जल जीवन मिशनचे उदाहरण देताना सांगितले. बेळगावीमध्येही 2 लाखांपेक्षा कमी घरांना नळाला पाणी मिळायचे पण आज ही संख्या 4.5 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“मागील सरकारांनी दुर्लक्षित केलेल्या समाजातील प्रत्येक लहान घटकाला सक्षम बनवण्यात सरकार गुंतले आहे”, पंतप्रधानांनी टिप्पणी केली. बेळगावी हे वेणुग्राम म्हणजेच बांबूचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या कारागिरांचे आणि हस्तकलेचे शहर असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी पूर्वीच्या सरकारांनी बांबू लागवडीवर दीर्घकाळ बंदी कशी घातली होती याची आठवण करून दिली परंतु सध्याच्या सरकारने कायद्यात सुधारणा करून बांबू लागवड आणि व्यापारासाठी मार्ग खुला केल्याचे त्यांनी सांगितले. शिल्पकार आणि कारागीर याना आधार देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात प्रथमच सादर करण्यात आलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेचाही त्यांनी उल्लेख केला.
कर्नाटकातील नेत्यांचा अनादर करणे ही परंपरा बनलेली असताना कर्नाटकसाठी काँग्रेस सरकारने दिलेल्या तिटकारायुक्त वागणुकीकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. "काँग्रेस परिवारासमोर एस निजलिंगप्पा आणि वीरेंद्र पाटील यांच्यासारख्या नेत्यांचा अपमान कसा झाला, याचा इतिहास हा पुरावा आहे", पंतप्रधानांनी टिप्पणी केली. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दलची त्यांची आस्था आणि आदर आणि सार्वजनिक सेवेबद्दलची त्यांची निष्ठा याबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात सर्वात ज्येष्ठ सदस्याला कडक उन्हात छत्री देण्यासही योग्य कसे मानले जात नाही याबद्दल दुःख व्यक्त केले. “खर्गे जी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण त्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते त्यावरून रिमोट कंट्रोल कोणाकडे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे”, पंतप्रधान म्हणाले. देशातील अनेक राजकीय पक्ष ‘परिवारवाद’ (नेपोटिझम) ग्रस्त आहेत याकडे मोदींनी लक्ष वेधले आणि देशाला त्यांच्या तावडीतून मुक्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कर्नाटकातील जनतेला काँग्रेससारख्या पक्षांपासून सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला.
भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, "खरा विकास तेव्हा होतो जेव्हा काम सच्च्या हेतूने केले जाते." डबल इंजिन सरकारचा खरा हेतू आणि विकासाप्रती असलेली बांधिलकी त्यांनी अधोरेखित केली. "कर्नाटक आणि देशाच्या विकासाला गती देण्यासाठी, सबका प्रयासद्वारे वाटचाल करावी लागेल", असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
शेतकर्यांच्या कल्याणाप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण दाखवून देणारे पाऊल म्हणजे, सुमारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) अंतर्गत 13 व्या हप्त्याची रक्कम सुमारे 16,000 कोटी रुपये हे 8 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वर्ग करण्यात आले. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष प्रत्येकी 6000 रुपयांचा लाभ 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी पुनर्विकसित बेळगावी रेल्वे स्थानकाची इमारत राष्ट्राला समर्पित केली. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी अंदाजे 190 कोटी रुपये खर्च करून या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात येणारा आणखी एक रेल्वे प्रकल्प म्हणजे लोंडा-बेळगावी-घटप्रभा विभागादरम्यान बेळगावी येथील रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्प. सुमारे 930 कोटी रुपये खर्चून विकसित केलेला हा प्रकल्प, मुंबई - पुणे - हुबळी - बेंगळुरू रेल्वे मार्गाची क्षमता वाढवेल आणि या क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि आर्थिक उपक्रमांना चालना देईल.
पंतप्रधानांनी बेळगावी येथे जल जीवन मिशन अंतर्गत सहा बहु-ग्राम योजना प्रकल्पांची पायाभरणी केली, जे सुमारे 1585 कोटी रुपये खर्च करून विकसित केले जातील आणि 315 हून अधिक गावांतील सुमारे 8.8 लाख लोकसंख्येला त्याचा फायदा होईल.
* * *
N.Chitale/Sushma/Shraddha/Vasanti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1902912)
Visitor Counter : 100
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam