निती आयोग

धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली अटल नवोन्मेष उपक्रमाच्या उच्चस्तरीय समितीची बैठक संपन्न


भारताच्या नवोन्मेष प्रणालीचे नेतृत्व करुन ती मजबूत करण्यासाठी समितीने AIM 2.0 वर केली चर्चा

Posted On: 21 FEB 2023 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2023

 

अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि नीति आयोगाने या उपक्रमाच्या प्रगती आणि भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी उपक्रमाच्या उच्च-स्तरीय समितीची (MHLC) बैठक घेतली.

समितीने गेल्या वर्षभरात अटल नवोन्मेष उपक्रमाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि पुढील वर्षांसाठी नियोजित केलेल्या प्रमुख उपक्रमांवर चर्चा केली.

बैठकीदरम्यान, उच्च-स्तरीय समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे तसेच विशेषत: श्रेणी 2/3 शहरांमधील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आणि तरुणांमध्ये, उद्योजकतेला चालना देण्याच्या गरजेवर भर दिला. संसाधनांपर्यंतची पोहोच वाढवण्यासाठी तसेच महत्त्वाकांक्षी नवोन्मेषकारांना समर्थन देण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यासपीठाचा लाभ घेण्याचे महत्त्व प्रधान यांनी अधोरेखित केले.

समितीने अटल नवोन्मेष उपक्रम 2.0 साठी नियोजित अनेक महत्त्वाच्या उपक्रमांवर चर्चा केली. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी टिंकरिंग उपलब्धता, सेक्टरल इन्क्युबेटर केंद्रे आणि उद्योग प्रवेगकांच्या प्रगत स्वरूपांसह परिसंस्थेला प्रगत करणे तसेच क्षेत्र, राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांमध्ये नाविन्यपूर्ण क्षमता वाढवणे या मुद्द्यांचा समावेश आहे.

संबंधित कार्यक्षेत्रात नवीन इन्क्युबेटर केंद्रे आणि स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला अटल नवोन्मेष उपक्रमाने सहकार्य करण्याचे महत्त्व धर्मेंद्र प्रधान यांनी अधोरेखित केले. अटल नवोन्मेष उपक्रम आणि शिक्षण मंत्रालयाने शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विकसित करण्याच्या दिशेने काम करावे अशी शिफारस प्रधान यांनी केली.

"अटल नवोन्मेष उपक्रमाने देशात नवकल्पना आणि नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. आपण नवोपक्रमाची परिसंस्था बळकट करणे आणि संसाधनांपर्यंत अधिक प्रवेश आणि महत्त्वाकांक्षी नवोन्मेषकांना समर्थन देणे सुरू ठेवले पाहिजे, असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी बैठकीनंतर बोलतात व्यक्त केले. या नवीन उपक्रमांच्या प्रारंभामुळे, आम्ही देशात एक उत्साही आणि गतिमान नवोन्मेष प्रणाली तयार करू शकू." असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला.

उच्च स्तरीय समितीचे उपाध्यक्ष, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह; नीति आयोगाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिका, शिक्षण मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, क्षमता निर्माण आयोगाचे सचिव आणि खाजगी क्षेत्र तसेच शैक्षणिक क्षेत्रातील समितीचे सदस्य यासारख्या उच्च स्तरीय समितीच्या इतर सदस्यांकडून देखील अटल नवोन्मेष उपक्रमाला विविध सूचना प्राप्त झाल्या.

अटल नवोन्मेष उपक्रमाने स्थापनेपासूनच देशातील नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उच्च-स्तरीय समितीची ही बैठक देशातील नवोन्मेष आणि आर्थिक वाढीसाठी सरकारच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे.

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1901075) Visitor Counter : 156


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu