नागरी उड्डाण मंत्रालय
भारत आणि गयाना दरम्यान हवाई सेवा कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
22 FEB 2023 3:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि गयाना दरम्यान हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करण्यास मंजुरी दिली . हा करार लागू होण्यासाठी दोन्ही देशांनी आवश्यक अंतर्गत प्रक्रिया पूर्ण केल्यावर उभय देशांमध्ये राजनैतिक दस्तावेजांची देवाणघेवाण झाल्यावर हवाई सेवा करार अंमलात येईल. गयानामध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय असून 2012 च्या जनगणनेनुसार सुमारे 40% लोकसंख्या असलेला हा सर्वात मोठा वांशिक गट आहे. गयानासोबत हवाई सेवा करारावरील स्वाक्षरीमुळे दोन्ही देशांदरम्यान हवाई सेवा पुरवण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करता येईल. विमान वाहतुकीची वाढती बाजारपेठ आणि भारतात विमान वाहतूक क्षेत्राच्या उदारीकरणासारख्या घडामोडींच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक देशांशी हवाई सेवा करार करण्यात आले आहेत. हवाई सेवा करारामध्ये दोन देशांमधील विमान सेवेसाठी कायदेशीर व्यवस्थेची तरतूद आहे , जी राष्ट्रांचे सार्वभौमत्व, विमान कंपनीचे राष्ट्रीयत्व आणि उभय देशांनी नियुक्त केलेल्या विमान कंपन्यांसाठी व्यावसायिक संधी या तत्त्वांवर आधारित आहे. सध्या भारत आणि गयाना दरम्यान कोणताही हवाई सेवा करार नाही.
भारत आणि गयाना हे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक करारावर (शिकागो करार) स्वाक्षरी करणारे देश आहेत. 6 डिसेंबर 2016 रोजी नासाऊ, बहामास येथे आयसीएओ हवाई सेवा वाटाघाटी कार्यक्रमादरम्यान भारत आणि गयानाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिष्टमंडळाची भेट झाली , ज्यात दोन्ही देशांनी भारत आणि गयाना दरम्यान 06 डिसेंबर 2016 रोजी झालेल्या सामंजस्य कराराच्या संदर्भात हवाई सेवेसाठी मसुदा तयार केला होता.
भारत आणि गयाना यांच्यातील नवीन हवाई सेवा करार दोन्ही देशाच्या विमान कंपन्यांना व्यावसायिक संधी प्रदान करण्याबरोबरच वर्धित आणि वेगवान कनेक्टिव्हिटीसाठी पोषक वातावरण उपलब्ध करेल.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901361)
Visitor Counter : 169