संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्र्यांनी जगभरातील मूळ उपकरण उत्पादकांना (ओईएम ) सह-विकास , सह-उत्पादन, पुरवठा साखळीचे एकत्रीकरण आणि बळकटीकरण, संयुक्त कंपनीची स्थापना तसेच भारतात निर्मिती उद्योग स्थापन करून जगासाठी निर्मिती करण्यासाठी केले आमंत्रित


एरो इंडिया-2023 च्या निमित्ताने राजनाथ सिंह यांनी ‘ओईएम’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची घेतली भेट

भारत जगभरातील संरक्षण उद्योगासाठी जमिनीची स्पर्धात्मक किंमत, कुशल मनुष्यबळ , मजबूत स्टार्ट-अप परिसंस्था आणि संरक्षण सामुग्रीची प्रचंड बाजारपेठ यांसारखे लाभ उपलब्ध करून देत आहे :संरक्षण मंत्री

Posted On: 14 FEB 2023 2:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2023

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी 14 व्या एरो इंडियाच्या निमित्ताने मूळ उपकरणे उत्पादक (ओईएम ) च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची  भेट घेतली. यावेळी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी अधोरेखित केले की , भारत जगभरातील संरक्षण उद्योगासाठी जमिनीची स्पर्धात्मक किंमत, कुशल मनुष्यबळ , मजबूत  स्टार्ट-अप परिसंस्था आणि संरक्षण सामुग्रीची प्रचंड बाजारपेठ यांसारखे लाभ उपलब्ध करून देत आहे . ही सर्वांसाठी समान संधी आहे , ज्यात जगभरातील संरक्षण सामुग्रीशी संबंधित उत्पादक कंपन्या  भारताच्या विकास यात्रेचा  एक भाग बनू शकतील असे  त्यांनी नमूद केले.

भारतासाठी संरक्षण क्षेत्र महत्वपूर्ण असल्यावर भर देत  राजनाथ सिंह म्हणाले  की, "महत्त्वपूर्ण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनणे तसेच आपल्या देशातील लोकांसाठी रोजगार निर्माण करणे ही दुहेरी उद्दिष्टे संरक्षण क्षेत्रातील उत्पादन साध्य करतो. " उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू राज्य सरकारांनी संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमध्ये गुंतवणुकीसाठी दिलेले प्रोत्साहन, भारतात थेट परदेशी गुंतवणूक आणि संरक्षण सामुग्री निर्मितीला प्रोत्साहन देणारी केंद्र सरकारची धोरणे, भागधारकांच्या हिताचे संरक्षण करणारी मजबूत कायदेशीर व्यवस्था आणि व्यवसाय  सुलभतेतील सुधारणांचा त्यांनी उल्लेख केला.

"सह-विकास , सह-उत्पादन,  पुरवठा साखळीचे एकत्रीकरण आणि बळकटीकरण, संयुक्त कंपनीची स्थापना तसेच भारतात निर्मिती उद्योग स्थापन करून जगासाठी निर्मिती करण्यासाठी अनेक  संधी आहेत, " असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतीय संरक्षण उत्पादन उद्योगात  जागतिक गुंतवणूक सुलभ करण्याबाबत  काही सूचना दिल्या.  खाजगी उद्योगासाठी नियामक अडथळे दूर करण्यासाठी सरकारकडून  प्रयत्न केले जातील असे आश्वासन संरक्षण मंत्र्यांनी त्यांना दिले.

जनरल ऍटॉमिक्स , सफ्रान , बोईंग, एम्ब्रेर आणि राफेल सारख्या प्रगत संरक्षण प्रणालीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक  या संवादात सहभागी झाले होते. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने, महासंचालक (अधिग्रहण)  पंकज अग्रवाल, संरक्षण उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव टी. नटराजन आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.


 

S.Bedekar/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1899107) Visitor Counter : 151