संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्र्यांनी बंगळुरूमध्ये एरो इंडिया 2023 च्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांच्या संमेलनाचे भूषवले यजमानपद; वाढत्या-जटिल जागतिक सुरक्षा परिस्थितीत वेगाने होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी अधिक सहकार्याचे आवाहन


भारत, नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या बाजूने आहे, ज्यामध्ये 'योग्य असण्याची शक्यता आहे' ची जागा निष्पक्षता, सहकार्य आणि समानतेने घेतली आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले

"समृद्धीसाठी सामूहिक सुरक्षा आवश्यक असून, दहशतवादासारख्या धोक्यांचा सामना करण्यासाठी नवीन धोरणे आखण्याची गरज "

राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि क्षमतांनुसार वृद्धिंगत संरक्षण भागीदारीसाठी मित्र देशांकरता भारताचे दरवाजे खुले : संरक्षण मंत्री




Posted On: 14 FEB 2023 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी  2023

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी बंगळुरू येथे एरो इंडिया 2023 च्या पार्श्वभूमीवर आयोजित संरक्षण मंत्र्यांच्या संमेलनाचे यजमानपद भूषवले. यात 27 देशांचे संरक्षण आणि उप संरक्षण मंत्री सहभागी झाले आहेत. ‘संरक्षणातील वर्धित प्रतिबद्धतांद्वारे सामायिक समृद्धी’ (स्पीड) अशी या संमेलनाची व्यापक संकल्पना होती. यामध्ये क्षमता वाढीसाठी (गुंतवणूक, संशोधन आणि विकास, संयुक्त उपक्रम, सह-विकास, सह-उत्पादन आणि संरक्षण उपकरणांची तरतूद), प्रशिक्षण, अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सागरी सुरक्षा यांसाठी सहकार्य वाढवण्याशी संबंधित पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वाढत्या-जटिल जागतिक सुरक्षा परिस्थितीत अधिक सहकार्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात अधोरेखित केली. 'स्पीड' या कार्यक्रमाची संकल्पना सध्याच्या युगाचे निदर्शक आहे, यात भू-राजकीय आणि सुरक्षा वास्तविकता आतापर्यंत न अनुभवलेल्या वेगाने बदलत आहेत असे ते म्हणाले. अशा जलद बदलांना प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी वास्तव काळातील (रिअल-टाइम) सहकार्याचे आवाहन केले. अर्थव्यवस्था, सुरक्षा, आरोग्य किंवा हवामान या क्षेत्रातील कोणताही मोठा बदल जागतिक स्तरावर होतो आणि जेव्हा कोणत्याही प्रदेशाची शांतता तसेच सुरक्षितता धोक्यात येते तेव्हा संपूर्ण जगाला अनेक मार्गांनी त्याचा प्रभाव जाणवतो असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले . एकमेकांशी जोडलेल्या, नेटवर्कच्या या जगात, धक्के आणि गोंधळाचे जलद प्रसारण इतर देशांच्या समस्यांपासून स्वतःच्या देशाला वेगळे करणे अशक्य करते याकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला.

“जगभरातील नवीन कल्पनांचे भारताने नेहमीच स्वागत केले आहे. विविध विचारांचे एकत्रीकरण आणि स्पर्धेने आम्हाला जागतिक विचार केंद्र बनवले आहे. आपली प्राचीन नीती मूल्ये आपल्याला केवळ परस्पर फायद्यासाठी सहकार्याच्या दिशेने कार्य करण्यास मार्गदर्शन करत नाही तर व्यवहाराच्या दृष्टिकोनाच्या पलिकडे जाऊन सर्व मानवतेकडे एक कुटुंब म्हणून पाहण्यास शिकवते,” असे राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षण मंत्र्यांनी  विकास आणि समृद्धीसाठी सामूहिक सुरक्षितता अनिवार्य अट असल्याचे सांगितले. दहशतवाद, बेकायदेशीर शस्त्रास्त्र व्यापार, अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी इत्यादींमुळे जगाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत आहे यावर त्यांनी भर दिला. या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन रणनीती आखण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “ जुन्या पितृसत्ताक किंवा नव-वसाहतवादी पद्धतीनुसार  अशा सुरक्षा विषयक समस्या हाताळण्यावर  भारताचा विश्वास नाही. आम्ही सर्व राष्ट्रांना समान भागीदार मानतो “ असे ते म्हणाले.

संरक्षण मंत्र्यांनी उपस्थित संरक्षण मंत्र्यांना माहिती दिली  की भारत आपल्या मित्र देशांबरोबर  संरक्षण भागीदारी वृद्धिंगत करून या तत्त्वानुसार पुढे वाटचाल करत आहे. “राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि क्षमतांना अनुकूल अशी भागीदारी करण्यावर आमचा भर आहे. आम्हाला तुमच्यासोबत पुढे वाटचाल  करायची आहे, आम्हाला तुमच्यासोबत नव्या योजना तयार  करायच्या आहेत,  आम्हाला तुमच्यासोबत निर्मिती  करायची  आहे आणि आम्हाला तुमच्यासोबत विकसित व्हायचे  आहे. आम्हाला सहजीवनात्मक संबंध निर्माण करायचे आहेत, ज्यात आम्ही एकमेकांकडून नवीन शिकू , एकत्र वाढू शकू आणि सर्वांसाठी समान संधी निर्माण करू शकू,” असे ते म्हणाले. खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील  श्रेणीबद्ध नातेसंबंधांच्या पलीकडे सह-विकास आणि सह - निर्मिती मॉडेलकडे जाण्याचा सरकारचा प्रयत्न आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

एरो इंडियाच्या माध्यमातून संरक्षण मंत्र्यांना भारतात निर्माण होत असलेल्या मजबूत संरक्षण उत्पादन परिसंस्थेबद्दल माहिती मिळाली असेल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला . त्यांनी चौकशी,सूचना  आणि अभिप्रायाद्वारे त्यांच्या गरजा आणि अपेक्षा सामायिक कराव्यात असे  आवाहन संरक्षण मंत्र्यांनी केले, ज्यामुळे उद्योगाला शिकण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळेल.

27 देशांचे संरक्षण आणि उपसंरक्षण मंत्री, 15 संरक्षण आणि सेवा प्रमुख आणि 80 देशांतील 12 स्थायी सचिवांसह अनेक देशांतील 160 हून अधिक प्रतिनिधी संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील भारताची प्रचंड वाढ आणि सहभाग दर्शवणाऱ्या या परिषदेत सहभागी झाले होते.

S.Bedekar/Vinayak/Sushama/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1899111) Visitor Counter : 386