पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी राजस्थानमधील दौसा येथे दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाचा दिल्ली – दौसा – लालसोट टप्पा राष्ट्राला केला समर्पित


5940 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 247 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची केली पायाभरणी

"दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग हा जगातील सर्वात प्रगत द्रुतमार्गांपैकी एक आहे जो विकसनशील भारताचे भव्य चित्र सादर करतो"

“गेल्या 9 वर्षांपासून केंद्र सरकार पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने मोठी गुंतवणूक करत आहे”

"यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती 2014 मधील तरतुदीपेक्षा 5 पट अधिक आहे"

"गेल्या काही वर्षांत राजस्थानला महामार्गांसाठी 50 हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत"

"दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे राजस्थान आणि देशाच्या प्रगतीचे दोन मजबूत स्तंभ ठरणार "

“सबका साथ, सबका विकास हा राजस्थान आणि देशाच्या विकासासाठी आमचा मंत्र,या मंत्राला अनुसरत  आम्ही  समर्थ , सक्षम आणि समृद्ध भारत घडवत आहोत.

Posted On: 12 FEB 2023 4:08PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाचा 246 किमीचा दिल्ली दौसा लालसोट टप्पा  राष्ट्राला समर्पित केला. 5940 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 247 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली. नवीन भारतातील वाढ, विकास आणि कनेक्टिव्हिटीचे इंजिन म्हणून उत्कृष्ट रस्ते संबंधी पायाभूत सुविधा उभारण्यावर पंतप्रधानांचा भर राहिला असून देशभरात सुरू असलेल्या अनेक जागतिक दर्जाच्या द्रुतगती मार्गांच्या बांधकामाद्वारे ते  साकार होत आहे.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित करताना अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.  हा जगातील सर्वात प्रगत द्रुतगती महामार्गांपैकी एक असून विकसनशील भारताचे भव्य चित्र सादर करतो असे त्यांनी अधोरेखित केले .

जेव्हा असे आधुनिक रस्ते, रेल्वे स्थानके , रेल्वे मार्ग , मेट्रो आणि विमानतळ बांधले जातात तेव्हा देशाच्या विकासाला गती मिळते, असे पंतप्रधान म्हणाले. गुंतवणुकीचा पायाभूत सुविधांवर  कित्येक पटीने होणारा प्रभावही त्यांनी अधोरेखित केला. गेल्या 9 वर्षांपासून, केंद्र सरकार सातत्याने  पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राजस्थानमध्ये महामार्गांच्या बांधकामासाठी 50,000 कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यंदाच्या अर्थसंकल्पात  पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती 2014 मधील तरतूदीपेक्षा  5 पट अधिक आहे अशी  माहिती पंतप्रधानांनी दिली. या गुंतवणुकीमुळे राजस्थानमधील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी  पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीचे अर्थव्यवस्थेला होणारे फायदे अधोरेखित केले. यामुळे रोजगार आणि कनेक्टिव्हिटी निर्माण होते असे ते म्हणाले.

जेव्हा महामार्ग, रेल्वे, बंदरे, विमानतळ, ऑप्टिकल फायबर, डिजिटल कनेक्टिव्हिटी, पक्की घरे आणि महाविद्यालयांचे बांधकाम यात गुंतवणूक केली जाते तेव्हा समाजातील प्रत्येक घटक सक्षम होतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पायाभूत सुविधांच्या आणखी एका फायद्याबाबत अधिक माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की, आर्थिक घडामोडीना  चालना मिळत आहे.  दिल्ली-दौसा-लालसोट महामार्गाच्या बांधकामामुळे दिल्ली आणि जयपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होईल असे ते म्हणाले. द्रुतगती महामार्गालगत ग्रामीण हाट स्थापन केले जात असून यामुळे स्थानिक शेतकरी आणि कारागिरांना मदत होईल. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गामुळे राजस्थानसह दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक भागांना फायदा होणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "या महामार्गाचा सरिस्का, केवलादेव राष्ट्रीय उद्यान ,रणथंबोर आणि जयपूर सारख्या पर्यटन स्थळांना मोठा फायदा होईल", असे ते म्हणाले.

इतर तीन प्रकल्पांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, त्यापैकी एक जयपूरला द्रुतगती मार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी देईल. दुसरा प्रकल्प द्रुतगती मार्गाला अलवरजवळ अंबाला-कोटपुतली कॉरिडॉरशी जोडेल. यामुळे हरियाणा, पंजाब, हिमाचल आणि जम्मू काश्मीरमधून येणाऱ्या वाहनांना पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रवास करायला  मदत होईल. लालसोट करोली रस्ता देखील या प्रदेशाला द्रुतगती मार्गाशी जोडेल.

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग  आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे राजस्थान आणि देशाच्या प्रगतीचे दोन मजबूत स्तंभ बनणार आहेत आणि येणाऱ्या काळात राजस्थानसह या संपूर्ण प्रदेशाचा कायापालट करणार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या दोन प्रकल्पांमुळे मुंबई-दिल्ली आर्थिक कॉरिडॉरला पाठबळ मिळेल आणि रस्ते आणि फ्रेट कॉरिडॉरमुळे राजस्थान, हरयाणा, पश्चिम भारतामधील अनेक प्रदेश बंदरांशी जोडले जातील, त्यायोगे लॉजिस्टिक्स, साठवण, वाहतूक आणि इतर उद्योगांसाठीही यामुळे नवीन संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.

दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाची निर्मिती  पी एम गतीशक्ती बृहद आराखड्या अंतर्गत झाली असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की ऑप्टिकल फायबर, वीज लाईन आणि गॅस पाइपलाइन टाकण्याची व्यवस्था करण्यात आली असून  उरलेली जमीन सौरऊर्जा निर्मितीसाठी तसेच गोदामांसाठी वापरली जाईल. या प्रयत्नांमुळे भविष्यात देशाच्या पैशात खूप बचत होईल असे पंतप्रधान म्हणाले. 

भाषणाचा समारोप करताना, राजस्थानसह संपूर्ण  देशाच्या विकासा साठी  सबका साथ, सबका विकासया मंत्रावर पंतप्रधानांनी भर दिला. समर्थ, सक्षम आणि समृद्ध भारताचा सरकारचा संकल्प आहे, असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, राजस्थान सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भजनलाल जाटव आणि संसद सदस्य यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाचा 246 किमीचा दिल्ली दौसा लालसोट विभाग 12,150 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केला आहे. या विभागाच्या कार्यान्वयनामुळे दिल्ली ते जयपूर प्रवासाचा कालावधी 5 तासांवरून सुमारे साडेतीन तास इतका कमी होईल आणि संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.

दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असेल. त्याची लांबी 1,386 किमी आहे. यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचे अंतर 12 टक्क्यांनी घटून 1,424 किमी वरून 1,242 किमी पर्यंत कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होऊन  24 तासांवरून 12 तासांपर्यंत कमी होईल. हा द्रुतगती मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाईल तसेच कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या प्रमुख शहरांना जोडेल. तो पंतप्रधान गतीशक्ती बृहद आराखड्यातील 93 आर्थिक केन्द्र, 13 बंदरे, 8 प्रमुख विमानतळ आणि 8 बहुआयामी लॉजिस्टिक पार्क तसेच जेवर विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी बंदर यासह नवीन आगामी ग्रीनफिल्ड विमानतळांना देखील याचा फायदा होईल.  द्रुतगती मार्गाच्या सर्व लगतच्या प्रदेशांच्या विकासाच्या मार्गावर सकारात्मक प्रभाव पडेल, त्यामुळे देशाच्या आर्थिक परिवर्तनासाठी  मोठा हातभार लागेल.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानानी 5940 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 247 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली.यामध्ये 2000 कोटींहून अधिक रुपये खर्चून विकसितकरण्यात येणाऱ्या बांदीकुई ते जयपूर हा 67 किमी लांबीचा चार पदरी रस्ता, कोटपुतली ते बाराडोनियो हा सहा पदरी सुमारे 3775 कोटी रुपये खर्चाचा रस्ता आणि लालसोट-करोली विभागाचे 150 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणाऱ्या दोन-पदरी पक्के सांधेमार्ग यांचा  समावेश आहे. 

***

N.Chitale/S.Kane/B.Sontakke/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1898545) Visitor Counter : 269