पर्यटन मंत्रालय
गुजरातमधील कच्छचे रण येथे आयोजित पहिल्या जी -20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचे उद्घाटन सत्र
Posted On:
08 FEB 2023 4:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023
गुजरातमधील कच्छचे रण येथे पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या जी 20 अंतर्गत आयोजित पहिल्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचे उद्घाटन सत्र आज सकाळी झाले.
ट्रोकिआ ब्राझील आणि इंडोनेशियाच्या प्रतिनिधींच्या उद्घाटनपर भाषणांसह या उद्घाटन सत्राला केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रूपाला, आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी संबोधित केले.
पर्यटन क्षेत्रावर कोविडचा गंभीर परिणाम झाला असूनही, 2022 मध्ये भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत चांगली वाढ नोंदवण्यात आली आणि 2022 मध्ये भारतात अंदाजे 6.19 दशलक्ष परदेशी पर्यटक आले. मागील वर्षीच्या तुलनेत परदेशी पर्यटकांच्या संख्येतील ही वाढ चार पट वाढ आहे, असे पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी उद्घाटन सत्रात बोलताना सांगितले.
पर्यटन मंत्रालय हे वर्ष “व्हिजिट इंडिया इयर 2023” म्हणून साजरे करत आहे याअंतर्गत भारतातील देशांतर्गत पर्यटनावर लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. भारतात पर्यटकांना अमर्याद सांस्कृतिक वारसा ; आनंददायी अध्यात्मिक अनुभव; विपुल वन्यजीव संसाधने आणि सुंदर नैसर्गिक सौंदर्य यांची अनुभूती घेता येते असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या जी 20 अध्यक्षतेची संकल्पना - "वसुधैव कुटुंबकम" ही मानव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव - आणि पृथ्वी ग्रहावरील त्यांचे परस्परसंबंध - सर्वांच्या जीवनाचे मूल्य मांडते, असे केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी सांगितले. जी 20 मध्ये पर्यटन कार्यगटाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, 2020 मध्ये सौदी अरेबिया देशाकडे अध्यक्षपद असताना याची सुरुवात झाली. आणि तेव्हापासून स्थानिक आणि जागतिक पर्यटनाच्या अधिक विकासासाठी कृतीशील मार्गावर चर्चा , विचारविनिमय आणि मार्गदर्शन करण्यासाठी सदस्य देश आणि हितधारकांना या माध्यमातून एक व्यासपीठ प्रदान करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, पर्यटन कार्यगटाने पर्यटनाविषयीचा पारंपरिक दृष्टीकोन बदलून जबाबदार, शाश्वत आणि सर्वसमावेशक पर्यटनाच्या स्वरुपात परिवर्तन केले आहे.
यावेळी बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल म्हणाले की, पर्यटन आपल्याला निसर्गाच्या जवळ आणते. पर्यटनाद्वारे पूर्वजांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला वारसा आणि संस्कृती अनुभवता येवू शकते. तसेच पर्यटनामुळे विविधतेतील एकता दिसून येते.
कामकाजाच्या सत्रात, शाश्वत, जबाबदार आणि लवचिक पर्यटन क्षेत्र तसेच पर्यटन क्षेत्राच्या हरितकरणावर चर्चा झाली. पर्यटन क्षेत्रातील स्पर्धात्मकता, समावेशकता आणि टिकाऊपणाला चालना देण्यासाठी डिजिटलायझेशनच्या शक्तीचा उपयोग करणे; पर्यटन क्षेत्रातील नोकरीच्या संधी आणि उद्योजकतेसाठी विविध कौशल्यांनी तरुणांना सक्षम करणे; पर्यटन क्षेत्रात नावीन्य आणि गतिमानता आणण्यासाठी एमएसएमई/स्टार्टअप्स/खाजगी क्षेत्राला सहाय्य करणे; एसडीजी म्हणजेच शाश्वत विकास उद्दिष्ट्यानुसार सर्वांगीण दृष्टिकोनाच्या दिशेने गंतव्यस्थानांच्या धोरणात्मक व्यवस्थापनाचा पुनर्विचार करणे, यावरही चर्चा झाली.
या कार्यगटाच्या बैठकीसाठी सर्व प्रतिनिधी 7 फेब्रुवारी रोजी धोरडो येथे आले, त्यावेळी त्यांचे शानदार आणि पारंपरिक स्वागत करण्यात आले. यावेळी धोरडो या तंबू शहरात कच्छमधील रण येथील लोककलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. यानंतर संध्याकाळी सर्व प्रतिनिधींना सुंदर सजवलेल्या उंट गाड्यांमधून ‘व्हाईट रण’ येथे नेण्यात आले आणि संपूर्ण मार्गावर लोकसंगीत आणि नृत्याचे सादरीकरण करण्यात आले . ‘व्हाईट रण' मध्ये प्रतिनिधींनी सुंदर सूर्यास्ताचा आनंद लुटला आणि जी- 20 बोधचिन्हासह छायाचित्रेही काढली. रात्रीच्या भोजनापूर्वी सांस्कृतिक रजनीचा कार्यक्रम झाला. यामध्ये कलाकारांनी लोकनृत्य सादर केले.
S.Kane/Sonal C/Suvarna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897362)
Visitor Counter : 238