पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जयपूर महाखेलला केले संबोधित


"शिकण्याची प्रवृत्ती बाळगली तर विजय निश्चित होतो"

"देशाच्या सुरक्षेसाठी राजस्थानचे तरुण नेहमीच इतरांपेक्षा पुढे असतात"

"जयपूर महाखेलचं यशस्वी आयोजन हा भारताच्या क्रीडा आयोजनाच्या प्रयत्नांच्या दृष्टीने पुढचा महत्त्वाचा दुवा आहे"

"अमृत काळात देश नवीन परिभाषा तयार करत आहे आणि व्यवस्थेची एक नवीन मांडणी निर्माण करत आहे"

"2014 पासून देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत जवळपास तिपटीने वाढ झाली आहे."

"देशात क्रीडा विद्यापीठं स्थापन केली जात आहेत, आणि खेल महाकुंभसारखे मोठे क्रीडा उपक्रम देखील व्यावसायिक पद्धतीनं आयोजित केले जात आहेत"

"पैशाअभावी एकही युवक-युवती मागे राहू नये याकडे आमच्या सरकारचं काटेकोर लक्ष आहे"

“तुम्ही फीट(तंदुरुस्त) असाल, तरच तुम्ही सुपरहीट व्हाल (क्रीडापटू म्हणून तुमचं नाव होईल)”

“राजस्थानचे श्री अन्न -बाजरी आणि श्री अन्न -ज्वारी ही या भागाची ओळख आहे”

“आपली बहुगुणसंपन्नता आणि बहुआयामी क्षमतांमुळे आजच्या युवावर्गाला केवळ एकाच क्षेत्रात अडकून पडायचे नाही”

"क

Posted On: 05 FEB 2023 3:30PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयपूर महाखेलला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.  यावेळी त्यांनी एका कबड्डी सामन्याचा आनंदही लुटला.  जयपूर ग्रामीण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री राज्यवर्धन सिंह राठोड हे 2017 पासून जयपूर महाखेल या क्रीडा उपक्रमाचं आयोजन करत आहेत.

या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी या महाक्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू, प्रशिक्षक आणि  कुटुंबियांचं अभिनंदन केलं. खेळाडूंनी क्रीडा क्षेत्र, केवळ खेळात सहभागी होण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आणि शिकण्यासाठी आपलसं केलं आहे, असं त्यांनी नमूद केलं.  "शिकण्याची प्रवृत्ती बाळगली तर विजय निश्चित होतो", असं सांगताना पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक खेळाडूला क्रीडाक्षेत्र काही ना काही तरी देतच असतं.

क्रीडा क्षेत्रात भारताचं नाव नव्या यशोशिखरावर नेणारे अनेक नामवंत चेहरे या स्पर्धेसाठी उपस्थित असल्याचं लक्षात घेत, पंतप्रधानांनी  राम सिंग, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते  दिव्यांग क्रीडापटू देवेंद्र झाझरिया, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेती साक्षी कुमारी, अर्जुन  पुरस्कारप्राप्त आणि इतर ज्येष्ठ खेळाडूंचा आपल्या संबोधनात गौरवपूर्ण उल्लेख केला.  जयपूर महाखेल मध्ये स्पर्धेत उतरलेल्या युवा खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी भारतातील हे नामवंत क्रीडा चेहरे पुढे आल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

देशभरात एका मागोमाग एक आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि खेळ महाकुंभांची मालिका, हे देशात  होत असलेल्या क्रीडा विषयक महत्त्वपूर्ण बदलांचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं.  राजस्थानची भूमी युवावर्गाचा ध्यास आणि जोम, जोश यासाठी ओळखली जाते असं नमूद करत पंतप्रधान म्हणाले की, या भूमीतील मुलांनी आपल्या पराक्रमानं आपल्या जोरदार कामगिरीनं रणांगणाला क्रीडांगणात परिवर्तित केल्याचा, इतिहास हा पुरावा आहे.  “देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा राजस्थानचे तरुण नेहमीच इतरांपेक्षा पुढे असतात”, असं सांगत,पंतप्रधानांनी, या प्रदेशातील तरुणांची मानसिक आणि शारीरिक क्षमतांची जडणघडण करण्याचं श्रेय राजस्थानच्या क्रीडा परंपरांना दिलं.  मकर संक्रांतीच्या वेळी आयोजित केल्या जाणाऱ्या आणि शेकडो वर्षांपासून राजस्थानच्या परंपरेचा भाग असलेल्या दडा, सितोलिया आणि रुमाल झपट्टा या पारंपरिक खेळांची त्यांनी उदाहरणं दिली.

खेळातल्या आपल्या योगदानानं राजस्थानच्या अनेक क्रीडापटूंनी भारताचा तिरंगा एका नवीन उंचीवर नेऊन ठेवला आहे याची आठवण करून देताना पंतप्रधानांनी जयपुर मधल्या लोकांनी ऑलिंपिक पदक विजेत्याला त्यांचा संसदपटू म्हणून निवडून दिले आहे याकडे लक्ष वेधलं. संसद सदस्य राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या योगदानाची आठवण करून देत संसदीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ते युवा पिढीकडे हाच वसा पुन्हा देत असल्याबद्दल त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. अशा प्रकारच्या प्रयत्नांची व्याप्ती वाढवल्यामुळे आणखी सर्वंकष निकाल हाती येतील तसंच जयपुर महाखेळांचं यशस्वी आयोजन हा याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा दुवा  असल्यावर त्यांनी भर दिला. जयपुर महाखेळाचं यश अधोरेखित करताना पंतप्रधानांनी माहिती दिली की 600 हून अधिक संघ आणि साडेसहा हजार युवकांनी यावर्षीच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. 125 हून  अधिक महिलांचे संघ या स्पर्धेत सहभागी असणं हा सुद्धा सुखकर संदेश असल्याचं ते म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृत काळात देश नवीन परिभाषा निर्माण करत असून नवीन व्यवस्था निर्माण होत असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. खेळांकडे  राजकीय दृष्टिकोना ऐवजी अंतिमतः खेळाडूंच्या दृष्टिकोनातून बघितलं जात असतं हे त्यांनी अधोरेखित केलं. युवकांना काहीही अशक्य नाही आणि त्यांच्या क्षमता, स्वत्व, स्वावलंबन, सुविधा आणि संसाधनांची खरी ओळख त्यांना झाल्यावर प्रत्येक बाब ही  सोपी होते असं त्यांनी सांगितल.  याची झलक यावर्षीच्या अर्थसंकल्पात सुद्धा पहायला मिळाली असं ते म्हणाले. 2014 च्या 800-850 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतुदीच्या तुलनेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात क्रीडा मंत्रालयासाठी अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. 2014 नंतर देशाच्या क्रीडा अर्थसंकल्पात ही तिपटीने वाढ झाली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. एक हजार कोटी रुपयांहून अधिक तरतूद केवळ खेलो इंडिया मोहिमेसाठीच केली असून याचा वापर  देशातल्या  क्रीडा सुविधा आणि संसाधनांच्या विकासासाठी होणार असल्याचं ते म्हणाले

पंतप्रधानांनी सांगितलं की भारतातल्या युवकांमध्ये खेळाबद्दलची ओढ आणि प्रतिभेची कमतरता नाही तर सरकारकडून मिळणाऱ्या संसाधनं आणि सहकार्याची अनुपलब्धता यामुळे अडथळे निर्माण होत असतात. खेळाडूंना भेडसावणाऱ्या या समस्यांवर आता मार्ग काढला जात असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. जयपूर महा खेळाचं उदाहरण देत ते म्हणाले की अशा प्रकारच्या स्पर्धा गेल्या पाच-सहा वर्षांपासून आयोजित केल्या जात आहेत तसच भाजपाच्या संसद सदस्यांकडून  देशाच्या प्रत्येक भागात खेळ महा कुंभ आयोजित केले जात असून त्या माध्यमातून हजारो युवकांची प्रतिभा पुढे येत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

जिल्हा आणि स्थानिक पातळीवर क्रीडा सुविधा विकसित केल्या जात असल्याने या यशाचे श्रेय पंतप्रधानांनी केंद्र सरकारला दिले. देशातील शेकडो जिल्ह्यांतील लाखो तरुणांसाठी क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासाची माहिती देताना पंतप्रधानांनी राजस्थान मधल्या विकासकामांचा उल्लेख केलाजिथे अनेक शहरांमध्ये क्रीडा पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. “आज देशात क्रीडा विद्यापीठे स्थापन केली जात आहेत आणि खेल महाकुंभ सारखे मोठे कार्यक्रमही व्यावसायिक पद्धतीने आयोजित केले जात आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठांकडे  उपस्थितांचे लक्ष वेधताना पंतप्रधानांनी नमूद केले की, यावर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्येक विषय शिकण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला, ज्यामुळे तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण होईल.

"पैशाच्या कमतरतेमुळे कोणताही तरुण मागे राहू नये याकडे आमचे सरकार लक्ष देत आहे", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि सांगितले की, केंद्र सरकार आता सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंत मदत करत आहे. ते पुढे म्हणाले की, प्रमुख क्रीडा पुरस्कारांमध्ये देण्यात येणाऱ्या रकमेतही तीन पटीने वाढ करण्यात आली आहे. टॉप्स (TOPS) सारख्या योजनांमुळे खेळाडूंना वर्षानुवर्षे ऑलिम्पिकची तयारी करता येते याचे उदाहरण देत , पंतप्रधान म्हणाले की, ऑलिम्पिकसारख्या मोठ्या जागतिक स्पर्धांमध्येही सरकार आपल्या खेळाडूंच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहे.

केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर दैनंदिन जीवनातही तंदुरुस्ती राखण्याची गरज असल्याचे सांगत पंतप्रधानांनी कोणत्याही खेळाडूसाठी ती सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले की, “तुम्ही तंदुरुस्त रहाल, तरच तुम्ही सुपरहिट व्हाल”, यावेळी त्यांनी खेलो इंडिया आणि फिट इंडिया सारख्या अभियानांचा  उल्लेख केला आणि आरोग्यामध्ये आहार आणि पोषणाची भूमिका अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्र 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष म्हणून साजरे करत असल्याची  माहिती पंतप्रधानांनी दिली आणि नमूद केले की, राजस्थानमध्ये  श्री अन्न अर्थात भरड धान्याची अतिशय समृद्ध परंपरा  आहे, “राजस्थानचे श्री अन्न -बाजरी आणि श्री अन्न-ज्वारी ही या ठिकाणची ओळख आहे”येथे बनवलेल्या बाजरीची लापशी आणि चुरमा यांची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. त्यांनी सर्व तरुणांना आवाहन केले कीश्री अन्नाचा  केवळ आहारात समावेश करू नका, तर त्याचे ब्रँड अॅम्बेसेडर(राजदूत) व्हा.

देश युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि आजच्या तरुणांना त्यांची बहु-प्रतिभावान आणि बहुआयामी क्षमता केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित ठेवायची  नाही, असे नमूद केले.

क्रीडा क्षेत्रात एकीकडे आधुनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत , तर दुसरीकडे अर्थसंकल्पात मुलांसाठी आणि तरुणांसाठी राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयं प्रस्तावित करण्यात आली आहेत, ज्यात विज्ञान, संस्कृत आणि इतिहास यासारख्या प्रत्येक विषयावरील पुस्तके शहरापासून गावापर्यंत प्रत्येक स्तरावर उपलब्ध असतील, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

खेळ हा केवळ एक प्रकार नसून एक उद्योग आहे”, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले.एमएसएमई , अर्थात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग द्वारे लोकं मोठ्या संख्येने रोजगार मिळवत आहेत जे खेळाशी संबंधित वस्तू  आणि संसाधने बनवत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. क्रीडा क्षेत्राशी संबंधित एमएसएमईंना बळकटी देण्यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या अनेक महत्त्वाच्या घोषणांची पंतप्रधानांनी  माहिती दिली. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान म्हणजेच, पंतप्रधान विकास योजना  या विकास योजनेचे पंतप्रधानांनी उदाहरण दिले. मानवी कौशल्य आणि हाताचे कौशल्य असलेल्या लोकांना खूप मदत करेल.  तरुणांसाठी पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे  आर्थिक मदतीने रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जातील ज्यामुळे त्यांच्यासाठी नवीन बाजारपेठ निर्माण होईल, असं पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

"जेव्हा मनापासून प्रयत्न केले, तर चांगले परिणाम निश्चितच मिळतात, असं भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधान म्हणाले. त्यांनी टोकियो ऑलिम्पिक आणि राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत  देशाने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला . ते पुढे म्हणाले की, त्याचे परिणाम आपण सर्व पाहत आहोत . जयपूर महाखेल दरम्यान केलेल्या प्रयत्नांचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील , असेही पंतप्रधान म्हणाले. “देशासाठी पुढील सुवर्ण आणि रौप्यपदक विजेते तुमच्यातूनच उदयास येतील. जिद्द अंगी बाळगली, तर ऑलिम्पिकमध्येही तिरंग्याची शान वाढवू. तुम्ही कुठेही गेलात,तरी देशाला गौरव मिळवून द्याल, अशी मला खात्री आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. आपले तरुण देशाचं यश खूप पुढे नेतील”, असं म्हणत पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.

जयपूर ग्रामीणचे लोकसभेतले  खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

या वर्षी कबड्डी स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणारी महाखेल स्पर्धा , राष्ट्रीय युवा दिनी १२ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली. यात जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील सर्व ८ विधानसभा क्षेत्रांतील ४५० पेक्षा जास्त ग्रामपंचायती, नगरपालिका आणि प्रभागांतील ६,४०० हून अधिक युवक आणि खेळाडूंचा सहभाग होता. . महाखेलचे आयोजन  जयपूरच्या तरुणांना त्यांची क्रीडा प्रतिभा दाखवण्याची संधी देते आणि त्यांना क्रीडा क्षेत्र करिअरचा पर्याय म्हणून निवडण्यास प्रोत्साहित  करते, यावर पंतप्रधानांनी  भर दिला.

***

S.Kane/A.Save/S.Naik/V.Yadav/S.Mohite/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896453) Visitor Counter : 120