कृषी मंत्रालय
इंदूर येथे भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील कृषी कार्यगटाच्या पहिल्या कृषी प्रतिनिधी बैठकीची यशस्वी सांगता
Posted On:
15 FEB 2023 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2023
जी 20 अंतर्गत कृषी कार्यगटाची पहिली कृषी प्रतिनिधी बैठक आज 15 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झाली. तीन दिवस चाललेला हा कार्यक्रम संस्कृती, खाद्यपदार्थ आणि इतिहासाचा समृद्ध अनुभव आणि बैठकी दरम्यान अर्थपूर्ण चर्चेत सहभागी होण्याची मोठी जबाबदारी यांचा मिलाफ होता.
भारताच्या अध्यक्षतेखालील प्रस्तावित कार्यक्रम पत्रिकेवर सहभागी देशांकडून उत्तम प्रतिसाद लाभला तसेच चांगली चर्चा झाली. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात तांत्रिक संकल्पनांवर आधारित सत्राने झाली ज्यामध्ये चार संकल्पनांवर चर्चा झाली: “अन्न सुरक्षा आणि पोषण”, “हवामान विषयक स्मार्ट दृष्टिकोनासह शाश्वत शेती”, “समावेशक कृषी मूल्य साखळी आणि अन्न प्रणाली”, आणि "कृषी परिवर्तनासाठी डिजिटलायझेशन".
अन्न सुरक्षा आणि पोषण विषयावरील तांत्रिक सत्रावरील चर्चेसाठी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव शुभा ठाकूर यांनी उद्घाटनपर भाषण केले. त्यानंतर जागतिक अन्न कार्यक्रमविषयी प्रास्ताविक झाले. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी अन्न सुरक्षा आणि पोषण या विषयावर जागतिक आराखडा सादर केला, त्यानंतर सहसचिव शुभा ठाकूर यांनी मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस (MIIRA) म्हणजेच भरड धान्यावर संशोधन आणि जनजागृती करण्या-या या उपक्रमाची ओळख करून दिली.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव फ्रँकलिन एल. खोबुंग यांनी हवामान विषयक स्मार्ट दृष्टिकोनासह शाश्वत शेती या विषयावरील तांत्रिक सत्राचे प्रारंभिक भाषण केले. त्यानंतर अन्न आणि कृषी संघटनाद्वारे प्रास्ताविक झाले.
सर्वसमावेशक कृषी मूल्य साखळी आणि अन्न प्रणालीवरील तांत्रिक सत्रासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांचे प्रारंभिक भाषण झाले तर आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीने (IFAD) चर्चेसाठी प्रास्ताविक केले.
कृषी परिवर्तनासाठी डिजिटलायझेशन या तांत्रिक सत्रासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. पी.के. मेहेरडा यांचे प्रारंभिक भाषण झाले. ICRISAT या संस्थेने चर्चेसाठी प्रास्ताविक केले.
प्रत्येक संकल्पना -आधारित तांत्रिक सत्रादरम्यान, विचार, सूचना आणि निरीक्षणांची बौद्धिकदृष्ट्या समृद्ध देवाणघेवाण असलेली खुली चर्चा झाली. विस्तृत आणि अर्थपूर्ण सादरीकरणाने अल्पभूधारक शेतकऱ्यांवर विशेष भर देत कृषी परिवर्तन आणि शेतीमधील डिजिटलायझेशनचा मार्ग सुकर केला.
या सत्राच्या सह-अध्यक्ष आणि कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अतिरिक्त सचिव डॉ. स्मिता सिरोही यांनी संक्षिप्त माहिती देताना या सत्रा दरम्यान मांडण्यात आलेले ठोस मुद्दे अधोरेखित केले.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव आणि या सत्राचे अध्यक्ष मनोज आहुजा यांचे समारोपाचे भाषण आणि पुढील वाटचालीबाबत सादरीकरण झाले. कृषी संशोधन आणि विकास पैलूंवर जी 20 सदस्य देशांमध्ये अधिक अभिसरण आणि सहकार्य असण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच कृषी कार्यगटाच्या आगामी बैठकांमध्ये जी 20 कृषी समस्यांवरील चर्चा पुढे नेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899588)
Visitor Counter : 232