अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आर्थिक वर्ष 22 मध्ये सेवा क्षेत्रात वर्षागणिक 8.4 % वाढ

Posted On: 31 JAN 2023 4:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2023

 

सेवा क्षेत्राने गेल्या आर्थिक वर्षातील 7.8% इतक्या आकुंचनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022 मध्ये वर्ष-दर-वर्ष (YoY) 8.4% इतकी वाढ नोंदवून उसळी घेत पुनरागमन केले आहे, असे केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री,   निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2022-23 मध्ये ठळकपणे नमूद केले आहे.

इतक्या झपाट्याने झालेले हे परिवर्तन मुख्यत्वे  सेवा उप-क्षेत्रातील वाढीमुळे झाले असून त्यात 16% इतकी अनुक्रमिक वाढ नोंदवली गेली आहे. पेन्ट-अप डिमांड अर्थात मंदीनंतर आलेली ग्राहकांची मागणी,  गतिशीलता निर्बंधांचे  शिथिलीकरण  आणि बहुतेक सर्व ठिकाणी राबवलेली सार्वत्रिक लसीकरण मोहीम या घटकांमुळे या वाढीला पूरक वातावरण तयार झाले.

“भारताचे सेवा क्षेत्र हा एक शक्तीचा स्त्रोत आहे आणि त्यात अधिक वृद्धी होण्याची क्षमता आहे. अल्प ते उच्चक्षमतेच्या मूल्य वर्धित घडामोडी असलेल्या या क्षेत्रात निर्यात क्षमतेसह रोजगार आणि परकीय चलन निर्माण करण्यासाठी आणि भारताच्या  बाह्य स्थिरतेत योगदान देण्यासाठी पुरेशी क्षमता आहे”, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

पहिल्या संभाव्य अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये संपर्क-केंद्रित सेवा क्षेत्रातील 13.7% वाढीमुळे, सेवा क्षेत्रातील सकल मूल्यवर्धित वाढ (GVA) 9.1% असेल असा अंदाज आहे.

एकंदरीत किरकोळ महागाई कमी झाल्यामुळे निविष्ठा आणि कच्च्या मालाच्या किमतीचा दबाव कमी झाला, परिणामी  खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय ) सेवांमध्ये वाढ झाली आणि डिसेंबर 2022 मध्ये ते प्रमाण 58.5 पर्यंत वाढले , असे सर्वेक्षणात ठळकपणे म्हटले आहे.

 

बँक क्रेडिट

लसीकरण मोहिमेचे सार्वत्रिकीकरण झाल्याने सेवा क्षेत्रात गतीने वाढ झाली ज्यायोगे सेवा क्षेत्राला होणाऱ्या बँकेच्या पत पुरवठ्यात नोव्हेंबर 2022 मध्ये वर्ष दर वर्ष- YoY-  21.3% इतकी वृद्धी झाली, ही गेल्या 46 महिन्यातील दुसरी मोठी वाढ आहे. या क्षेत्रातील, घाऊक आणि किरकोळ व्यापारातील कर्ज नोव्हेंबर 2022 मध्ये अनुक्रमे 10.2% आणि 21.9% ने वाढले, ज्यावरून अंतर्निहित आर्थिक घडामोडींची क्षमता दिसून येते. “रोख्यांमधील उत्पन्नात वाढ झाल्याने NBFCs अर्थात  गैर बँकिंग वित्तीय संस्थांनी  बँक कर्ज घेण्याकडे आपला पवित्रा वळवला परिणामी NBFCs मधील पत म्हणजेच क्रेडिट 32.9% ने वाढले”, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे.

 

सेवा व्यापार

प्रगत अर्थव्यवस्थांमधील महागाईमुळे होणारी वेतन वाढ आणि स्थानिक सोर्सिंग अर्थात स्थानिकांना रोजगार देणे महाग होत असल्याने, भारतासह कमी वेतन असलेल्या इतर देशांमध्ये आउटसोर्सिंगचे मार्ग खुले होतात, ज्यायोगे भारताच्या सेवा निर्यातीत सुधारणा होऊ शकते, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. 2021 मधील टॉप टेन सेवा निर्यातदार देशांमध्ये भारत हा सेवा व्यापारातील महत्त्वाचा  देश आहे", असे सर्वेक्षणात नमूद केले आहे. एप्रिल-डिसेंबर 2022 या कालावधीत सेवा निर्यातीत 27.7% ची वाढ नोंदवली गेली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 20.4% होती. सेवांच्या निर्यातींपैकी, कोविड-19 साथीच्या काळात तसेच सध्याच्या भू-राजकीय अनिश्चिततेदरम्यान, डिजिटल सपोर्ट, क्लाउड सेवा आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या उच्च मागणीमुळे नवीन आव्हानांना तोंड देत सॉफ्टवेअर निर्यात, तुलनेने लवचिक राहिली आहे.

 

सेवा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक

संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद (UNCTAD) च्या जागतिक गुंतवणूक अहवाल 2022 मध्ये वर्ष 2021 मध्ये भारत हा जगातील सातवा सर्वात मोठा थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करणारा देश ठरला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताला 84.8 अब्ज अमेरिकी डॉलर्सची सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक मिळाली असून यामध्ये सेवा क्षेत्रातील 7.1 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या थेट परकीय गुंतवणूक - एफडीआय इक्विटीचा समावेश आहे.

"गुंतवणूक सुलभ करण्यासाठी, सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत, उदाहरणार्थ: राष्ट्रीय एक खिडकी योजना, गुंतवणूकदार, उद्योजक आणि व्यवसायांना आवश्यक असलेल्या मान्यता आणि मंजुरीसाठी वन-स्टॉप सोल्युशन ", असे सर्वेक्षणात नमूद केले आहे.

 

* * *

U.Ujgare/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1895010) Visitor Counter : 227